लेखक:- रमेश डंगवाल
अनुवाद:- आशा कर्दळे
प्रकाश:- मेहता पब्लिशिंग हाऊस,
पुणे.
ISBN 81-7161-529-5
रेमेन मॅगसेस पुरस्कृत, तेजस्वी स्त्री किरण बेदी यांचे “आय डेअर!” हे चरित्र अतिशय सुलभ भाषेत अनुवादित केले आहे. हे पुस्तक वाचत असताना सर्व प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात व वाचनात मन पूर्ण रमते.
किरण बेदी यांच्या कार्याची जाणीव तर सर्वांना आहेच परंतु त्यांच्या स्वभावातील वैशिष्ट्ये, त्यांची कार्यपद्धती, कार्यनिष्ठता या पुस्तकातून लक्षात येते. त्यामुळे पुस्तक सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरते. शालेय विद्यार्थी व युवकांसाठी विशेष करून उपयुक्त वाटते.
किरण बेदी यांनी कोणते कार्य केले यापेक्षाही त्यांच्या अंगी असलेले गुण व त्यांचे विचार मी इथे मांडणार आहे. ते भावी पिढीसाठी निश्चितच उपयुक्त आहेत.
* अगदी लहानपणीच किरण बेदी यांनी मनाचा निर्धार केला की, आई-वडिलांनी त्यांच्यासाठी गुंतवलेल्या प्रत्येक पैशाचा जास्तीत जास्त उपयोग व्हायला हवा. प्रत्येक पैशाला हिशोब आणि मोल आहे. मनात अशी जिद्द असल्यामुळे शाळेतील प्रत्येक उपक्रमात त्यांनी हिरहिरीने भाग घेतला( टेनिस, भाषणे, वाद विवाद स्पर्धा,नाटक, क्रीडा इत्यादी) ग्रंथालयाचा उपयोग तर त्यांनी जास्तीत जास्त केला.
* कॉलेजमध्ये असताना एन्.सी.सी. गणवेशाविषयी त्यांना आत्यंतिक प्रेम आणि आदर होता. गणवेश कमालीचा स्वच्छ ठेवण्यासाठी त्या जीवाचा आटापिटा करत असत. एवढा अभिमान आणि निर्धार असल्यामुळे त्या लवकरच प्लॅटून कमांडर झाल्या.
* वेळेचा जास्तीत जास्त सदुपयोग करून घेण्याची त्यांना विलक्षण ओढ होती. एक क्षणही वाया घालविणे आवडत नव्हते.कॉलेजमधील दिवस अत्यंत धावपळीचे, परिश्रमांचे, शिस्तीचे आणि नियमित अभ्यासाचे होते.
* भारताचे भवितव्य घडविण्यात स्त्रियांचीही महत्त्वाची भूमिका आहे, असे नेहरूंचे विचार किरण बेदी यांच्या मनावर बिंबले होते.
* न्यायप्रियता हा जो गुण त्यांच्यामध्ये दिसतो त्याच्यामागे त्यांच्यात असलेला वेळोवेळी प्रभावी ठरणारा दयेचा अंशच दिसून येतो.
* कोणतीही जबाबदारी अंगावर पडल्यावर त्यावर पूर्ण अभ्यास करून, निरीक्षण करून ती पूर्णत्वास नेत असत. स्वतः निरीक्षण केल्यामुळे त्यांचे व्यवस्थापन परिणामकारक ठरत असे.
* वयाच्या 13 ते 30 वर्षापर्यंत त्या स्पर्धात्मक टेनिस खेळल्या. टेनिस खेळल्यामुळे त्यांना कष्टाचे, सतत प्रयत्नांचे आणि चिकाटीचे मोल शिकविले. मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या कणखर असणे किती मोलाचे आहे हे समजले. स्वतःला सक्षम करण्यासाठी त्या खूप कष्ट करीत असत.स्वतःचा स्वतःशी संवाद करून त्या स्वतःला अनेक गोष्टी शिकवत असत किंवा सुचवत असत.
* जिद्द आणि चिकाटी हे गुण त्यांच्याजवळ आहेतच परंतु खिलाडू वृत्ती मुळे त्या नेहमीच चटकन नमते घेत असत.
* त्यांच्या मते आयुष्याकडे बघण्याची दृष्टी तसेच आयुष्यासाठीच्या व्यूहरचना व डावपेच हे टेनिस मधून विकसित करता आले. ज्या गोष्टी कोणत्याही पुस्तकातून शिकता आल्या नसत्या अशा अनेक गोष्टी खेळाने शिकविल्या.
* स्वतःच्या हेतूवर ‘इतर लोक काय म्हणतील’ अशा प्रकारच्या भावनेचे कधीही अतिक्रमण होऊ द्यायचे नाही.
* बालपणात आत्मसात केलेली मुल्ये सदैव टिकतात. जाणून बुजून किंवा सातत्याने ती टाकून दिली तरच नष्ट होतात.
* मुल्यव्यवस्था दृढ करण्यात पालक आणि शिक्षण या दोन्हीची महत्त्वाची भूमिका आहे.
* मुलांचा सर्वांगीण विकास करण्यात वाचन आणि क्रिडा यांचा महत्त्वाचा वाटा आहे.
*प्रचंड आत्मविश्वास आणि उत्तम नेतृत्व शैली हे त्यांचे वाखाणण्यासारखे गुण आहेत.
* किरण बेदी नैतिकतेच्या पुरस्कर्त्या आणि सत्याच्या रक्षण कर्त्या आहेत.
* जे नैतिक दृष्ट्या चुकीचे आहे त्याविरुद्ध किरण बेदी लढल्या,अगदी परिणामांची तमा न बाळगता. भोवर्यात उडी घेण्यापूर्वी त्यांनी त्याची खोली कधी मोजली नाही. त्यांनी उडी घेतली कारण ते त्यांच्या सद्सदविवेक बुद्धीची मागणी होती. त्यांच्या दृष्टीने परिणामांपेक्षा नीतीपूर्ण स्वत्व जास्त महत्त्वाचे होते.
* पोलीसांच्या कामाबद्दल त्यांची मते एकदम ठाम आहेत. त्यांचा दृढ विश्वास आहे की गुन्हा शोधून काढणे, अटक करणे, खटला चालवणे यापेक्षा गुन्ह्यांचा प्रतीबंध करण्याने त्यांचे अस्तित्व न्याय ठरणार आहे.
* जन्म नशीबाने मिळालेला असो की अपघाताने, प्रगतीच्या दिशेने झेप घेण्यासाठी तो पाया समजावा. पश्चातापाचा साठी किंवा आरामासाठी जन्म असू नये.
* जी व्यक्ती स्वतःच्या आयुष्याचा ताबा स्वतःलाच घेते तीच खरी सत्ताधारी असते.
*आपले जीवन स्वतःसाठी राखून ठेवण्यापेक्षा ते इतरांसाठी खर्च करण्यात आणि इतरांना वाटून टाकण्यात त्याची समृद्धता जास्त आहे.
* जोपर्यंत स्त्रिया देण्यापेक्षा घेण्याच्या अवस्थेत असतील, तोपर्यंत त्या अन्याय सहन करून राहतील.
* जी स्त्री स्वतः निर्णय घेते आणि त्याच्या परिणामांना तोंड द्यायला सिद्ध असते तीच खरी समर्थ स्त्री.समर्थ स्त्री देण्याच्या अवस्थेत असते केवळ घेण्याच्या नव्हे. तिच्या अनुभवामुळे ती स्वतःच्या मुलांना चांगले मार्गदर्शन करू शकते.
* राज्यकर्ते आणि जनता यांच्यातील अंतर कमी झाल्याशिवाय भ्रष्टाचार दूर होऊ शकणार नाही.
* व्यवसायीक आणि मानवतावादी पोलीस सेवा ही लोकशाहीच्या सर्वात भक्कम संरक्षकांपैकी आहे.
*एखाद्या व्यक्तीला तुरुंगात टाकणे ही शिक्षा होऊ शकते. तुरुंग हा सतत शिक्षा देण्यासाठी नाही. उलट सुधारणा होण्यासाठी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी ती अखेरची जागा आहे.
प्रा. डॉ. राधिका सोमवंशी
विभाग प्रमुख गणित व संख्याशास्त्र विभाग,
नूतन मराठा कॉलेज,
जळगाव. (सेवानिवृत्त )