कोरोना हा आजार किती भयंकर आहे. याची प्रचिती गेल्या वर्षभरात संपूर्ण जगाला आली आहे. लाखो नागरिक या आजारामुळे मृत्युमुखी पडले आहेत. या आजाराची गंभीर लक्षणे असलेल्यांची प्रकृती किती गंभीर असते हे सगळ्यांनीच पाहिले आहे. कोरोना हा एक संसर्गजन्य आजार आहे. अनेक वैद्यकीय तज्ञांच्या मते, आपण या आजारावर नियंत्रण मिळवू शकतो. मात्र , तो कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी मोठा कालावधी जावा लागणार आहे. भारतात नागरिकांनी कोरोना चा आजार कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. हे आता समजून घेणे गरजेचे आहे. एखाद्या आजाराची तीव्रता कमी होऊ शकते, मात्र तो आजार संपला असा गैरसमज कोणीही करून घेऊ नये. कारण, स्वाइन फ्लूचे रुग्ण दहा वर्षानंतर आजही सापडत आहेत. त्यांची फक्त संख्या कमी झाली आहे. अलीकडे हा कोरोना आजार होऊ नये म्हणून लस आली आहे. तो एक प्रतिबंधात्मक उपाय आहे. बहुतांश सर्वसामान्य लोकांना लस मिळण्यासाठी अजून काही काळ जाणार आहे. त्यामुळे या आजाराचा संसर्ग होऊ द्यायचा नसेल तर मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग चे पालन करणे आणि हात स्वच्छ धुणे ही आपली जबाबदारी वेळेवरच ओळखली पाहिजे.
कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे. कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्यानंतर गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला खीळ, शेअर बाजारात घसरण, गुंतवणूकदारांमध्ये अविश्वासाचे वातावरण, छोटे-मोठे कारखाने बंद, सप्लाय चैन तुटली, व्यापारावर निर्बंध, वाहतुकीवर निर्बंध, हालचालींवर निर्बंध, थेटर-दुकाने-मॉल इतकेच काय तर शाळा-मंदिरे बंद अशा हेडलाईन्स तुमच्या वाचनात किंवा ऐकण्यात आल्या असतील. याचा एकंदरीतच परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेला पाहायला मिळत आहे. यामुळे “न भूतो न भविष्यती” अशा परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. हे सारे पाहून 1963 साली अल्फ्रेड हिचकॉक यांची उत्कृष्ट निर्मिती असलेल्या “बर्ड्स” या चित्रपटाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. या चित्रपटात अशीच काळजी, चिंता आणि भयावह अनुभवाची आठवण होते. “सतत होणाऱ्या पक्षांच्या हल्ल्यानंतर बोदेगा बेटावर संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले होते. सगळीकडे दहशतीचे वातावरण होते. रस्ते, कार्यालये आणि रेडिओ स्टेशन्स सर्वच्या सर्व निर्मनुष्य झाले होते. सगळं काही ठप्प झालं होतं. या पुढे काय होणार? या चिंतेने सर्वांनाच ग्रासले होते. सगळीकडे अक्षरशः खळबळ माजली होती.” मात्र, यावेळी पक्षी नव्हे तर एक जीवघेणा व्हायरस (विषाणू) आहे. मात्र चिंता, काळजी, भीती आणि लॉकडाऊन यामध्ये साम्य दिसून येते. हिचकॉकच्या चित्रपटात पक्ष्यांची भीती होती, ती फक्त एका ठराविक भागापुरतीच होती आणि वास्तविक जगात असं काहीच घडलं नव्हतं. हाच तो यातला मोठा फरक आहे, म्हणूनच आत्ताचे जे आव्हान आहे ते अधिक गहिरे आहे.
केवळ भारत देशच नाही तर जगभरातील सगळे देश कोरोनामुळे प्रभावित झाले आहेत. लॉकडाऊन मुळे उद्योगधंदे बंद झाले. त्याचा परिणाम लोकांच्या रोजगारावर झाला, रोजगार नसल्यामुळे राहण्याच्या जागेचं भाडे, किराणा, भाज्या अशा जीवनावश्यक गोष्टी विकत घेण्याची त्यांची क्षमता नष्ट झाली आणि हे पुन्हा कधी सुरळीत सुरू होईल याची त्यांना शाश्वती नसल्यामुळे अनेकांनी आपल्या घराची वाट धरली. भारतासह जगभरातील अनेक भागांत माणसांच्या हालचाली, वाहतुक आदि सर्वच क्षेत्रांना एक प्रकारे लकवाच मारला आहे. परंतु कोरोना महामारीमुळे झालेले आर्थिक नुकसान वेगाने भरून निघण्याची अपेक्षा ठेवता येण्यासारखी परिस्थिती नाही, त्यासाठी वाट पहावी लागणे अपरिहार्य आहे. Covid-19 अर्थात कोरोना विषाणूच्या प्रसाराचा भारतासह संपूर्ण जगातील प्रत्येक घटकावर अत्यंत खोलवर परिणाम झालेला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे देशांतर्गत क्षेत्रावर अवलंबून असलेले उद्योग ठप्प झाले आहेत. विविध उद्योग मोठ्या प्रमाणावर बाधित होणार आहेत, यामध्ये प्रामुख्याने बांधकाम व्यवसाय, पर्यटन उद्योग, वाहन उद्योग, हॉटेल उद्योग, वित्तीय संस्था, वाहतूक उद्योग, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र आणि या सर्व व्यावसायांवर अवलंबून असणारे इतर छोटे-मोठे उद्योग व सेवा क्षेत्र मोठ्या प्रमाणावर बाधित होणार आहेत.
कोरोनाने जगाबरोबरच भारतामध्येही भय आणि क्लेशदायक परिस्थिती निर्माण केली आहे व संबंध मानवी जीवनामध्ये एक प्रकारची गतीशून्यता आणली आहे. भारत आजही या आजाराशी मुकाबला करताना संघर्षमय परिस्थितीतून जात आहे. आपला देश जेव्हा कोरोना महामारीच्या संकटातून बाहेर येईल, तेव्हा विविध आव्हाने समोर उभी राहिलेली आपणास दिसून येणार आहेत. प्रथमतः उद्योजकांना भांडवलाची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवेल. कारण, लॉकडाऊनमुळे अगोदरच व्यवसाय बंद झाले असल्याने खेळते भांडवल कमी प्रमाणात उपलब्ध असेल, याशिवाय व्यवसायाचे खर्च (कर्जावरील व्याज, भाडे, पगार व इतर खर्च) लॉकडाऊन काळामध्येही अदा करावेच लागले आहेत. याचा परिणाम व्यवसायाच्या आर्थिक नियोजनावर झालेला आहे. सरकारकडे उत्पन्न कमी असल्याने सरकारला सरकारी विकासकामे पूर्ण क्षमतेने चालू ठेवणे अवघड जाणार आहे. भविष्यात नागरिकांवर मोठ्या प्रमाणात कर लादून वसुली करणे सरकारला शक्य होणार नाही. शिवाय सरकार मार्फत छोट्या-मोठ्या उद्योगांना प्रोत्साहनपर आर्थिक सवलती मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील की नाही याची शाश्वती नाही. तसेच जागतिक मंदीमुळे जागतिक बँक व इतर वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज घेण्यावर सुद्धा काही मर्यादा येणार आहेत.
@ लेखक @
प्रा. शिंगाडे अभिजीत मनोहर.
MA D.ED B.ED SET NET DSM.
विश्वासराव रणसिंग महाविद्यालय,
संपर्क:- ८४११९३७१२०.