Life Explained

” लॉक डाऊन — पाऊलखुणा “: रमेश मोरगावकर

गत जीवनात कधीतरी ऐकलेली एक गोष्ट सांगतो. एक मनुष्य झोपलेला असतो. झोपेत असताना त्याला एक स्वप्न पडते. स्वप्नात तो असे बघतो की, तो समुद्र किनाऱ्यावर उभा आहे. किनाऱ्यावर दूर पर्यंत पाऊलखुणा दिसत आहेत. परंतु काही ठिकाणी एकाच व्यक्तीच्या पावलांचे ठसे आहेत तर काही ठिकाणी दोन व्यक्तींच्या पावलांचे ठसे आहेत. तो मनाशी विचार करतो की हे कुणाच्या पावलांचे ठसे आहेत ? देवालाच ठाऊक असे तो म्हणतो आणि साक्षात देवच त्याच्यासमोर येऊन उभा राहतो. तो देवाला विचारतो की हे कुणाच्या पावलांचे ठसे आहेत ? देव त्याला सांगतो की ही तुझ्या आयुष्याची वाटचाल आहे. पण काही ठिकाणी एकाच व्यक्तींच्या पावलांचे ठसे, तर काही ठिकाणी दोन व्यक्तींच्या पावलांचे ठसे, असे का ? असा तो पुढचा प्रश्न विचारतो. तुझ्या आयुष्यातील जो सुखाचा काळ आहे त्या ठिकाणी दोन व्यक्तींच्या पावलांचे ठसे आहेत, तर ज्या ठिकाणी एकाच व्यक्तीच्या पावलांचे ठसे आहेत तो तुझ्या आयुष्यातील संकटाचा काळ, असे उत्तर देव देतो. दुसरी व्यक्ती कोण असे तो देवाला विचारतो. देव सांगतो की मी स्वतःच तो आहे. तो मनुष्य देवाला पुन्हा असे विचारतो की देवा माझ्या सुखाच्या काळात तु माझ्याबरोबर राहिलास पण माझ्या संकटांच्या काळात तु सुद्धा मला सोडुन गेलास. देव त्याला सांगतो की तु चुकतो आहेस, तुझ्या सुखाच्या काळात तुला मी माझ्या हाताच्या बोटाला धरून चालवले आहे म्हणुन तिथे दोन व्यक्तींच्या पावलांचे ठसे आहेत, तर तुझ्या संकटाच्या काळात ज्या एकाच व्यक्तीच्या पावलांचे ठसे दिसत आहेत ते माझ्या पावलांचे ठसे आहेत, कारण त्या काळात मी तुला माझ्या खांद्यावर बसवुन नेले आहे.

सद्य भयावह परिस्थितीत अशा कितीतरी देवदूतांनी आपल्या ” पाऊलखुणा ” उमटवलेल्या आहेत आणि आपल्याला खांद्यावर उचलुन घेतलेले आहे.

हे देवदुत आपल्यापेक्षा कोणी वेगळे आहेत असे नाही, हे सगळे आपल्यातलेच आहेत. ते नेमके कोण आहेत हे सांगण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही.

या लॉक डाऊन च्या काही पाऊलखुणा आपल्या दैनंदिन जीवनातही उमटलेल्या आहेत. त्या पाऊलखुणा सुद्धा आपण जतन करून ठेवल्या पाहिजेत.

गेल्या पाच महिन्यांच्या लॉक डाऊन चा नेमका काय अर्थ लावायचा याचा विचार केला असता काही गोष्टी समोर आल्या आहेत.

आपण सर्वच जण एक शिस्तबद्ध आयुष्य जगतोय असे आपल्याला वाटत नाही का ? विनाकारण घराबाहेर पडणे नाही, रस्त्यावर, गर्दीत, कट्ट्यावर, ओट्यावर तासनतास गप्पा मारणे नाही. किती तरी दिवसात हॉटेलमध्ये जाऊन चहा घेतलेला नाही, बाहेरचे खाणे बंद झाले आहे.

आपण विनाकारणच किती फिरायचो. काढली गाडी की आलो चक्कर मारून. खरं तर इतर मोकळ्या दिवसांमध्ये आपण किती इंधन वापरत असणार.

अचानकच सगळ्यांचे आरोग्य सुधारले. किरकोळ किरकोळ शारीरिक व्याधी ज्या आपल्या सर्वांच्या मागे हात धुवून लागल्या होत्या त्या कुठे आणि कशा गायब झाल्या आहेत ते आपल्या लक्षातही आले नाही. त्यातली सर्दी, डोकेदुखी आणि ऍसिडिटी या तीन महत्त्वाच्या बाबी. आता ऍसिडिटी सुद्धा होत नाही.सर्दी, घसा दुखणे आणि खवखव हे आजार तर आता गायबच झालेले आहेत. आपण आता कुणालाच न सांगता घरच्याघरी वाफ घेतो आहोत किंवा काढा करून पितो आहोत. गरम पाणी पिण्याचे प्रमाण वाढले आहे. आपल्या आरोग्यदायक सवयी वाढलेल्या आहेत. किरकोळ आजार आपण शरीरावरच सोडुन दिले आहेत. व्यायाम म्हणून फिरायला जाणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. सर्व जण आरोग्याविषयी जागरूक झाले आहेत. प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने व्यायाम करतो आहे. कोणी प्राणायाम करतो आहे तर कोणी सूर्यनमस्कार घालतो आहे.

कपाटातल्या कपड्याच्या थप्प्याना हात लागलेला नाही, नाही म्हणायला अंतर्वस्त्रे आणि बर्म्युडा, टी शर्ट, लोअर, पायजमा, लुंगी यांचा जास्त वापर झाला आहे. कितीतरी दिवसात नवीन कपड्यांची खरेदी नाही.

भरपुर मोकळा वेळ मिळाला आहे. आपले नातेवाईक, मित्रमंडळी यांना प्रत्यक्ष भेटु शकत नाहीत म्हणुन त्यांच्याशी फोनवरचे संभाषण वाढले आहे. सगळी नाती पुन्हा एकदा “रिचार्ज” होत आहेत. आपल्याला आपल्या माणसांची काळजी वाटायला लागली आहे. माणसाचे काही खरे नाही, काळजी घ्या असे आपण बोलायला लागले आहोत.

सगळ्यांनाच कुटुंबाला देण्यासाठी भरपुर वेळ मिळाला आहे. पुर्वी घरात बसलो तर जरा बाहेर जा असे सांगितले जायचे, आता जर बाहेर निघालो तर कुठे चाललात असे काळजीने विचारले जाते. नाही म्हणायला महिला मंडळींचे काम वाढलेच आहे. घरकाम वाढले आहे. लॉक डाऊन मध्ये वेगवेगळे पदार्थ करून खाल्ले गेले आहेत. सगळे जिभेचे चोचले पुरवून झाले आहेत. आज काय भजे, उद्या बटाटेवडा, परवा पिझ्झा, पाणीपुरी. आणि विशेष म्हणजे ते आपल्याला गोड ही लागले आहेत.

गत काळातील स्मृतींना उजाळा मिळाला. जुन्या फोटोंचे अलबम कुठे तरी कपाटात अडगळीत पडले होते, त्यांच्यावरची धुळ झटकली गेली. पुन्हा एकदा कुतूहलाने आपलेच फोटो पाहिले गेले. ते फोटो पाहता पाहता आपण आपल्याच गतकाळात डोकावुन आलो. डोक्यावरील केसांचे वैभव बघताना आत्ताचे टक्कल बघुन हळहळलो.

कुटुंबातील सदस्यांच्या बरोबरचा संवाद वाढला आहे. आजी, आजोबा, आई, वडील, मुलगा, मुलगी किंवा इतर घरातील सदस्य यांच्या बरोबरचे नाते पुन्हा रिचार्ज झाले आहे. बारावीच्या मार्कांची फारशी चर्चा झालेली नाही की दहावीच्या मार्कांची फारशी चर्चा झालेली नाही. आपल्या दहावी, बारावी झालेल्या पाल्यांना जवळच कसा प्रवेश घेता येईल याचा विचार केला जात आहे.

प्रत्येकाला आपले छन्द पुर्ण करायला वेळ मिळतोय. काही जण हार्मोनियम घेऊन बसत आहेत. कित्येक दिवसात इच्छा असूनही गाणे म्हणता येणारी मंडळी त्या पासून दूर गेली होती, ती आता गाणे म्हणू लागली आहे. बऱ्याच दिवसांचे वाचन करायचे राहिले होते, ते आता वाचले जात आहे. लिखाणाच्या माध्यमातून अनेक जण व्यक्त होऊ लागले आहेत.

व्हाट्सएपचे नवीन नवीन ग्रुप तयार झाले. दिवसभरात हजारो संदेशांची देवाण घेवाण होऊ लागली. ते संदेश नष्ट करण्याचे एक कामच होऊन बसले.

मित्रांनो खरं तर असा एक ब्रेक आपल्या सर्वांच्या आयुष्यात खुपच आवश्यक होता. आपण सर्वचजण खुपच धावपळीचे आयुष्य जगत होतो. स्वप्नं पुर्ण करण्याच्या धावपळीत आपण आपलं खरं सुख कशात आहे हे सुद्धा विसरून गेलो होतो. माझा जगण्याचा नेमका आंनद कशात आहे हे ही आपण विसरून गेलो होतो. माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी माझी माणसं, माझे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी, हितचिंतक हीच माझी खरी संपत्ती हे या लॉक डाऊन ने आपल्याला शिकवले. पण त्यासाठी आपल्याला खुप मोठी किंमत चुकवावी लागलेली आहे याचे भान आपल्याला पुढील काळात ठेवावे लागणार आहे. जर आपण यातुन काही शिकलो तरच आपण या पुढे आंनदी जीवन जगु शकु.

आपण त्या इतरांच्या पेक्षा खुपच भाग्यवान आहोत की ज्यांचे रोजगार लॉक डाऊन ने हिरावून घेतले, ज्यांना आपलं सर्वकाही गमवावे लागले आहे, ज्यांना खुप मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे, ज्यांना घरी जाण्यासाठी कित्येक मैल पायी चालावे लागले, ज्यांना या आजारामुळे आपल्या प्रियजनांच्या वियोगाचे दुःख सोसावे लागले, समाजाच्या तिरस्काराच्या नजरा झेलाव्या लागल्या .

आपण त्यांचे कायम आभार मानले पाहिजेत की ज्यांनी अत्यन्त भीतीदायक वातावरणात प्रत्यक्ष मैदानावर काम केलेले आहे आणि आपल्या शरीराची व मनाची दारे उघडण्याची आपल्याला संधी दिलेली आहे.

व्यक्त होणे ही प्रत्येकाची गरज आहे. आपल्या कोंडुन ठेवलेल्या भावनांना वाट करून द्यायचे काम या लॉक डाऊन ने केले. आपण सर्वच जण एका सामुहिक भितीच्या सावटाखाली असल्याने आपले सर्व लक्ष आपण फक्त आणि फक्त जगण्यावरच केंद्रित केले. त्यामुळेच आपले कुटुंब, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याबरोबर आपल्या भावनांना आपण वाट मोकळी करून दिली.

सर्वात महत्वाची बाब जी समोर आली ती म्हणजे कोरोना ने सर्वांना एका समान पातळीवर आणुन सोडले. ना श्रीमंत, ना गरीब , ना धर्म, ना जात, ना पंथ. आपण सर्व जण मर्त्य मानव आहोत हे कोरोना ने आपल्याला शिकवले.

पण आता हे थांबायला पाहीजे, मानवी सहनशीलतेच्या पलीकडे हे सगळे गेले आहे, आता पुन्हा कुणाच्याच आयुष्यात लॉक डाऊन नको.

अब बस,
अब ज्यादा ख्वाहिशें और नहीं
ऐ जिंदगी ,
बस आनेवाला पल ,
पहले से कुछ बेहतर हो ।

रमेश मोरगावकर

for more such articles visit www.mahaedunews.com; send your articles to mahaedunews@gmail.com

MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
×
MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
Latest Posts

Comment here