डॉ.रामदास दशरथ आबणे सरांना, शिक्षण क्षेत्रात व्याख्याता, विभागप्रमुख, प्राचार्य व लेखक म्हणून ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. या त्यांच्या शैक्षणिक प्रवासात त्यांनी, टिळक कॉलेज ऑफ एज्युकेशन, पुणे येथे वरिष्ठ व्याख्याता आणि एम.फील -संशोधन विभाग प्रमुख म्हणून काम केले आहे. पुणे विद्यापीठ व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक व कामराज विद्यापीठ मदुराई इत्यादींसाठी एम.एड.एम.फिल व संशोधनासाठी मार्गदर्शक म्हणून केले आहे. शैक्षणिक, सामाजिक परिसंवाद व कार्यशाळा यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे चरित्र, साहित्य व विचार या ग्रंथास अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांचा ‘संत रोहिदास साहित्य आणि विचार’ हा ग्रंथ प्रकाशित झाला आहे. ‘उमाजी नाईक ते क्रांतिगुरू लहुजी वस्ताद यांच्या सशस्रक्रांती’ च्या कालखंडावर संशोधन चालू आहे. विविध वृत्तपत्रांमधून त्यांनी स्फुट लेखनहि केले आहे.
शिक्षण क्षेत्रातील विविध पदव्या सरांनी घेतल्या. एम.ए.(इतिहास सन-१९८१ साली), एम.एड. (सन- १९८६ साली) एम.फिल. (सन- १९८९ साली, विषय – एक शिक्षकी शाळांच्या समस्या) पीएच.डी.(शिक्षणशास्त्र, सन- २००६ साली, विषय – अण्णाभाऊ साठे यांच्या शैक्षणिक विचारांचा चिकित्सक अभ्यास), पीएच.डी.(इतिहास, सन- २०१० साली, विषय – संत रोहिदास आणि त्यांचा कालखंड), पीएच.डी.(समाजशास्त्र, सन- २०१९ साली, विषय – शाहूमहाराज आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या सामाजिक विचारांचा अभ्यास प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. त्यांचे व्यक्तीमत्व काही खास असते. नेहमी प्रसिद्धीपासून लांब पण आपण समाजाचे काही देणे लागतो या हेतूने इतरांसाठी झटणे हा एक उद्देश असतो, असे खूप कमी लोक असतात.अशा लोकांपैकी एक म्हणजे आदरणीय श्री. डॉ. राम आबणे सर. साधी राहणी व उच्च विचार हे त्यांच्या व्यक्तीमत्वाचे वैशिष्ट्य.
टिळक शिक्षण शास्त्र महाविद्यालय पुणे येथे, मी १९९५ ला बी.एड. करत असताना सर आमचे प्राध्यापक होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांचा खुप आदर वाटत असे. सर आम्हाला खुप जीव लावत व मार्गदर्शन करीत असत. विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात सरांचे वास्तव्य आहे. सरांचा शिक्षण क्षेत्रातील व्याख्याता, विभागप्रमुख, प्राचार्य असा एकूण ४० वर्षांचा दीर्घ अनुभव आहे.या इतक्या वर्षात अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले. त्यातील काही विद्यार्थी आज उच्च पदावर आहेत व अजूनही सरांशी संपर्क ठेवतात. अनेक नामवंत बी.एड. कॉलेजेस मधे त्यांनी प्राचार्य म्हणून कार्यभार सांभाळला आणि आपल्या कॉलेजच्या प्रगतीसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले.
प्रत्येक जण पीएच.डी करताना अनेक वेळा विचार करतात. कारण पीएच.डी पूर्ण होण्यासाठी किती कालावधी लागेल हे नक्की सांगता येत नाही. कारण यात मार्गदर्शक चांगला हवा आणि मुख्य वेळ देणारा हवा. काही वेळा मार्गदर्शकाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे वेळ देणे अशक्य असते. तसेच अजून काही कारणांमुळे ही प्रक्रिया लांबते.अशा परिस्थितीमध्ये सुद्धा सरांनी, शिक्षणशास्त्र (विषय- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सहित्यातील शैक्षणिक विचारांचा चिकित्सक अभ्यास) इतिहास ( संत रोहिदास – आणि त्यांचा कालखंड एक अभ्यास. संत रोहिदास यांच्यावरील देशातील ही पाहिली पीएच.डी आहे. ) आणि समाजशास्त्र ( राजर्षि शाहू महाराज आणि प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या सामाजीक विचारांचा अभ्यास) अशा तीन विषयात पीएच.डी पूर्ण केली, हे खरोखर कौतुकास्पद आहे. एम. फिलच्या प्रबंध मधील सर्व शिफारशि तत्कालीन शिक्षण मंत्री, श्री. अनंतराव थोपटे साहेबांनी स्वीकारून पीएच.डी.च्या वाढी मंजूर करण्याच्या सूचना केल्या, ही पण एक पीएच.डी.च ठरेल.
सरांनी अनेक विषयांवर लेख लिहिले. अनेक चर्चा सत्रात भाग घेतला. अनेक वर्तमान पत्रामधुन त्यांचे लेख छापून आले आहेत. त्यातील उल्लेखनीय लेख म्हणजे संत रोहिदास यांच्या जयंतीनिमित्त “समतेचा मंत्र देणारा संत” हा आहे. सरांनी अनेक सामाजिक कार्य केले.”माझे शोधनिबंध”हे पुस्तक त्यांनी लिहिले. संशोधन करणाऱ्या अनेकांना ते पुस्तक मार्गदर्शक ठरले आहे. त्याचबरोबर सरांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यापैकी अण्णा भाऊ साठे चरित्र, साहित्य व विचार, आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद आणि मानवी हक्क या पुस्तकांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. संत रोहिदास व अण्णाभाऊ साठे यांच्या वरील पीएच.डी. साठी गुरुवर्य डॉ.न.म.जोशी सरांचे मोलाचे मार्गदर्शन त्यांना लाभले. सरांना सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेकडून शंभराहुन अधिक पुरस्कार मिळाले आहेत. हजाराहून अधिक व्याख्याने त्यांनी दिली. त्यातील काही पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत. १)क्रांतीपिता लहुजी साळवे जीवन गौरव पुरस्कार, लहुजी शक्तीसेना हस्ते, उत्तम बंडू तुपे यांनी दिला. २)अत्युच्य शिक्षण गौरव पुरस्कार, मान. शरद पवार साहेबांच्या हस्ते मिळाला. ३)प्रल्हाद शिंदे जीवन गौरव पुरस्कार, आनंद शिंदे यांच्या हस्ते मिळाला. ४)मा.एस.एम जोशी यांच्या हस्ते ग्रामीण विद्यार्थ्यांचा “आधारवड” पुरस्कार मिळाला. ५)अण्णा भाऊ साठे स्मारक संस्थेकडून “अण्णा भाऊ साठे’ बेस्ट पर्सन आँफ द इयर” २०१२ “जीवन गौरव पुरस्कार” भाई वैद्य यांच्या हस्ते मिळाला.
प्राचार्य आबणे सरांचे गाव, राहु, ता.दौंड जिल्हा पुणे होय. सरांचा जन्म ४ फेब्रुवारी १९४७ साली झाला. योगायोगाची बाब म्हणजे संत रोहिदास यांची जयंती व सरांचा जन्मदिवस एकच आहे. गावी व इतर ठीकानीही अनेक वेळा व्याख्यानांच्या निमित्ताने सरांचे जाणे येणे सुरु असते. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीला ते नेहमी गावी जातात. आई व वडील दोघेही स्वातंत्र्य सैनिक होते. आबणे सरांचा मुलगा डॉ. सचिन हे ऑर्थोपेडिक सर्जन असून, सुनबाई डॉ.वंदना, नेत्र तज्ञ आहेत. दोघेही आजी-आजोबांच्या शिकवणुकीप्रमाणे, आबणे हास्पिटल द्वारे वैद्यकीय सेवा करीत आहेत.
सर विद्यार्थिदशेपासून अनेक चळवळीत सक्रिय होते. त्यापैकी संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती स्वातंत्र्य संग्रामात, स्वातंत्र्य सैनिक म्हणून प्रामुख्याने भाग घेतला आहे. प्रौढ साक्षरतेचे संघटक म्हणून सरांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. सरांचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य खूप मोठे आहे.अनेक पुरस्कार मिळूनही सरांचे राहणीमान अगदी साधे आहे.”साधी राहणी उच्च विचार”ही म्हण सरांना तंतोतंत लागू पडते. सरांच्या या कार्याला माझा सलाम. आणि त्यांच्या हातून अधिक चांगले सामाजिक आणि शैक्षणिक कार्य घडावे ही सदिच्छा!!!
सरांच्या या सर्व जीवन कार्यात त्यांच्या सुविद्य धर्मपत्नी सौ.शांता आबणे यांची खंबीर साथ लाभली आहे. मा. प्राचार्य, डॉ. राम आबणे सर यांनी त्यांच्या जीवन कार्यावर लेखनाची संधि दिली त्याबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी आहे. पुनश्च एकदा सरांचा विद्यार्थी असल्याचा भास झाला. आज मी त्यांच्या जीवन कार्यास पाहून भारावून गेलो आहे, नकळत शब्द तोंडी आले, “सर यू आर रिटायर्ड, बट नॉट टायर्ड”
लेखन,
भापकर प्रकाश आबासाहेब,
प्राचार्य, हार्ट्स अँड हॅन्ड्स इंटरनॅशनल स्कुल, (CBSE) पुणे (९३२६१८८५८०)