Life Explained

हक्काची खिडकी : श्रीमती ज्ञानेश्वरी परदेशी

“चेहरा मोहरा याचा,

कुणी कधी पाहिला नाही

मन अस्तित्वाचा सिंधू

भासाविण दुसरा नाही.

या ओळखी नात्याचा

कुणी कसा भरवसा घ्यावा.

मन मनास उमगत नाही

आधार कसा शोधावा.”

कवी सुधीर मोघेंच्या या काव्यपंक्ती वाचताना खरोखरच आपण विचारात पडतो, ‘माणसाच मन” हा आजही संशोधनाचा, कुतूहलाचाच विषय आहे. या मनाला चेहरा नाही, याला कधी कोणी पाहिले नाही आणि याच्यासारखे दुसरे रहस्य नाही.

आयुष्याची एक रिक्त सायंकाळ!!

मी बरेचदा माझ्या विद्यार्थ्यांना सांगत असते की एखाद्याच  दुःख ओळखून वाटून घ्यायला शिका.आजच्या काळात खरच माणसं आत  खूप वेगळी असतात आणि वरवर खूप वेगळी वागतात , माहिती नाही कोण कोण कुठले दुःख जगापासून लपवून जगत असतो.अशावेळी कोणीतरी व्यक्त होण्यासाठी  असाव हे महत्त्वाचे. हा लेख लिहावासा वाटला याच कारण सध्या खूप मोठ्या प्रमाणात होणा-या आत्महत्या !  आपल्या मनातलं बोलायला एकतरी हक्काची खिडकी हवी,

“मला त्याच मन कळतं” असं कधी-कधी कोणी  एखाद्याच्या बाबतीत म्हणून जाते…पण नीट विचार करून बघा…. खरोखरच कितीही जवळच नातं असू द्या, रक्ताचं, हक्काचं, मानलेलं , जवळच वा दुरचं , खरच आपण एखाद्याच मन ओळखू शकतो ? समजू शकतो का त्या मनात काय सुरु आहे !? कदाचित एखाद दुसरा अपवाद असेलही पण तिथेही १०० % ओळखू शकेल याची खात्री नाही.

कारण माणसाचं मन हा मुळातच खूप खोल विषय आहे.वरवर हस-या दिसणा-या चेह-यामागे कदाचित कोण कुठले घाव रूतून बसलेले असतील ! कोणी जबाबदा-या पोटी , कोणी कर्तव्यापोटी , तर कोणी समाजाच्या भितीपोटी , सामाजिक प्रतिष्ठेपायी हे घाव लपवत असतील….! आणि म्हणूनच आतला तो चेहरा एका खोट्या मुखवट्याआड झाकत जगात वावरण ब-याच वेळा ब-याच व्यक्तींना सोयीचं वाटतं. म्हणूनच म्हटलय ना की चार ओळीत काय वर्णाव मन ? वरवर शांत दिसणारी एखादी व्यक्ती आत कोणत्या वेदनेने आणि किती पोखरली जातेय याची जाणीव कधीकधी कोणालाही नसते. अशावेळी कोणीतरी जवळचे , समजून घेणारे किंवा समजून सांगणारे जवळ असेल तर ठिक… नाही तर याच भोव-यात फिरून फिरून शेवटी तळाकडे प्रवास सुरू होतो. बाहेर पडण्यासाठी चाललेली अतोनात धडपड थांबते आणि काळाचा हा खोल डोह सारं स्वत: मधे सामावून घेतो, आणि वर दिसते ती फक्त निरव शांतता….जणू काही घडलेच नाही…अशी निरव शांतता !

या भोव-यात स्वत:ला अडकू  द्यायचे नसेल तर प्रत्येकाकडे एक “हक्काची खिडकी” हवीय. हो , खिडकीच …..मनात येणार सर्व चांगलं , वाईट , खरं- खोटं, भिती , दडपण, आनंद, दुःख , जगापासून लपवून ठेवलेला सगळा वेडेपणा अगदी सगळं सगळं जिथे निःसंकोचपणे मांडता येईल अशी हक्काची खिडकी! जिथे सारं मन रित करता येईल, अगदी केव्हाही…कधीही…! कारण ब-याच वेळा वेदना बोलून दाखवली तरी त्यातला बोचरा डंख कमी होतो. मन मोकळं करण्याची ही हक्काची खिडकी अगदी कोणीही असू शकते – आई , वडिल, भाऊ , बहिण, मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, अगदी कोणीही…! प्रत्येकवेळी मन फक्त बोलूनच मोकळं होतं असं नाही तर डोळ्यांतून पाझरलेले अश्रू सुद्धा मन हलकं करतात.

एखाद्या खोल समुद्रातील मोठ्या हिमनगाच जसं फक्त छोटस टोकच आपल्याला वर दिसत , आत खोलवर रूजलेला तो अवाढव्य हिमनग जसा दृष्टीआड असतो तशीच काहीशी अवस्था या मनाची सुद्धा आहे, म्हणूनच अशी हक्काची व्यक्ती , हक्काची खिडकी असलेलीच बरी…जिथे आपण , आपल्या मनाचा सगळा पसारा जसाच्या तसा मांडू शकतो आणि जिथे हा पसारा फक्त आहे तसा स्विकारलाच जात नाही तर तो आवरण्यासाठी रस्ता शोधायलाही सोबत मिळते. म्हणूनच असावी एक हक्काची खिडकी

श्रीमती ज्ञानेश्वरी प्रभाकर परदेशी, पुणे.

मो. क्रं. 9960364810

MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
×
MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
Latest Posts

Comments (2)

  1. अप्रतिम लेख 👌👌🌸🌸

  2. खूपच छान शब्दरचना असेच छान छान लिहित रहा👌👍👍

Comment here