motivational

डाॅ भाऊ बात्रेची गोष्ट : डाॅ. शंकर बो-हाडे

disability

काल परवाची गोष्ट. शिपाई तास संपता संपता वर्गात आला. म्हणाला, ‘ सर त्या मुलाला पाय-या चढता येत नाही. तरी त्याला पहिल्या तासाला वर्गात बसायचं आहे. तुम्हीच त्याला समजावून सांगा. ‘ मी त्याला भेटलो. तो म्हणाला, ‘ मला पहिल्या तासाला बसायचं आहे .’
‘ अरे पण तुला दुस-या मजल्यावर यायला वेळ लागेल. तुला त्यासाठी लवकर यावे लागेल. ‘ मी
‘ सर , मी घरातून तासभर लवकर निघेल. तासाला वेळेवर येईन .’ तो
मी त्याच्या जिद्दीला सलाम केला. मला आमच्या सैय्यद प्रिप्रीच्या शाळेतील संतोष आठवला. तो न चुकता शाळेत यायचा. त्यासाठी एका लाकडाच्या फळीला त्याने चाकं बसवून त्याची गाडी केलेली होती. एका हाताने तो ती पुढे ढकलत होता. ऊन ,वारा, पाऊस, गारा त्याच्या शाळेत खंड पडत नसे. पाय पोलिओने गेलेल्या संतोषने मनात घर केले होते. पुढे नाशिकमधील समाजसेवेच्या वेडाने झपाटलेल्या रमेश जाधव यांनी गणेश उत्सवाच्या काळात दानपेटी ठेऊन दान जमा केले. त्यातून संतोषसाठी सायकल घेतली. संतोष तीनचाकी सायकलवर शाळेत येऊ लागला. संतोष फार गोड मुलगा होता.
मी पुणे विद्यापीठात होस्टेलला राहत होतो. संशोधन चालू होते. तिथे भाऊ बोत्रे नावाचा मित्र भेटला. भाऊकडे तीनचाकी सायकल होती आणि स्कुटरही. गणेशोत्सवात त्याच्या स्कुटरवर त्याने मला पुण्यातले गणपती दाखवले. त्याला पुण्याचे गल्लीबोळ माहित होते.
भाऊची गोष्ट मजेशीर होती. मित्र त्याला पाठकुळीवर बसवून शाळेत घेऊन जात. भाऊला शाळा आवडायची. घरात बसून तो अभ्यासही करायचा. घरच्या मंडळींनी मोठा झाल्यावर त्याने दिव्यांगासारखा एखादा टेलीफोन बुथ चालवावा एवढीच अपेक्षा होती .घडले ते उलटे. तो एस.एस.सी. झाला. चांगले गुण मिळाले. असा मुलगा कला, वाणिज्य शाखेत शाखेत शिकेल अशी आपली सामान्य अपेक्षा. तो वाडीया काॅलेजला गेला. म्हणाला, ‘ मला विज्ञान शाखेत प्रवेश हवा आहे. ‘ प्राध्यापकांनी त्याला समजावले. विज्ञान शाखेत प्रयोगशाळेत उभे राहून प्रात्यक्षिके करावी लागतात. ते तुला जमणार नाही , वगैरे .’ भाऊ म्हणाला, ‘ सर , मी स्टुलवर बसून प्रात्यक्षिके करीन.’ प्राध्यापकांचा नाईलाज झाला. भाऊ काॅलेजमध्ये नियमित येत होता. अभ्यास करीत होता. तो बारावीची परीक्षा पास झाला. असा मुलगा बी. एस्सी झाला नसता तर नवल. भाऊ बोत्रे बी.एस्सी झाला आणि एम.एस्सीच्या तयारीला लागला. त्याला विद्यापीठात प्रवेश घ्यायचा होता. वडील रिक्षा चालवायचे. कसे जमणार ? पुण्यात काही माणसं शिक्षणासाठी मदत करीत असतात, हे भाऊला माहीत होते. त्याचे हात आता पाय झाले होते. भाऊ हाताचा वापर करुन चालत असे. एकदा एका कार्यालयात गेल्यावर जनावर आले असल्यासारखं आधिका-याला जानवलं. आधिका-याची घाबरगुंडी उडाली होती. रस्त्याने हाताने चालताना त्याला जनावराची भिती असते. कुत्रे त्याच्यावर हल्ला करण्याची भिती असते. भाऊ संबधित दानशूराकडे गेल्यावर ते म्हणाले, ‘ किती मदत हवी ? ‘ भाऊने त्यांच्या टेबलवर विद्यापीठाचे प्रवेशाचे चलन ठेवले. त्यावरची रक्कम विद्यापीठाच्या खात्यावर भरण्याची विनंती केली. भाऊचा एम.एस्सी. इलेक्ट्रॉनिकला प्रवेश झाला. आता भाऊला शिष्यवृत्ती मिळू लागली. धिद्यापीठाचे वसतिगृह मिळाले. भाऊची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल झाली. भाऊ कपडे धुणं , इस्त्री करणे आणि विभागात जाऊन लेक्चर, प्रॅक्टीकल करू लागला. दोन वर्षाचा अभ्यासक्रम त्याने यशस्वीपणे पूर्ण केला.
भाऊ बोत्रेची गोष्ट इथेच संपत नाही. आता भाऊला Ph.D. करायचे वेध लागले. त्याने त्यासाठी मार्गदर्शकाची निवड केली. संशोधनाच्या वाटा धुंडाळल्या. भाऊ दिवसभर प्रयोगशाळेत विविध प्रात्यक्षिके करुन पाहू लागला. विज्ञानात प्रयोगाला , त्यातून येणा-या निष्कर्षाला महत्व असते. त्यासाठी तो तज्ञांना भेटू लागला. एकदा त्याच्या प्रयोगशाळेत रघुनाथ माशेलकर येऊन काम पाहून गेले होते. एखादा पदार्थ किती जुना आहे, त्याची गुणवत्ता कशी आहे, या विषयावर भाऊचे काम चालू होते. संशोधकाला संशोधन चालू असताना आपले शोधनिबंध सादर व प्रकाशित करावे लागतात. भाऊने असाच एक शोध निबंध अमेरिकेतल्या बोस्टन विद्यापीठाला पाठवला आणि चमत्कार झाला. बोस्टन विद्यापीठाने तो स्वीकारला आणि सादर करण्यासाठी थेट बोस्टनला बोलावले. परदेश प्रवासाची तयारी सुरू झाली. भाऊने पासपोर्ट काढला. व्हिसा मिळवला. त्यासाठी नो एजंट. भाऊ प्रत्येक ठिकाणी स्वतः गेला. अगदी विमान प्रवासाची तिकीटे स्वतः काढली. मार्गदर्शक म्हणाल्या, ‘ चाललाच आहेस तर तुझ्या विषयाच्या अनुषंगाने काही नवीन स्वरूपाचे संशोधन चालू आहे का ? याचा शोध घे . ‘ सगळी नाटकं करता येतात पण पैश्याचे? भाऊ बोत्रे तीन दिवस तिथे राहणार होता. त्यासाठी त्याला ट्रॅव्हल ग्रॅंट मिळाली होती. भाऊने घरी त्याच्या परदेश प्रवासाची आजिबात कल्पना दिली नव्हती. दिली असती तर ह्या लंगड्या पांगळयाची काळजी वाटून आई वडीलांनी खोडा घातला असता ना ! भाऊने कुलगुरू नरेंद्र जाधवांना भेटायचा प्रयत्न केला. पण कुलगुरू मिटींगमध्ये असल्याने त्याच्या चार चकरा फुकट गेल्या. टेक ऑफचा दिवस जवळ आला. आवरा आवर सुरू झाली. मी भाऊला नाशिकला बोलावले. शुभेच्छांचा घरगुती समारंभ होता. पत्रकार विश्वास देवकर आले. ” हातावर चालणारा भाऊ निघाला बोस्टनला ” , अशी मुखपृष्ठ कथा सकाळ पेपरमध्ये प्रसिद्ध झाली आणि भाऊला काॅल, मेल सुरू झाले. अमेरिकेतली मराठी माणसं म्हणाली, ‘ हाॅटेलात राहू नको . इथली हाॅटेल तुला परवडणार नाही. आमच्याकडे रहायला ये.’ कुलगुरू नरेंद्र जाधवांनी डाॅ विद्यासागर यांचेवर त्याला काय हवे ते पहायची जबाबदारी सोपविली. कुलगुरू ऑफीसातून भाऊचा शोध सुरू झाला. आईवडिलांना पेपरमधून पोराची किर्ती ऐकायला मिळाली. बाबा कल्याणी यांनी भाऊच्या हातात खर्चासाठी पैसे दिले. भाऊला विमानतळावर पोहचवायला काही नातेवाईक हजर होते. मी टेक ऑफच्या दिवशी विमानतळावर त्याला निरोप देण्यासाठी गेलो होतो.
भाऊची गोष्ट इथे अधिक मजेदार वळण घेते. भाऊ बोस्टन विद्यापीठात संशोधन मांडतो पण अमेरिकेतल्या विविध विद्यापीठात जातो . संशोधकांना भेटतो. यासाठी अमेरिकतली मराठी माणसं त्याच्या पाठीशी उभी रहातात. तीन दिवसासाठी गेलेला भाऊ एकवीस दिवस अमेरिकेत फिरतो आणि भारतात परततो. असा माणूस Ph. D पदवी मिळवतो हे आता फार नवलाचे राहत नाही.
शिक्षण कधी थांबते का ? थांबला तो संपला . भाऊला एकदा पुणे विद्यापिठाने संशोधनाचे सादरीकरण करण्यासाठी जपानला पाठवले होते. त्याच दरम्यान त्याची दिल्लीत आय आय टी साठी मुलाखत होती. मुलाखतीची तयारी चालू होती. तरी भाऊ जपानच्या टीम मध्ये दाखल झाला. तिथून मुंबई गाठली. दिल्लीचे तिकीट काढलेले होते. तसाच दिल्लीत पोहचला. फ्रेश होऊन मुलाखतीसाठी हजर झाला. तज्ञांना जेंव्हा भाऊची पुणे जपान मुंबई दिल्ली प्रवासाची हकीगत कळली तेंव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आणि ते भाऊला म्हणाले, ‘ बोल कधीपासून नोकरीत रुजू होतो. हे घे तुझे नियुक्ती आणि निवडीचे पत्र. ‘
भाऊ म्हणाला, ‘ मला वेळ द्या. घरी जातो. आईवडिलांना भेटतो. चार दिवस आराम करतो आणि नोकरीला सुरुवात करतो .’
हाताचा वापर पाय म्हणून करणारा डाॅ भाऊ बोत्रे आज राजस्थानच्या बीट्स पिलानी मध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून सक्रिय आहे. त्याला तेथून भारतभर फिरावे लागते. जगभरच्या संशोधनावर लक्ष ठेवावे लागते आणि दिव्यांगासाठी काहीबाही करावे लागते. म्हणून भाऊची ही कथा सफळ संपूर्ण नाही. तो आणखी काही करण्याची तयारी करतो आहे. त्याचा संसारही फुलला आहे. त्यावरची कळी खुलू लागली आहे आणि भाऊ प्रयोगशाळेत व्यस्त आहे.

डाॅ. शंकर बो-हाडे
९२२६५७३७९१
shankarborhade@gmail.com

MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
×
MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
Latest Posts

Comment here