शाळेच्या परिसरात जेव्हा जेव्हा मी जातो तेव्हा मी मला वेगवेगळ्या ठिकाणी शोधू लागतो. वेगवेगळ्या रुपात मी मला दिसू लागतो.
सैन्यातून निवृत्त झालेले अधिकारी कै. कॅ. शिवरामपंत दामले यांनी स्थापन केलेली ही संस्था आपल्या विद्यार्थ्यांनी सैन्यात गणवेशात जावे या कल्पनेने त्या काळी स्वीकारलेले एक स्वप्न होते. त्यामुळे अर्थातच करड्या शिस्तीचा असलेला खाकी रंग हाच आमचा गणवेश होता.
शाळेत पाऊल आत टाकताच आजचा गणवेश जरी वेगळा असला तरी माझ्या शाळेचा काळ माझ्या समोर येत असल्याने मला माझ्याच वेळेचे विद्यार्थी सर्वत्र दिसू लागतात. अचानक कानावर ओळी पडू लागतात.
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडविन राई राई एवढ्या !
ही वीररसाने भरलेली कविता त्या काळातील आमच्या शिक्षकांनी आमच्या रोमारोमात रुजवलेली आहे .त्याचं कवितेवर शिक्षकांनी घेतलेल्या कष्टामुळे वर्ग मित्रांनी दिलेल्या साथीमुळे मी माझे पहिले व्यासपीठावर पाऊल स्नेह संमेलनात टाकले. तो मावळ्याचा असेलेला वेष तो जोष, त्यापंक्ती
पोर म्हणूनी हसण्यावारी वेळ नका नेऊ ही
मला का ओळखले हो तुम्ही ?
हा मर्द मराठ्याचा मी बच्चा असे
हे हाड ही माझे लेचेपेचे नसे
या नसानसातून हिंमत बाजी वसे
आजही मला रोमांचित करतात. व.भा पाठकांच्या त्या ओळी सहज छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा मावळा ह्या मधील नात नेतृत्व कस असाव हे शिकवून गेल्या . आज सिक्यूरीटी कंपनीना सल्लगार म्हणून काम करताना अनपेक्षित चेकिंग कस करावा ह्याचा बोध ही मिळाला. आज कोणा उच्चपद्स्थाना भेटायला गेल्या नन्तर जर सुरक्षा रक्षकांनी अडवलं तर छान वाटत .आणि ह्या ओळी परत आठवतात.
शाळेचा सुंदर असलेला निसर्गरम्य परिसर भरपूर झाडी शाळेला सुरवात झाल्या नंतर पहिला येणारा उत्कट महिना श्रावण आसमंतात ढगांचा लपंडाव इंद्रधनूची बरसात मातीचा सुगंध त्याच बरोबर वर्गात शिकवली जाणारी कविता
श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे
ही कविता वेगवेगळ्या वस्तीतून वेगवेगळ्या वातावरणातून आलेले विद्यार्थी जणू त्या सप्तरंगी इंद्रधनुष्याचा अविष्कार असायचे शिकवणाऱ्या शिक्षकांचा नाद युक्त आवाज ,बालकवींच्या पंक्ती, खिडकीतून दिसणारा निसर्ग, सरसरणाऱ्या श्रावणसरी आम्हाला ह्या कवितेमध्ये तल्लीन करून जायच्या.
आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यातून कवितेचे वेगवेगळे अर्थ अभिप्रेत करणारी कविता “ओदुंबर”
ऐल तटावर पैल तटावर हिरवळी घेऊन
निळासावळा झरा वाहतो बेटाबेटांतुन
त्या वेळी फारशी कळायची नाही ज्ञानरूपी तृप्तेचा आध्यात्मिक प्रारूप वाटणारा औदूंबर अनुभववा महुणून समोर असलेल्या पाण्याच्या तळ्यात मी पाय बुडवून एकांतात तल्लीन होऊन जायचो. आजही एकांतात असतांना हा औदुंबर मनातली धीरगंभीरता वाढवून एका वेगळ्याच नेणीवे पर्यंत नेतो. अश्या काही कविता खरच रोजच वेगवेगळ्या संदर्भात आपल्या समोर आणतात. म्हणूनच आठवीत शिकलेली ही कविता आजही माझ्या सोबतीन चालली आहे
सामान्य परिस्थितीत लहानपण असल्याने वडिलांनी मानसिक एैश्वयाची ओळख करून दिली असल्याने चाळीतील दोन खोल्यांच्या घरा समोरील अंगणात रात्री पाठ ठेकून आभाळाकडे बघतांना वर्गात शिकवलेल्या कवितेतील दोन ओळी आठवायच्या
भूमीवर पडावे, ताऱ्यांकडे पहावे |
प्रभूनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ||
संत तुकडोजी महाराज यांचे शब्द रुपी ऐंश्वर्य किती विविध अंगाने आमच्या शिक्षकांनी शिकवले यांची आज हा लेख लिहितांना ह्याची कुठेतरी जाणीव होते.
आमच्या शालेय जीवनाच्या वेळेला स्वानुभवासाठी वेगवेगळ्या ठिकाणी निसर्ग शिबीर आयोजित केलेली असायची. त्यावेळी त्या रानावनात हिंडतांना सहजपणे आसमंतातून कविता शिकली जायची.
रंग रंगूल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला
असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा !
या कवितेमुळे छोट्या छोट्या रान फुलांवर कधी माझे प्रेम जडले कधी मला कळलेच नाही आज माझ्या ऑफिसमध्ये लावलेल्या कुंड्यामध्ये अशा छोटे छोटे रानफुले जोपासले आहेत. हस्ताक्षर विश्लेशक म्हणून न्यायालयीन प्रक्रीयेसाठी लागणारे अभिप्राय, धमक्या, सुसाईड नोटस या पत्रा मागील मानसशास्त्र व त्या संदर्भातील इतर कामे मी वेगवेगळे यंत्रणे साठी गेली कित्येक वर्ष केलेली आहे. या सर्व कामातून येणारा ताण नाहीसा करण्यासाठी आजही एखाद्या टेरेस वरील गवत फुलाच्या जवळ जाऊन ओळी गुणगुणू लागतो
हिरवी नाजुक रेशिम पाती,
दोन बाजुला सळसळती;
नीळ निळुली एक पाकळी,
पराग पिवळे झगमगती.तो.
आणि क्षणार्धात कामाचा ताण नाहीसा होऊन एक सातवीतील ही कविता आत्मसात करणारा एक निरागस बालक होऊन जातो.
आज बऱ्याच ठिकाणी 15 ऑगस्ट, 26 जानेवरी, 1 मे अशा कार्यक्रमांना पाहुणा म्हणून जावे लागते. घरातून निघतांना उंबरा ओलांडतांना नकळत माझे मन वर्गात शिकलेली
शतकानंतर आज पाहिली
पहिली रम्य पहाट
ही कविता गुणगुणायला लागतो. आणि त्याच्या दुसर्या कडव्याने
फकिरांनी शत यज्ञ मांडिले
वेदिवरती रक्त सांडले
त्या रक्ताची क्षितिजावर ये….
अरूण मंगल लाट
आज आपण किती मोठ्या अनेक स्वातंत्रवीर, समाजसुधारक यांनी घडवलेल्या भारताचे नागरिक आहोत हे जाणीव होऊन जबाबदारी वाढल्याची जाणीव होते.
पोलीस खात्यात बऱ्याच बहुतेक सर्वच प्रशिक्षण संस्थेत व्याख्याता म्हणून जात असल्याने “26/11” शहीद दिन अशा कार्यक्रमा मध्ये उपस्थित राहतो. तिथे असलेल्या स्मृती स्तंभासमोर उभा राहिल्यावर मनामध्ये रुजलेली कुसुमाग्रजाची जाज्वल्य शब्दांनी सजलेली कविता
अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात !
जिवंत व्हायला लागतो. शाळेत शिकत असतांना ह्या कवितेत असलेली घ्येयता, नाद, व शिक्षकांनी शिकवत असतांची हातोटी यावर ही कविता पाठ झाली जी आज पर्यंत कधीच विसरली जाऊ शकत नाही हीच ह्या कवितेची खासियत आहे. ह्यातील शेवटच्या ओळी
काळोखातुनि विजयाचा ये पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा !
मला स्तब्ध करून टाकतात
हस्ताक्षर विश्लेषक म्हणून काम करत असतांना मानसशास्त्रा चा अभ्यास सर्वात जास्त करावा लागत असतो. यांत्रिकी शाखेत सर्व शिक्षण जाल्याने १०वी नंतर मराठी हा विषय कधीच अभ्यासात नव्हता मानसशास्त्र हा विषय अभ्यासात नव्हता परंतु आज विविध ठीकांनी देशभर ही व्याख्याने देत असतांना मी मला विचारले की ही मानसशास्त्रा ची आवड कुठे निर्माण झाली. तेव्हा मला लक्षात आले वर्गात शिकत असतांना. एक कवियत्री ची भौतिक जगातील शाळेची पायरी चढली नाही परंतु निसर्गाच्या शाळेत अनुभवातून जिची .कविता ,जी किती डॉक्टरेट केलेल्या प्रबंधापेक्षा सरस आहे अश्या बहिनाबाईंची ही कविता शिकवतांनाच ,माझ्या शिक्षकानी आज माझ्या प्रोफेशनचे, व्यक्तिमत्वाचे वर्गामध्ये बिज पेरले
मन वढाय वढाय
उभ्या पीकांतलं ढोर,
किती हांकला हांकला
फिरी येतं पिकांवर.
सुवर्ण महोत्सवी समितीचा सचिव या नात्याने कित्येक महत्वाच्या जबाबदारी ने कामे करावी लागत आहे. आपण कुठेतरी आपल्या शाळेचे देणे लागतो. आपल्या भावी पिढीचं देणे लागतो. हे दान देणे आणि घेणे. यात कुठलीच व्यापारीवृत्ती येवू शकत नाही. कारण शिक्षकांनी शिकवलेली व स्वत:च्या वागणुकीतून रुजवलेली कविता
देणार्याने देत जावे;
घेणार्याने घेत जावे;
घेता घेता एक दिवस
देणार्याचे हात घ्यावे !
त्यात शिक्षिकांकडून देणारे ज्ञान रुपी हात, विध्यार्थी म्हणून घेणारे आमचे हात देणाऱ्याचे हात कधी झाली हे आम्हाला कळलेच नाही. हेच शिक्षकांचे देणे जणू ‘व सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमच “ सुवर्णलेण आहे “ असे वाटत आहे.
विस्तीर्ण असलेला असा शाळेचा परिसर व त्याचे कुठेही व्यापारीकरण न झाले शाळेचे प्रांगण आज माझ्या मनात आजी माजी शिक्षक संचालक यांच्याबद्दल एक वेगळाच अभिमान जागृत करतो.
वेगवेगळ्या वेळेला फेरफटका मारतांना ही संस्था आजूबाजूला सर्वत्र क्रीडाज्योत, ज्ञानज्योत तेवत ठेवत असते. त्यामुळे खरतर आजही माझी छाती अभिमानाने फुगत जाते.
वरील आठवणीत कुठल्याच शिक्षकांचा वैयक्तिक असा उल्लेख केला नाही कारण मला शिकवणारे सगळेच शिक्षक उत्तमातील उत्तम होते, खर तर सर्व शिक्षकांची नावे मी इथे लिहिली पाहिजे परंतु ते अवघड असल्यामुळे माझ्या सर्व शिक्षकांना माझे दंडवत आहे. या सर्वांच्याच मुळे आज मी घडलो आहे.
कबीरांनी लिहिलेल्या दोहा तून ह्या लेखाचा शेवट करत आहे.
…जाति न पूछो साधु की, पूछ लीजिये ज्ञान,
मोल करो तरवार का, पड़ा रहन दो म्यान।…
माझे कवितामय शालेय संस्कार – राजेंद्र भिडे
MahaEdu News
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.