School

कोरोना (लॉकडाउन) नंतरचे शिक्षण विश्व: *प्रा.शरद पालवे*

चीनमधील वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोनाचे संकट भारतामध्ये हा हा म्हणता पोहोचले. मुंबई, पुणे आणि दिल्ली अशा महानगरांमध्ये हवाईमार्गे कोरोनाचा विषाणू कधी भारतात पोहोचला हे कळले देखील नाही. त्यानंतर जनता कर्फ्यू जाहीर झाला आणि कोरोना संकटाची पुसटशी कल्पना भारतीयांना आली. 25 मार्चला पहिला लॉक डाऊन जाहीर झाला .पुढे दुसरा, तिसरा आणि चौथा असा लॉक डाऊन वाढतच गेला

आणि आपण सर्वजण घरातच अडकलो. मार्चचा शेवटचा आठवडा असल्यामुळे विद्यार्थी सुरक्षेला प्राधान्य देत परीक्षा रद्द केल्या गेल्या आणि अगोदरच्या परीक्षांच्या गुणांची सरासरी ग्राह्य धरत विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठवले गेले. दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द देखील करावा लागला. दहावी-बारावीचे पेपर वर्क फ्रॉम  होम, धोरण मान्य झाल्यानंतर घरातून तपासणी करावी लागली. दरम्यानच्या काळात कोरोना रुग्णसंख्येमध्ये वेगाने वाढ झाली. आणि महाराष्ट्राचे जनजीवन जवळजवळ ठप्प झाले. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा-सुविधा बंद झाल्या. मार्च ते मे या काळात शिक्षकही मूल्यमापन आणि निकाल पत्रके बनविण्यात व्यस्त होते. काही शिक्षकांना कोव्हीड-१९ (covid-19) च्या नियंत्रणासाठी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये रुग्णांच्या वेगवेगळ्या नोंदी

ठेवणे, सर्वेक्षण करणे, रेशन वाटप दुकानावर मदत करणे, पोलीस बांधवांसोबत चेक पोस्टच्या ठिकाणी कामात मदत करणे इत्यादी कामे शिक्षक बंधू-भगिनी इमाने-इतबारे करत आहेत. पण आता नवीन प्रश्न ऊभा ठाकलेला आहे.

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याची वेळ आलेली आहे. दरवर्षी साधारणपणे 1५ जून ला वाजणारी शाळेची घंटा यावर्षी वाजणार नाही. शाळा बंद-शिक्षण सुरु या सरकारी धोरणानुसार शिक्षण चालू ठेवले जाईल. शाळा महाविद्यालये सुरू करण्याबाबत शासनाचे जे आदेश येतील त्यानुसार पुढील शैक्षणिक वर्षाचे नियोजन करावे लागणार आहे. देशपातळीवर त्या त्या विभागातील परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातील.

प्रामुख्याने महाराष्ट्राचा विचार केला तर मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, सातारा, औरंगाबाद इत्यादी शहरांमध्ये आणि अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढतच आहे. यापैकी काही शहरांचा समावेश रेड झोनमधे झालेला आहे हे आपल्याला दिसून येते. त्यामुळे प्रत्यक्ष शाळा कधी भरतील याबाबत अनिश्चितता आहे.

विद्यार्थी शाळेत जरी येऊ शकले नाही तरी शिक्षण चालू राहिल. शिक्षकांना ऑनलाइन पध्दतीने शिकवावे लागेल. ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांचा अभ्यास घेण्याचे आव्हान आहे. त्यासाठी विद्यार्थी पालक आणि संस्थाचालक यांच्या मतानुसार पुढील नियोजन करावे लागेल. शाळा सुरू होण्यासाठी अडचणी अनेक आहेत. आव्हाने ही बरेच आहेत. परंतु आपल्याला त्यावर मात करायची आहे. कोरोनानंतरचे शिक्षण आणि समोर ऊभ्या असलेल्या अडचणी/आव्हाने पुढील प्रमाणे आहेत.

पहिले आव्हान म्हणजे ज्यावेळी भविष्यात शाळा सुरु होतील त्यामुळे *मुलांची बैठक व्यवस्था*- शहरी आणि ग्रामीण भागातील बहुतांश शाळा/संस्था संस्थात्मक अलगीकरणाच्या कामासाठी सरकारने ताब्यात  घेतलेल्या आहेत अशा शाळांमध्ये सोशल डिस्टंन्स पाळून विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था होणे शक्य होईल का? याचा विचार सर्वात अगोदर करावा लागेल. भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील सध्याची विद्यार्थी संख्या पाहता शहरांमध्ये पुरेशा प्रमाणात वर्ग/जागा उपलब्ध होणार का? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. जर जागा ऊपलब्ध होणार नसेल तर वेगवेगळ्या सञांमधे शाळा चालू करण्याचा विचार करावा लागणार आहे.

विद्यार्थ्यांची संख्या बघून सकाळ सत्र /दुपारचे सत्र/ सायंकाळ सत्रामध्ये विभागणी केल्यास आपल्याला सोशल डिस्टंसिंग चे पालन करता येणे शक्य होणार आहे. गर्दी होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्यावी लागेल.

दुसरे महत्त्वाचे आव्हान म्हणजे

*स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण राखणे*. कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच संसर्ग थांबविण्यासाठी शाळेमध्ये पुरेशी स्वच्छता ठेवावी लागेल. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वापरल्या जातील त्या बाकांची स्वच्छता ही वारंवार करावी लागेल. प्रतिकारक्षमता कमी असलेल्या या बालकांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन पडणार आहे. त्यामुळे शाळेच्या वर्गखोल्या, प्रयोगशाळा, ग्रंथालये, हॉल या ठिकाणी पुरेशी स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करावे लागणार आहे. दरवर्षी पेक्षा उशिराने जरी शाळा सुरू झाल्या तरी चालू वर्षांमध्ये देण्यात येणाऱ्या सुट्ट्यामधे कपात करुन कामाचे दिवस भरुन काढता येतील. त्याचप्रमाणे पाठ्यपुस्तकातील काही घटक यावर्षीपुरते कमी करता येईल का? याचीही चाचपणी करावी लागेल.

*तिसरे महत्त्वाचे आव्हान म्हणजे ऑनलाइन शिक्षण* .सरकारने वेळोवेळी दिलेल्या खबरदारीच्या सूचना, सध्या बंद असलेली सार्वजनिक व्यवस्था (रेल्वे/रस्ते), सोशल डिस्टंसिंग चे नियम इत्यादी कारणांमुळे प्रत्यक्ष शाळेत उपस्थित न राहता पारंपारिक शिक्षणाच्या ऐवजी ऑनलाइन (डिजिटल) शिक्षणाचा पर्याय आपल्यासमोर येत आहे. तसे झाले तर घरात बसून विद्यार्थीही ज्ञानार्जन करु शकतात. अशा साधनांचा वापर वाढायला हवा. चित्रफीती, ध्वनीफिती, दूरदर्शन, रेडिओ, यूट्यूब यासारख्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे विद्यार्थ्यांना ज्ञान देता येईल. यावर राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद काम करत आहेच. या तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याचे प्रशिक्षण शिक्षकांना द्यावे लागणार आहे. डिजीटल क्लासरुम ही संकल्पना रुजवावी लागणार आहे आणि त्यासाठी वेगवेगळे ॲप्लीकेशन्स, अँड्रॉइड फोनवर ऊपलब्ध आहेत. उदाहरणार्थ गूगल मीट , गूगल क्लासरूम, झूम ,वेबेक्स इ. त्यासोबतच युट्युब, व्हाट्सअप, मोबाईल फोन, लँडलाईन फोन यावरुन देखील शिक्षक विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहू शकतात. विद्यार्थ्यांचे अध्ययन झाल्यानंतर त्याचे मूल्यमापन करण्यासाठी देखील google form, टेस्टमोझ (testmoze), काहूत (kahoot) यासारखे साधने(tools) निश्चितच पूरक ठरु शकतील. त्यासाठी अगोदर शिक्षकांनी हे तंत्रज्ञान आत्मसात करावे लागेल आणि ते आव्हान महाराष्ट्रातील सर्व शिक्षक सहजपणे स्वीकारतील असा मला विश्वास वाटतो. सर्वच विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्या जवळ स्मार्टफोन असतील का? ही शंका आपल्या समोर आहेच. महाराष्ट्रातील ग्रामीण भाग आणि आदिवासी भागामधे अनेक ठिकाणी गतीमान इंटरनेट सुविधा उपलब्ध होईल का? असा देखील मोठा प्रश्न आहे. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणातील अडचणी कळू शकतील आणि खेड्यापाड्यांमधील, आदिवासी पाड्यासारख्या दुर्गम भागांमधील अनेक समस्या पुढे येऊ शकतात. त्याचप्रमाणे अतिशय गरीब कुटुंबाकडे टीव्ही देखील नाहीत त्या ठिकाणी ऑनलाइन शिक्षणाला मर्यादा येऊ शकतात. ऑनलाइन पाठ घेताना तीन टप्प्यांमध्ये तयारी करावी लागेल. उदा. ऑनलाइन पाठ सुरू करण्यापूर्वी, ऑनलाइन पाठ सुरु असताना आणि ऑनलाइन पाठ संपल्यानंतरचे मूल्यमापन.

लॉकडाउन नंतरचे शिक्षणापुढील नंतरचे चौथे आव्हान* म्हणजे दर्जेदार सरकारी शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्याचे. प्रभावीपणे अध्ययन- अध्यापन करण्यासाठी शिक्षक वेगवेगळ्या माध्यमातून काम करतच राहतील. याचबरोबर शासनस्तरावरून वेगवेगळ्या वाहिन्या सुरू झाल्या तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करणे सोपे होईल. तंत्रस्नेही शिक्षकांची भूमिका अध्यापन साहित्य तयार करण्यासाठी महत्त्वाची राहणार आहे.

* पाचवे आव्हान म्हणजे पालकांची भूमिका*.

प्रत्यक्ष शाळा ज्यावेळी सुरु होतील त्यावेळी अनेक पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यास तयार होतील का? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आपल्या समोर आहे. शहरातील अनेक कुटुंबे कोरोनाच्या भीतीने वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतररित झालेले आहेत. ते आपापल्या गावी परत गेलेले आहेत. आपापल्या राज्यांमध्ये/गावांमधे गेलेल्या विद्यार्थ्यांना देखील शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात ठेवावे लागेल. म्हणून पालकांचे आणि मुलांचे समुपदेशन किंवा प्रबोधन करण्याची जबाबदारी परत एकदा शिक्षकांसमोर येऊ शकते आणि सकारात्मकरीत्या त्याचा पाठपुरावा करण्याचे आव्हान शिक्षकांसमोर असेल. कोरोनाबद्दल बोलत असताना कोरोनासोबत जगायचे आहे. त्याच्यासोबत शिकायचे देखील आहे. इंटरनेटचा वेग कमी असणे, वीज पुरवठा खंडित होणे, विद्यार्थ्यांकडे मोबाईल /लॅपटॉप नसणे यासारख्या समस्यांवर देखील मार्ग काढावा लागणार आहे. ऑनलाइन तासाला बसण्याची विद्यार्थ्यांची मानसिक तयारी करून घेणे हे देखील शिक्षकांसमोर मोठे आव्हान असणार आहे आणि त्यामध्ये पालकांचाही शंभर टक्के प्रतिसाद, सहभाग आणि सहकार्य आपल्याला घ्यावे लागणार आहे. थोडक्यात फिजिकल शिक्षणाकडून डिजिटल शिक्षणाकडे जाण्याची तयारी आपण करत आहोत आणि ही तयारी करत असताना *ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षणाची सांगड योग्यप्रकारे घालावी लागेल*. शिक्षण विभाग, स्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांची उपलब्धता, विद्यार्थी आणि पालकांची मानसिकता यावर भविष्यातील शिक्षणाची दिशा अवलंबून राहिल हे माञ नक्की.

लेखक, *प्रा.शरद अर्जुनराव पालवे* श्रीमती.एस.टी. मेहता विमेन्स ज्युनियर कॉलेज,घाटकोपर(प.) मुबई. संपर्क -8080243287

for more such articles visit www.mahaedunews.com

send your articles to mahaedunews@gmail.com

MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
×
MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
Latest Posts

Comments (2)

  1. All challenges explained and All problem covered this article in detail. Really it is useful for everyone. Very Nice article Sir. Thanks Sir.

  2. Thanks sir

Comment here