Life Explained

*ll संवाद गुरुजनांशी..ll* : श्री अरुण बोऱ्हाडे

काल अक्षय्यतृतियेच्या निमित्ताने मी माझ्या शालेय जीवनातील गुरुजनांशी मोबाईलवरून संवाद साधला.  मोशी गावातील श्री नागेश्वर विद्यालय ही माझी शाळा. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत आम्ही या शाळेत शिकलो. शिकलो म्हणजे केवळ प्रश्नांची उत्तरे लिहायला किंवा गुणांची टक्केवारी मिळवायला शिकलो नाही. तर जगण्याची गुणवत्ता शिकलो. जीवन जगायला शिकलो, संकटावर मात करायला शिकलो, माणूसकी जपायला शिकलो. समाजात सदाचार, बंधूभाव, आदर आणि राष्ट्रनिष्ठा जपायला शिकलो. तो काळच तसा होता. राष्ट्रप्रेमाने भारावलेले,  समाजाविषयी आत्मियता असणारे आणि अहोरात्र विद्यार्थी घडविण्याचे व्रत घेतलेले ध्येयवादी शिक्षक आंम्हाला लाभले. याचा आंम्हाला, आमच्या पिढीला निश्चितच अभिमान वाटतो. म्हणूनच आजही ३५-४० वर्षांनी देखील त्या गुरुजनांची भेट घ्यावीशी वाटते, विचारपूस करावीशी वाटते. एवढेच नव्हे आजही त्यांचे मार्गदर्शन घेऊन, आम्ही गुरुचरणी नतमस्तक होतो.
आमचे मराठीचे शिक्षक श्री ए.सी.अरण्य सर, प्रथम शाळेत आले तेव्हाचे एक सळसळते तारुण्य ओतप्रोत भरलेले, मध्यम उंचीचे, तेजस्वी डोळ्यांचे आणि ओजस्वी वाणीचे भारदस्त व्यक्तीमत्व डोळ्यांपुढे उभे राहते. पहिल्याच तासाला सरांनी ‘सत्य म्हणजे काय ?’ हे शिकविले, सत्याची व्याख्या सांगितली. नंतर सरांनी शिकविलेले संत ज्ञानदेवांचे ‘पसायदान’ आयुष्यभर लक्षात राहिले. अरण्य सर आम्हांला पाच वर्षे “वर्गशिक्षक” होते. त्यांनीच मला वाचनाची गोडी लावली, जी आजही टिकून आहे.
सकाळीच सरांना फोन केला, तब्येतीची चौकशी केली. सध्याच्या लॉक-डाऊन बाबतही बोलणे झाले.
इंग्रजी म्हटले की, श्री ए.पी.नेवसे सर आठवतात. सडसडीत शरीरयष्टी, एक फुटभर लांबीची पातळशी छडी हातात असायची. आम्ही ग्रामीण भागातील मुलं, पाचवीला पहिल्यांदा ए बी सी डी लिहायला शिकलो. पण या सरांनी इंग्रजीची बाराखडीच करून घेतली, स्पेलिंग पाठ करून घेतले. कोणी आळस केला की, त्याला चांगला आठवणीत राहील असा ‘प्रसाद’ मिळायचा. पुढे काही महिन्यांतच आमची इंग्रजीशी गट्टी जमली. सरांशीही बोलणे झाले. मोरगांवला सर स्थायिक आहेत. ते म्हणाले, ‘सरकारने सांगितलेय ना कोरोना नको असेल तर, संपर्क नकोय, सर्वांनी घरात बसाना. मग लोकांना कळायला नको का, पोलिस बळ वापरूनही काहींना समजत नाही.’ सरांची काळजी ओसांडून वाहत होती.
 श्री ए.एस. काटकर सरांचे इंग्रजी व्याकरण.. बापरे ! (सर, सॉरी.. पण तुम्ही बाप माणूसच !) एखाद्या  सिनेमातील स्मार्ट हिरो शोभतील, असे सरांचे व्यक्तीमत्व ! आजही तितकेच प्रसन्न असतात. या दोन्ही सरांनी इंग्रजीची केलेली पायाभरणी मला स्वतःला आयुष्यात खूप उपयोगी ठरली. खरे तर, स्वतःच ग्रामीण भागातून, गरीब कुटूंबातून आलेले आमचे हे सर्वच शिक्षक खूप पोटतिडकीने शिकवायचे. भूगोलाचे श्री बी.जी.अजाब सर समोर उभे राहिले तरी भीती वाटायची. पण प्रत्यक्षात खूपच प्रेमळ होते. भूगोल शिकविताना आधी बोजड वाटलेला विषय, सरांनी सहजसोपा करून सांगितला. एकदम जिंदादील व्यक्ती ! विज्ञान सोपे करून शिकवावे, ते आमच्या अडागळे मॕडम यांनी. मुलांवर अतिशय प्रेम करायच्या. विशेष म्हणजे त्याकाळीही आमच्या शाळेची प्रयोगशाळा सुसज्ज होती. ‘सायन्स प्रॕक्टिकल’ असले की भारी मजा वाटायची, आपण विज्ञानाचे कोणी तरी होणार असे वाटायचे. या मॕडमने पुढे पी.एच.डी. मिळविली. सध्या ज्ञानेश्वरी वाचन चालू आहेत म्हणाल्या. गणिताचे श्री एन.एस. आवारी सर, गणित-भूमितीची भीतीच उरायची नाही विद्यार्थ्यांना ! कान पिळून गावरान बोलीत ढोसायचे, समजले नसेल तर पुन्हा पुन्हा विचारा म्हणायचे ! त्यावेळी “विद्यार्थी बचत बँक” (संचयिका) असायची, त्याची जबाबदारी श्री आवारी सरांकडे होती, विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून सरांबरोबर बरेच वर्षे मी काम करीत होतो. सर सांगवीत राहतात. इतरही आमचे शिक्षक आहेत, मात्र कालपरत्वे त्यांचा संपर्क नाही.
आमचे मुख्याध्यापक श्री बी.डी.गोफणे सर, ओठांवर जाडसर मिशी आणि तीक्ष्ण नजर.. सरांपुढे एखाद्याला उभे केले तर..! कडक आणि शिस्तप्रिय व्यक्तीमत्व. अर्थात शाळेचे कुटूंब प्रमुख म्हणून शोभायचे. काही वर्षांपूर्वी आम्ही आमच्या बॕचचा स्नेहमेळावा घेतला होता. सर्व शिक्षकांना निमंत्रित केले होते. सरांचे वय झाले म्हणून त्यांच्यासाठी गाडीची व्यवस्था केली होती. अकराची वेळ होती, आमच्या गाडीची वाट न पाहता, सर दहा वाजताच मोशीत हजर ! मुंढव्याहून मोटारसायकलवर आले, वय ७५ च्या पुढे असेल तेव्हा ! शाळेमध्ये तासभर आधी येण्याची सवय जडलेली ! (या सरांना फोन नाही झाला.)
खरे तर आमच्या प्रत्येक शिक्षकांविषयी मी पुष्कळ लिहू शकतो. पण लेखनाला मर्यादा असतात आणि त्या पाळाव्यात.
या आमच्या शिक्षकांनी दहावीपर्यंत आंम्हाला ज्ञान दिले, पुढील काळासाठी जगण्याचे भान दिले. त्याच शिदोरीवर आम्ही सर्वजण अजून लढतोय ! त्याकाळी गुण कमी पडले म्हणून आत्महत्या करणारे विद्यार्थी नव्हते किंवा अभ्यासासाठी शिक्षकाने मारले म्हणून विचारणारे पालकही नव्हते. शाळेच्या वेळेआधी तासभर शाळेत जाणारे आणि शेवटच्या तासाला, शाळा सुटली तरी शिकवत राहणारे शिक्षक आम्ही अनुभवलेत. खरे तर आमची शाळा व शिक्षक आम्हाला एखादा परिवार वाटायचा, असा परस्परांशी जिव्हाळा होता.
स्वामी विवेकानंद म्हणतात, ” शिक्षण म्हणजे, पदव्यांच्या भेंडोळ्यांनी घर भरणे नव्हे, तर या व्यवहारी जगात माणूस म्हणून आत्मविश्वासाने उभे राहण्याची ताकद प्राप्त होणे, म्हणजे शिक्षण.” मला वाटते, आमच्या सर्व शिक्षकांना खरे विवेकानंद कळाले होते. साने गुरुजींचे संस्कार समजले होते. विश्वप्रार्थना सांगणारे संत ज्ञानेश्वर आणि जगण्याचे तत्त्वज्ञान सांगणारे संत तुकारामही उमगले होते.
या सर्व गुरुजनांशी काल आठवणीने संवाद केला. ख्याली-खुशाली विचारली. प्रत्येकाशी आपुलकीने गप्पा झाल्या. शाळेतील आठवणींना उजाळा मिळाला. प्रत्येकाचा आनंद संभाषणात जाणवत होता. शब्दांमधून प्रेमाचा झरा झिरपत होता. आज हे सर्वजण सुमारे सत्तर – बहात्तर वयोगटातील आहेत. पण तोच उत्साह, तीच आत्मियता आणि मन भरून आशिर्वाद द्यायला विसरत नाहीत. ‘काळजी घे, मोठा हो. बाकीच्यांनाही सांग.’
..खरे तर आम्ही मातीचे गोळे. या मातीच्या गोळ्यांना त्यांनी कान दिले, डोळे दिले, हात दिले, आत्मबळ दिले आणि एक सुंदर मनही दिले. त्यांचे ऋण कसे फेडणार आम्ही ! उलट आजही ते ‘मोठा हो’ असाच आशिर्वाद देतात, तेव्हा मन भरून येते. अशा गुरुजनांच्या ऋणात राहणेच योग्य ठरेल. हे सर्व गुरुजन म्हणजे आंम्हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील संस्कारपीठ आहेत. त्यांच्या आठवणी हा अनमोल ठेवा आहे. तो विसरता येत नाही. फुल वेलीपासून अलग झाले तरी सुगंध दरवळतच राहतो, तसेच या शिक्षकांचे आहे. त्यांच्याविषयी मनोभावे कृतज्ञता व्यक्त करून थांबतो.
*अरुण तुकाराम बोऱ्हाडे* (मोशी, ता.हवेली, जिल्हा- पुणे)
for more such articles visit www.mahaedunews.com. send your artilces to mahaedunews@gmail.com
MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
×
MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
Latest Posts

Comments (1)

  1. Nice Article, Every Teacher plays his Key Role in Developing his every student, it all depends on how the students reciprocate to, like it is said the Midas touch, the teacher moulds the Clay Ball into a Nice Beautiful POT.

    Reminded me of my Teachers at Primary , Secondary, Higher Secondary , UG and PG Mentors….
    Thanks again for the nice article

Comment here