१५ जून ९२. शाळेचा पहिला दिवस होता…थोड़ी भिती, थोड़ी आतुरता, थोड़ी धास्ती…..सगळयाच भावनांच मिश्रण होतं डोक्यात. सकाळी लवकर आवरुन, नाश्टा करुन, कड़क इस्त्री केलेला शाळेचा खाकी सैनिकी यूनीफ़ॉर्म घालून थोडं लवकरच शाळेत पोचलो. शाळेची ती भव्य इमारत,चकाचक रस्ते, स्वच्छ गार्डन……..सर्व कसं अगदी उत्साहाच वातावरण होतं. शाळेच्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर इंग्रजीमध्ये भल्यामोठया अक्षरांत ‘SAINIK SCHOOL SATARA’ लिहिलेलं होतं. आता खर सांगायला गेलं, तर शाळेचं नाव आधीच माहिती असल्यामुळे हे नाव वाचनं मला काही खास अवघड़ गेल नाही; नाहीतर आम्हा मराठी मीडियमवाल्यांची काय मजाल पहिल्याच प्रयत्नात इंग्रजी वाचन्याची आणि वरुन ते लगेच समजन्याचीही! असो.
शाळेत शिरताच आमचं स्वागत केलं काचेत बंद असलेल्या खर्याखुर्या चित्त्याच्या त्या भयानक प्रतिकृतीने…अन् त्याहीपेक्षा भयानक होता तो त्याच्याबद्दल तिथे लिहिलेला तो मजकूर…..कारण तो सम्पूर्ण मजकूर इंग्रजीत होता!!! वाचन्याचं सोंग आणून नुसती मुंडी हलवून पुढ़े निघालो. आता मात्र आजुबाजूला इंग्रजीमध्ये लिहिलेल्या सुविचारांनी माझं पानीपत करायला सुरूवात केली होती. NDA मधे निवड़ झालेल्या क्यॅडेट्सच्या नावांचा इंग्रजी बोर्ड, नोटिस बोर्ड, हा बोर्ड, तो बोर्ड, सुविचार या सर्व इंग्रजी वातावरणाने लागलीच मनात एक न्यूनगंड तयार केला. त्यातल्यात्यात त्या पुण्यामुंबईच्या पोरांनी धड़ाधड़ इंग्रजी वाचून-बोलून अशी शायनिंग मारली, की आता फक्त रड़ायचच बाकी राहीलं होतं तेवढ़…वाटलं, चायला आपल्याला जमेल का हो ही फ़ॉरेन भाषा कधी? तरीपण सर्व काही समजत आहे अशी ऍक्टिंग करत, गपचूप ‘इंग्रजांच्या’ मागेमागे कसबसं वर्गात पोचलो. वर्गात पोचल्यापोचल्या आम्हाला पुस्तकांच वाटप करण्यात आलं. आयला पुस्तकं उघड़ली आणि गोळाच आला पोटात…’मराठी’ हा विषय वगळता इतर कुठल्याही पुस्तकात मराठीचा थांगपत्ताही नव्हता! Only English…सर्व पुस्तकं ज़शी उघड़ली तशीच बंद करुन बाज़ुला ठेवुन दिली..आता ही तर चिटिंगच झाली ना राव; म्हणजे ज्याने आयुष्यात जेमतेम पाण्याचा ओढ़ा कसाबसा पाहिलाय, त्याला तुम्ही एकदम समुद्रात नाही ना फेकू शकत पोहायला!…असो.
वर्गात सर्वप्रथम एंट्री झाली एका सरांची. आता सरांची सासुरवाड़ी नगरकड़ची असल्याने एकदम दिलासा मिळाला. म्हणलं आपल्याकड़च कुणीतरी भेटलय, मनसोक्त गावाकड़च्या गप्पा हाणतील. आयला कशाच काय राव… सरांनी जी इंग्रजी मारायला सुरुवात केली-ज्योग्राफ़ी, अर्थ क्रस्ट, मोल्टन मैग्मा, वॉटर पॉवर प्रोझेक्ट, डेक्कन प्लाटु…….अबब, जणु काही आपल्याच मित्राने आपल्या पाठित सुरा खुपसल्याचा भास झाला. अर्ध्या तासाच्या इंग्रजी भड़ीमारानंतर आमच्या केविलवान्या चेहरयांवर त्यांना कीव आली असावी बहुधा. लेक्चर मधेच थांबवून त्यांनी विचारलं-
“Why are you looking so sad? I hope you are understanding what I am teaching”
आता या प्रश्नाला हसू की रडू ते कळत नव्हतं. म्हणजे हा हाच प्रकार झाला ना, की डिसेंबरच्या महिन्यात पहाटे ४ वाजता तुम्ही अंगावर एक बादली पाणी टाकुन कुणाला उठवताय, आणि त्याला अलगद विचारताय “बाळा, थंडी तर नाही ना वाज़ली तुला राजा?”
बर आता सरांशी इंग्रजी मधे काय बोलू आणि कसं बोलू हा प्रश्न पड़ला. भांडण झाल्यानंतर नवराबायको कशे एकमेकांशी अगदी अनोळखी असल्यासारखे वागतात, एकदम तीच feeling मला त्या दिवशी आपल्याच गावाकड़च्या आपल्याच माणसाशी परदेशी भाषेत बोलताना आली.
“सर, डोंट अंडरस्टैंडिंग, यू सेयिंग, व्हाट” कसबसं मी माझ्या पूर्ण आयुष्याच्या इंग्रजीचा अनुभव पणाला लावला.
“See, you have to try. Read English. It will take time but if you try you will learn.”
मी “सर, टीच अस इन मराठी…नाउ…देन समटाईम वुई लर्न…आफ्टर लर्न यू टीच इन इंग्रजी..” मी अक्षरशः गयावया करत होतो.
“हा हा हा, that is not possible, you have to learn. Anyway the class is over, but remember my words- प्रयत्न करा सर्व होईल …all the best.” बेल वाजली अन सर निघून गेले. आम्ही मात्र डोक्याला हात लावून बसलो.
तेवढ्यात गणिताच्या सरांची एन्ट्री झाली. 40 मिनिटे सर इंग्रजीत काय बोलले, फळयावर काय लिहिले आणि कधी गेले काही समजलच नाही. डोळ्यातून आपोआप पाणी ओघळायला लागलं. मागे वळून पाहिले तर बऱ्याच जणांची तशीच अवस्था होती. नगरचे दोन मित्र बरोबर घेतले आणि सरळ शेवटचा बेंच गाठला.
तोपर्यंत फिजिक्सचे सर आले. ते केरळचे होते. त्यांना हिंदी जमत नव्हतं आणि मराठीचा तर काही प्रश्नच नाही. मग काय, ते काय बोलताय ते आमच्या डोक्यावरून गेलं, आणि आम्ही काय बोलतोय हे त्यांना नाही समजलं. गपचूप शेवटच्या बेंचवर मान खाली घालून आम्हा तिघा दोस्तांनी शांतपणे रडायला सुरुवात केली;…..आणि अशा प्रकारे class after class शेवटच्या बेंचवर बसून मान खाली घालून रड़त बसण्याचा आम्हा मराठी मिडीयमच्या मित्रांचा सिलसिला सुरू झाला. शिकवायला कोण येतय कोण जातय काय बोलतय याच्याशी आम्हाला काहीएक घेणेदेणे नव्हतं; कारण काही कळतच नव्हतं.
तीन महिन्यांनी चाचणी परीक्षा झाली..निकाल पाहून पायाखालची जमीनच हादरली. गावाकडच्या मराठी शाळेत नेहमी पुढे असलेले आम्ही इथे मात्र पार नेस्तनाबूत झालो होतो. माझे मार्क होते ३० पैकी ९, ७, ४ आणि फ़िज़िक्स मधे भोपळा. मला तर समजेनाच काय करू. त्या रात्री झोपच लागली नाही. आता समोर दोन रस्ते दिसत होते. शाळा सोडून पळून जाणे किंवा परिस्थितीला सामोरे जाणे. मनात म्हणलं ‘यार अब हारने के लिए बचा ही क्या है? एक लास्ट ट्राय मार लेते है..’
मग काय, पूर्णपणे प्रामाणिक प्रयत्न करायचा ठरवला. सर्वात आधी मी माझा विक पॉईंट शोधला-इंग्रजी…इंग्रजी जमलं तर ९०% प्रॉब्लेम सुटतील हे मी हेरले. मग अलगद इंग्रजी मिडीयमच्या २-३ मुलांशी वर्गात मैत्री केली (एलेक्स देवदासन, दुर्गेश रणदिवे ई). त्यासाठी कधी त्यांचा मराठीचा homework लिहिला, कधी उपाशी राहून मधल्या सुट्टीतील स्वतःच्या वाट्याचा खाऊ त्यांना दिला, तर कधी संध्याकाळी त्यांना चहा नेऊन देऊन त्यांची मनं जिंकली. त्यांच्याशी 24 तास इंग्रजी बोलणे सुरू केले. तुटक्या-फुटक्या इंग्रजीमुळे बर्याचदा मित्रांच्या विनोदाच्या विषयही बनलो. पण टिकेकडे दुर्लक्ष केले. समोर फक्त नि फक्त एकच ध्येय होते-इंग्रजी शिकणे; नव्हे इंग्लिश शिकणे.
महिने दोन महिने गेले. मला चांगल्या प्रकारे इंग्लिश येऊ लागले. शिकविलेले सर्व समजू लागले. एवढेच नव्हे तर मी आत्मविश्वासाने वर्गात शंकानिरसन करून घ्यायला लागलो. हळुहळु मी पहिल्या बेंचपर्यंत पोचलो. मित्रांची, शिक्षकांशी आवर्जून इंग्लिशमध्ये बोलणे, इंग्लिश बातम्या बघणे, लायब्ररी मध्ये जाऊन इंग्लिश पेपर वाचणे हे आता रोजचे रुटीन झाले होते. हे सर्व बघून मराठी मिडीयमचे बरेच मित्र मला जॉईन झाले. आमचा एक ग्रुपच तयार झाला. हळुहळु प्रगती वाढत गेली. वार्षिक परीक्षा झाली आणि निकालाच्या दिवशी तर आमच्या आनंदाला पारावारच राहिला नाही. पहिल्या १० मध्ये आम्ही ८ जण मराठी मिडीयमचे होतो. तेही ९०% पेक्षा जास्त गुणांनी. त्यादिवशी शिवाजी हाऊस मध्ये खूप जल्लोष केला. Weak point ला आम्ही strong point मधे बदलावून टाकले होते. त्यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. इंग्लिश व्याख्याने केली, poems लिहिल्या, शाळेच्या Annual Magazine साठी English लेख ही लिहीले. पुढ़े जाऊन त्याच शाळेत बारावी मध्ये प्रतिष्ठेच्या English Debate Competition मध्ये गोल्ड मेडल मिळाले. त्याही रात्री झोप लागली नव्हती. ज्या चाचणी परीक्षेच्या निकालाच्या दिवशी झोप लागली नव्हती, ती रात्र स्पष्टपणे आठवत होती. मनात म्हणले, त्या रात्री माझ्या समोर दोन मार्ग होते-पळून जाऊन या सर्व प्रॉब्लेम मधून सुटकारा मिळविण्याचा सोपा मार्ग, किंवा प्रयत्न करून परिस्थितीला सामोरे जाण्याचा खडतर मार्ग. जर मी सोपा मार्ग निवडला असता तर?….
परमेश्वराने बुद्धी दिली आणि कष्टांचं चीज झालं.
या प्रकरणामुळे आयुष्याची शिकवण मिळाली- आपण कुठल्या मीडियममध्ये शिकलोय याने सरस ठरत नाही; तर सरस ठरतो आपल्या आत किती प्रामाणिक जिद्द आहे याने.
There is no substitute for hard work-Thomas Edison
My attitude is that if you push me towards something that you think is a weakness, then I will turn that perceived weakness into a strength- Michael Jordan
for more such articles visit www.mahaedunews.com
25 Comments
खरंच अप्रतिम अनुभव आहे…. वाचून खूप छान वाटले…एकदम शाळेचे दिवस आठवले….
मस्तच 😊
अजून असेच अनुभव वाचायला मिळावेत…
Waiting for Next Article….
Thank you
मस्तच सर ✌️👌👌👌👌
Thank you
Really Hat’s of to Devendra Sir , Dedication and devotion with very positive way out towards difficulties and challenges towards The Destiny , and moving with all bit by bit .
While reading article it recalls time and makes more strength ful.
Keep writing Sir.
Thank you
Good article. I underwent the same experience. Word to word is same.
Devendra, true as per name itself.
Had always been source of inspiration to us. We are because you were one of the pillar for our success.
It’s really touching ,we have gone through this phase ,very nicely written ,खूप छान
खरंच ते दिवस dangerous होते.
Today when we look back, brings back the memory of those terrible but awesome days 😊
Speaking of you… you are the star brother…. shining big n bright.
We admire you and are soopppper proud of you… fly high… fly beyond limits 🙏
खूप छान लेख आहे.
छान
Nice and motivational artical
Thank you
Dear Devendra excellent write up,,,,
खूप सुंदर लिहलयस….👌👌
Thank you
Delighted absolutely
Thank you vijay
Hardwork Never Fails🙌
Thank you Aishwarya
Very well expressed Devendra.
That was a situation we all had to go through. Wonderful expression and writting .
Thank you mahesh
At 6th std. such a determination to improve English and with proper planning and hardwork achieved the results before the trimester exam… is a great achievement… Hats off to you Devendra…. No wonder that you excelled in studies, sports, debates, drama etc. Almost in everything
you performed exceedingly well…
You are true achiever and inspiration…
Thank you Yogesh
At 6th std. such a determination to improve English and with proper planning and hardwork achieved the results before the trimester exam… is a great achievement… Hats off to you Devendra…. No wonder that you excelled in studies, sports, debates, drama etc. Almost in everything
you performed exceedingly well…
You are a true achiever and inspiration…