News

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे ‘अविष्कार -२०२३’ चे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

पुणे दि. १२- अविष्कार -२०२३ महोत्सवाच्या माध्यमातून देशात नव्या संशोधनाला चालना मिळेल आणि त्याद्वारे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल, असे प्रतिपादन राज्यपाल व कुलपती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित १५ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय संशोधन संमेलन ‘अविष्कार -२०२३’ च्या उद्घपाटन प्रसंगी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित राहत ते बोलत होते. कार्यक्रमाला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. मोहन वाणी, कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र.कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, अविष्कार समितीचे अध्यक्ष राजेश पांडे, अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे संचालक डॉ.संजय ढोले, विद्यापीठाचे अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर यांच्यासह विविध अधिकार मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी यशस्वी संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण कुलपती कार्यालयात उद्योगपतींसमोर केले जाईल असे यावेळी जाहीर करण्यात आले. तर दर वर्षी आविष्कार स्पर्धा या युवा दिनी घेण्यात येतील अशीही घोषणा करण्यात आली.

यावेळी कोश्यारी म्हणाले, देशातील विद्यापीठातून नाविन्य आणि नवोन्मेशाला चालना देण्यात येत आहे. राज्यातल्या विद्यापीठातील विद्यार्थी या दिशेने चांगले प्रयत्न करीत आहेत. अविष्कार महोत्सवात सहभागी होणारे हे विद्यार्थी भविष्यात समूह भावनेने काम करून संशोधनाला अधिक वेळ देत देशाला आपल्या प्रतिभेचा परिचय देतील आणि त्यातून समाजासाठी उपयुक्त संशोधन होऊन देश स्वावलंबी भारताचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विद्यार्थ्यांनी कृषि क्षेत्रातील संशोधनावरही भर द्यावा-महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

यावेळी बोलताना महसूलमंत्री विखे-पाटील म्हणाले, नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून बदलत्या काळानुसारू शैक्षणिक धोरणात बदल करून विद्यार्थी केंद्रीत दृष्टीकोन स्विकारण्यात आला आहे. जगातील सर्वाधिक स्टार्टअप्स भारतात आहे. यात विद्यापीठांचाही मोलाचा सहभाग आहे. साधनांच्या मर्यादा असूनही आपले विद्यार्थी पुढे जात आहेत. सावित्रीबाई पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून २४ स्टार्टअप्स देशपातळीवर सुरू आहेत. विद्यापीठांमधील क्षमता आणि ज्ञानाचे आदानप्रदान होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना गती मिळेल आणि स्पर्धेच्या युगात त्यांची चांगली तयारी होऊ शकेल. शेतकऱ्यांचे श्रम कमी करण्याच्यादृष्टीने कृषि क्षेत्रातील संशोधनावरही विद्यार्थ्यांनी भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. विद्यापीठाकडून जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी प्रस्ताव आल्यास त्यास शासन सहकार्य करेल, असेही मंत्री विखे-पाटील म्हणाले.

विद्यार्थ्यांनी नोकरी देणारे व्हावे -कुलगुरू डॉ.कारभारी काळे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.काळे म्हणाले, ‘अविष्कार’मध्ये सहा विविध विभागात विद्यार्थ्यांकडून संशोधन प्रकल्प स्विकारले जातात. यात आंतरविद्याशाखीय, तंत्रज्ञानाचा विकासाद्वारे समाजाच्या विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी आणि संशोधन प्रवृत्तीला चालना मिळावी हा या महोत्सवाचा उद्देश आहे. समाजाची गरज ओळखून नाविन्यपूर्ण कल्पना अस्तित्वात आणणे, स्वावलंबी होतानाच नोकरी उपलब्ध करून देणारा व्हावे ही या उपक्रमामागची भूमिका आहे. विद्यार्थ्यांनी देशपातळीवर नवा अविष्कार घडवून देशाच्या विकासात योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बहुमान मिळाले आहे. जगातील विविध मानांकनामध्ये विद्यापीठाने आपला ठसा उमटवला आहे. विद्यापीठाने मागील १४ अविष्कार महोत्सवात यश संपादन केले आहे. देशातील नामांकीत विद्यापीठात याचा समावेश होत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आपले संशोधन सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी देशाला आणि जगाला कसे समर्पित करता येईल याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा असेही डॉ.काळे म्हणाले.

विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्ती वाढीस लागेल-डॉ.मोहन वाणी
डॉ.वाणी म्हणाले, अविष्कार हा अत्यंत उपयुक्त उपक्रम असून विद्यार्थ्यांमधील संशोधकवृत्ती वाढविण्यासाठी, नव्या कल्पना शोधण्यासाठी महत्वाचा आहे. जगात वेगाने बदल होत असताना, स्पर्धा वाढत असताना, विद्यार्थ्यांनीदेखील अधिक प्रमाणात संशोधनात सहभाग घेतला पाहिजे. संशोधन प्रकल्प अयशस्वी होण्याची कारण शोधून त्रूटी दूर करण्याचा प्रयत्न करायला हवा. योग्य वेळ व्यवस्थापन, संशोधन कार्यातील अचूकता, संशोधन प्रकल्पाचे योग्य नियोजन, आंतरविद्याशाखीय चर्चासत्रांद्वारे ज्ञान प्राप्त करणे याद्वारे अधिक प्रकल्प यशस्वी करता येतील, असे त्यांनी सांगितले.

राहुरी कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील व निरीक्षण समिती अध्यक्ष प्रा.सुनिल पाटील यांनीही विचार व्यक्त केले.

डॉ. ढोले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. राज्यात २००६ पासून या स्पर्धेला सुरूवात झाली आहे. १५ व्या स्पर्धेत २२ विद्यापीठांनी सहभाग घेतला आहे. अणूशास्त्रज्ञ स्व. प्रा.एम.आर.भिडे यांचे नाव अविष्कार नगरीला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी महसूलमंत्री विखे-पाटील यांच्या हस्ते अविष्कार महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी महोत्सवात सहभागी प्रकल्पांची पाहणी केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.संजय चाकणे यांनी केले तर आभार डॉ.प्रफुल्ल पवार यांनी मानले.

MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
×
MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
Latest Posts

Comment here