साधारणपणे चाळीस बेचाळीस वर्षापूर्वीचा तो काळ. म्हणजेच एकोणीसशे शहात्तर, सत्त्याहत्तर किंवा अठठयाहत्तर, जाऊ द्या, आपण पुढे जाऊ. तर अशाच एका सुट्टीच्या दिवशी माझा पाथर्डीतलाच एक वर्ग मित्र जो क्रिकेटचा शौकीन होता, मला म्हणाला की चल आपण नगर रोडवर कॉलेज ग्राऊंडवर क्रिकेटची प्रॅक्टिस बघायला जाऊ. आम्ही आपले निघालो नगर रोडवर. साधारणपणे सकाळचे आठ साडेआठ झाले असतील. मस्त रमत गमत नगर रोडवर चाललो. त्या वेळेस नगर रोडवर जुन्या स्टँड च्या पुढे तसे फारसे काही नव्हते. नगर रोडवर सरळ पुढे चालत आले की डाव्या बाजुला कोर्टाची इमारत आणि उजव्या बाजुला एक लांबलचक चाळ वजा बैठी इमारत दिसायची. उजव्या बाजुचा सगळा परिसर मोहनवाडी नावाने ओळखला जायचा. आणखी सरळ पुढे आले की रस्त्याच्या डाव्या बाजूला पशु वैद्यकिय म्हणजे गुरांचा दवाखाना तर उजव्या बाजूला भु संपादन विभागाचे कार्यालय.
त्या पुढे सरळ आले की माणिकदौंडी कडे जाणारा रस्ता आणि त्या रस्त्याच्या बाजूला असलेली पोलीस वसाहत दिसायची. सरळ पुढे आलो की मोठा ओढा असायचा. तो ओढा ओलांडून मग पुढे जायचे. उजव्या बाजूला असलेले शासकीय गोडाऊन, तहसील कार्यालय, श्री तिलोक जैन विद्यालय लगेच नजरेत भरायचे. जैन विद्यालयात जाणारी पोरं सरळ त्या तहसील कार्यालयाच्या मार्गाने जाऊन कम्पाउंड मधुन वाकुन शाळेच्या आवारात यायची. तर ओढा ओलांडून आपण पुढे आलो की डाव्या हाताची काकडे बोर्डिंग, त्याच्या पलीकडचे शासकीय गोडाऊन आणि टेकडी लक्षात यायची.
सरळ थोडेसे वळण घेऊन आम्ही पुढे आलो आणि उजव्या बाजूला वळालो. प्रवेश द्वारावर दोन खांबावर लावलेला, उंचावर टांगलेला बोर्ड वाचला. पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे, जनता महाविद्यालय ( कला व वाणिज्य ), स्थापना 1966. त्या वेळेसच्या वयाप्रमाणे फारसे काही वाटले नाही, परंतु आत आल्या नंतर मात्र उजव्या बाजुला एक भव्य इमारत नजरेस पडली. तसेच समोर ही नवीनच बांधकाम झालेली लांबच लांब आडवी इमारत दिसली. इमारतीची भव्यता लक्षात येण्यासारखीच असल्यामुळे हे आपल्या गावातले कॉलेज याचा अभिमान वाटला.
सुट्टीचा दिवस असल्याने आम्ही सरळ त्या इमारतीतून मागच्या बाजुला गेलो. भव्य असे मैदान बघुन मन हरखुन गेले. त्या मैदानावर कॉलेजची काही मुले क्रिकेटचा सराव करत होती. सर्वांचा पांढरा गणवेश, पायात बुट, लेदर बॉल आणि विशेष म्हणजे मॅट वर सराव सुरू होता. त्या इमारतीच्या पायऱ्यांवर बसुन एखादा तासभर आम्ही प्रॅक्टिस पाहिली.
परत निघताना माझा मित्र मला म्हणाला की चल तुला ” स्टेप हॉल ” दाखवतो. ही काय भानगड आहे हे सुरुवातीला लक्षात आले नाही, परंतु प्रत्यक्षात जेंव्हा तो भव्य पायऱ्या पायऱ्यांचा वर्ग पाहिला तेंव्हा अवाक होऊन गेलो. मित्रांनो हे मी तुम्हाला चाळीस वर्षांपूर्वीचे सांगत आहे. अशी जनता महाविद्यालयाशी पहिली ओळख झाली.
पुढे योगायोगाने याच महाविद्यालयात वाणिज्य शाखेसाठी प्रवेश घेतला.
बी.कॉम होईपर्यंतचा महाविद्यालयातला तो काळ खुपच सुखावह होता. ग्रामीण भागातील महाविद्यालय, शिवाय सुरू होऊन तेरा, चौदा वर्षांचाच काळ झालेला असल्याने तसे नवीनच महाविद्यालय. परंतु सर्वच प्राध्यापक अत्यन्त उर्जावान, प्रेरणादायी आणि आपल्या कामात अतिश्य वाकबगार होते. महाविद्यालयात शिक्षक विद्यार्थी नाते अत्यन्त खेळीमेळीचे होते. त्या नात्यात अनौपचारिकता होती, त्यामुळे एखाद्या दिवशी जर कॉलेजला जायला मिळाले नाही तर त्या दिवशी चुकल्या चुकल्या सारखे वाटायचे.
सकाळी सात साडेसात पासुन नगर रोड तरुण तरुणी यांच्या गर्दीने फुलुन जायचा. जवळपास सगळेच विद्यार्थी पायी किंवा सायकलवर यायचे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी गावात दूध घालून दुधाच्या कॅन सह सायकलवर कॉलेजला यायची. बहुतांश विद्यार्थ्याचा पायजमा शर्ट असा वेश असायचा. चुकुन एखाद्याकडे मोटारसायकल दिसायची. तेंव्हा शेवगावला वाणिज्य शाखा नसल्याने शेवगावचे विद्यार्थी ही पाथर्डीतच यायचे. बारा वाजे पर्यंत तास व्हायचे. काही वर्ग मुख्य इमारतीत व्हायचे, तर काही वर्ग लायब्ररी बिल्डिंग मध्ये व्हायचे.
तास संपल्यानंतर पुन्हा सर्वजण घराकडे परतायचे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यानी गावात खोल्या भाड्याने घेतलेल्या असायच्या. चार, पाच मित्र एकत्रित खोली करून रहायचे. काही विद्यार्थ्याचे गावाकडून एस.टी. मधुन जेवणाचे डबे यायचे. त्या विद्यार्थ्यांनी स्टँड वर जाऊन डबा आणण्यासाठी पाळ्या लावलेल्या असायच्या. एस.टी. च्या या सेवेमुळे अनेकांच्या शिक्षणासाठी अनमोल सहकार्य मिळाले. तर काही खोलीवरच स्वयंपाक करायचे.
दुपारी तीनच्या नंतर मात्र पुन्हा सगळे विद्यार्थी महाविद्यालयाच्या परिसरात असायचे. त्या वेळेसचे महाविद्यालयाचे ग्रँथालय म्हणजे पुस्तक प्रेमींच्यासाठी मोठा खजिनाच होता. याच महाविद्यालयाने माझ्या सारख्या अनेकांना पुस्तकांवर प्रेम करायला शिकवले, वाचनाची गोडी लावली.
भव्य मैदानावर सगळीकडे खेळाडु दिसायचे. व्हॉलीबॉल, क्रिकेट, कबड्डी, खो खो, अथेलेटिक्स चा सराव करणारे खेळाडु दिसायचे. काही विद्यार्थी जिमखान्यात टेबल टेनिस खेळायचे, तर काही कॅरम, बुद्धिबळ खेळायचे. या विद्यार्थ्यांत सगळे प्राध्यापक सुद्धा खेळायचे. त्या काळातही कुस्ती सारख्या खेळात महाविद्यालयाचा जिल्ह्यात दबदबा होता. या महाविद्यालयाने अनेक नामांकित खेळाडु घडवले.
दुपारी तीनच्या नंतरच वादविवाद, वक्तृत्व, काव्यवाचन, निबंध स्पर्धा अशा वेगवेगळया कार्यक्रमांचे आयोजन स्टेप हॉल मध्ये केले जायचे. या कार्यक्रमांना विद्यार्थ्याची तुफान गर्दी असायची. खुपच मजा यायची. गच्च भरलेल्या स्टेप हॉल मध्ये कार्यक्रम खुपच रंगायचे. नुसती धमाल, हशा, टाळ्या, टिंगल आणि करमणुकी बरोबरच प्रबोधन. वेगवेगळ्या ठिकाणच्या स्पर्धेत महाविद्यालयाने अनेक बक्षिसे मिळवली.
दिवाळी सुट्टी नन्तरच्या सत्रात राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर असायचे. आठ, दहा दिवस ग्रामीण भागात राहुन श्रमदानातून समाज सेवा करण्याचा मुळ हेतू यातुन साध्य व्हायचा. या शिबिरात ही धमाल असायची.
थँडीच्या दिवसात इमारतीच्या छतावर कोवळ्या उन्हात तास व्हायचे. एखादया कार्यक्रमाच्या नियोजनाच्या सभा सुदधा छतावर रंगायच्या. सहलींचे नियोजन असायचे. आजही गोवा ट्रिप आमच्या पिढीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या लक्षात असेल.
दिवाळी नंतर स्नेह संमेलनाचे वेध लागायचे. सकाळी तास झाल्यानंतर दुपारी विविध कार्यक्रमांचे सराव सुरू व्हायचे. त्यात नृत्य, गायन, वादन, नकला , एकांकिका इत्यादीचा समावेश असायचा. विशेष म्हणजे हे स्नेह संमेलनाचे कार्यक्रम रात्री व्हायचे.
स्नेह संमेलनाच्या निमित्ताने कला, क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन केले जायचे. त्यासाठी मोठी चढाओढ असायची. वर्ष संपता संपता पारितोषिक वितरण समारंभाची चाहुल लागायची. मोठया जल्लोषात कार्यक्रम व्हायचा.
विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन असायचे. कविवर्य नारायण सुर्वे, शँकर पाटील, द.मा.मिरासदार, राम नगरकर, राजा गोसावी अशी त्यातली काही नावे आठवतात. पण खुपच मोठी साहित्यिक मेजवानी आमच्या पिढीला मिळाली.
सगळं काही आजही आठवतंय. प्राचार्य बी.यु.पालवेंचा दरारा आणि ” काय जवान ‘ अशी मारलेली हाक, प्रा.चरेगावकर सरांचे अनौपचारिक सूत्रसंचालन, प्रा.शारंगधर सरांचे ऐकतच रहावे असे मराठी, प्रा.ऐ. क्यू.आर.शेख सरांचे अफलातून इंग्रजी, प्रा. भराट सरांकडची व्यावहारिक उदाहरणे, कॅप्टन प्रा.आर.टी. वामन सरांचे उत्तुंग परंतु प्रेमळ व्यक्तिमत्व, प्राध्यापिका बडे मॅडमची मराठी कवितांची शैली, प्रा.घोरपडे सरांचे सहज सोपे इंग्रजी, प्रा.मैंदरगी सरांची हिंदी ची मिठास, प्रा.तरटे सर व प्राध्यापिका तरटे मॅडम यांनी अगणित विद्यार्थ्याना केलेली मदत, प्रा.नारखेडे सरांचे सुंदर हार्मोनियम वादन. प्रा.डॉ.व्ही.एस.पालवे यांची विषयावरची पकड व दरारा, प्रा.जी.बी.आघाव सरांना राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट समन्वयक म्हणून मिळालेला राज्यस्तरीय पुरस्कार, इतिहासाच्या तासाला विद्यार्थ्याना गुंग करणारे प्रा.एम.के.बडधे सर, विद्यार्थ्याचे मानसशास्त्र समजाऊन घेऊन शिकवणारे प्रा.एच.जी.जमाले सर, नवीन पुस्तकांची माहिती देणारे ग्रँथपाल प्रा.पी.ए. खेडकर सर, कनिष्ठ महाविद्यालयाची वाणिज्य शाखा सांभाळणारे प्रा.व्ही.एस.बोर्ले सर, खेळाडु घडवणारे प्रा.एस.के.गोसावी सर, या सर्व आदरणीय प्राध्यापकांचे विद्यार्थी घडवण्यातील योगदान विसरता येणार नाही. गुरुजनांचे आभार कसे मानायचे ? त्यांच्या ऋणात राहणेच योग्य.
गेट वरील कॉलेज कॅन्टीन, त्या कॅन्टीन मधील धमाल, विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका, त्या निवडणुकांचा थरार, एन.सी. सी. युनिट ची शिस्तबद्धता. मित्रांचे अगणित किस्से आणि उचापती, रुसवे, फुगवे, परीक्षेच्या वेळेस पोटात आलेला गोळा, पेपर कसा होता या वरच्या चर्चा, निकालाची उत्सुकता, किती विषय सुटले, किती राहिले त्याचे किस्से.
जुन्या स्टँडच्या चौकात मित्रांची वाट बघत थांबणे, कॉलेज संपल्यानन्तरही विनाकारण कॉलेज वरच रेंगाळणे हे सगळे विसरता येणार नाही. पदवी मिळाल्या नंतर मनाला लागलेली हुरहुर. आता सगळं काही मागे पडले आहे. आता आहे ती फक्त यादों की बारात.
शहराच्या आणि तालुक्याच्या राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा विषयक जडणघडणीत या महाविद्यालयाचा खूप मोठा वाटा आहे हे नाकारून चालणार नाही. या महाविद्यालयाने अनेकांना स्वतःच्या पायावर उभे केले, जगण्याचा आत्मविश्वास दिला, जीवन जगण्याची कला दिली. सर्वात महत्वाचे म्हणजे आयुष्यभर न विसरता येणारे सुखद क्षण दिले. त्या मुळे पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार, स्व. बाबुजी आव्हाड यांच्या स्मृतीस भावपूर्ण अभिवादन करतो. पुस्तक प्रेमी बाबुजींचे विचार ऐकणे ही सुद्धा एक मोठी साहित्यिक मेजवानी असायची.
या महाविद्यालयामुळेच अनेक विद्यार्थी राजकीय क्षेत्रात यशस्वी झाले, शासकीय अधिकारी झाले, प्राध्यापक झाले, शिक्षक झाले, अनेक पोलीस दलात, सैन्य दलात भरती झाले. त्या मुळेच या महाविद्यालयाचे या मातीवरचे ऋण विसरता येणे शक्य नाही.
मानवी जीवनाला स्पर्श करणाऱ्या विविध भावभावनांचे अविष्कार इथेच उमगले. मैत्री ची व्याख्या इथेच उमगली आणि खुप सारे मित्र मिळाले. तारुण्याच्या काळात आवश्यक अशा अभ्यास, संयम, शिस्त, व्यायाम, स्पर्धा, जिद्द, वात्रटपणा, थट्टा, मैत्री, आर्तता, हुरहुर, स्वप्नं, अपेक्षा भंग अशा सगळ्या सगळ्या अविष्कारांनी जगणे समृद्ध झाले.
ज्यांनी ज्यांनी या महाविद्यालयात शिक्षण घेतले त्यांना या सुखद स्मृती विसरता येणार नाहीत.
खास ठेवणीतले अत्तर जसे विशेष प्रसंगी काढून जपुन जपुन वापरले जाते तशा अनेक सुगंधी स्मृतींचा मोहक शिडकावा नक्कीच झालेला असेल.
( या लेखात फक्त त्या काळातील प्राध्यापकांची नावे आहेत. )