माणसं जंगलात फिराय जात्यात आणि बिबट्या डिनर कराय माणसांच्यात यितुय. दोन दिसापूर्वी सोशल मीडियात ह्यो विनोद वाचला. तस जंगली प्राणी मानवी वस्तीत यायच्या घटना वाढल्यात पण आमचं रोग रेड्याला आणि औषध पखाल्याला आस काम सुरुय. जंगली जनावर मानवी वस्तीत का येत्यात यावर कोण ईचार करताना दिसत न्हाय. जंगल तोडून त्येज्या घरात माणूस सिमेंटची जंगल उभारायला लागलाय. मग ही जंगली जनावर जाणार कुठं. पण मानवी वस्तीत आल्याल्या जनावरांमाग लागून माणसांनी तेंचा जीव घेतला. जंगल कुणाला आवडत न्हाय साऱ्यासनी आवडत पण तीत गेल्यावर कसं वागावं ही आजून आमाला समजत न्हाय.
काय जण तर पार्ट्या, सिगरेट करून जंगल पेटवत्यात. तर काय जण आय बा मेल्यागत आरडून वरडून निसर्गाच्या शांततेचा भंग करत्यात. नको ती माकडचाळ, मस्ती , कचरा, वृक्षतोड हेंन जंगल संपली. निसर्गाचा दुर्मिळ ठेवा धोक्यात आलाय. झाड तोडाय, आमी हायगय करत न्हाय तुलनेत झाड लावाय, जगवाय आमची उलट भूमिका हाय. फोटो काढाय पूर्ती झाड लावायची थेर माणसं कर्त्यात पण त्या झाडाचं परत काय हुतय म्हायती न्हाय. पण काय माणसं, गाव झपाटल्यागत झाड निसर्ग जपायचा प्रयत्न करत्यात. त्यातलंच एक गाव तासगाव तालुक्यातलं सावर्डे. एकीकडं जंगल संपत असताना ही गाव १० एकर क्षेत्रावर मानवनिर्मित जंगल उभारतय. पाणी फाउंडेशनच्या प्रेरणेतन ही जंगल पंधरा वीस जातीच्या देशी झाडांनी बहरत चाललंय.
पाणी फौंडेशनच्या स्पर्धेत सावर्डे गाव पयलं आलं आणि अख्या राज्यात तेजी चर्चा झाली. एके काळी पाण्याच्या टँकर वर अवलंबून आसल्याल्या या गावात आज पाणी नगु म्हणायची येळ आल्या. पाणी फौंडेशन स्पर्धे दरम्यान केलेल्या कामान मोठा पाणीसाठा जमिनीत झालाय. या स्पर्धेच्या पुढचा उपक्रम हुता निसर्ग व जंगल वाढवण. त्यासाठी नर्सरी तयार करून गावोगावी लावा असं सांगितलं. पाणी फौंडेशन चे डॉ अविनाश पोळ सर यांनी न्हावी बुद्रुक ला मियावाकी जंगल उभारलेलं बगून या म्हणून सांगितलं. गावातली ३५ जण गिली.
१० गुंठे जमिनीवर ते जंगल१ फूट अंतरावर झाड लावून वाढवलं हुतं. मग साऱ्यांच्या सल्ल्यान फुटका घाणा हितं झाड लावायचं ठरलं. तीन फूट अंतरावर खड्ड काढलं. आणि पावसाळ्यात जून २०१९ ला तिथं ७ हजार झाड लावली. तर जून २०२० ला ५ हजार झाड लावली. यात सारी १६ ते १८ प्रकारची देशी झाड हायत. १२ हजार झाड गावांन नुसती लावली न्हायत तर गाव पाणी घालून जगवतय. पाण्यासाठी शेततलाव काढलाय. जंगल वाढवताना जवळपासच्या जनावर वाल्यासली विश्वासात घेऊन सांगितलं आपण बाबानो जंगल उभारतोय त्यात जनावर सोडू नका. जरा मदत करा. चांगलं कायतर घडतंय लोकासनी बी पटतंय. लोकांची जनावर चराय आता जंगलात जात न्हायत. चार फुटापर्यंत झाड वाढल्यात.
गावातल्या पोराचा वाढदिवस आसला तरी पोर आपल्या नावाचं झाड त्या जंगलात लावत्यात. तर कुणाचं लगीन, नवीन बाळ जन्मल, तरी त्येज्या जन्माचं स्वागत जंगलात झाड लावून केलं जातंय. चराईबंदी आसल्याण गवत चांगलं वाढलंय. त्यात निसर्गातल्या अनेक जीवांची वाढ होत आहे. झाडासनी पाणी घालायला, तेजी काळजी घ्यायला कुणाला सांगायला लागत न्हाय. जेला सवड मिळलं तशी माणसं तीत यिऊन निसर्गाची सेवा करत जंगल वाढवत्यात.
देशातल सगळ्यात मोठं मानवनिर्मित जंगल धों म मोहिते नावाच्या ध्येयवेड्या माणसानं १९८५ ला सागरेश्वर अभयारण्य उभारल. १०.४७ चौरस किलोमीटर येवढ्या मोठ्या क्षेत्रात ती हाय.१४२ प्रकारचं पक्षी तीत हायत. हरणांसाठी तर ती स्वर्गच हाय. भारताततलं साऱ्यात लहान फुलपाखरू ग्रास जुयवेल ही तीत हाय.
झाड जेनी लावावीत आणि जगवावीत, तेजी काळजी घ्यावी यासाठी करोडो रुपय खर्च हुणार वन खात्यात वन व पर्यावरणाची कवडीची किंमत नसल्याली माणसं भरल्यात. आणि तुमी आमी काय जाईल तिथंल पर्यावरण घाण करून टाकतोय. निसर्ग जगला, जपला तरच तुमी आमी जगू. जगायला पैसा न्हाय तर ऑक्सिजन लागतुय ही कोरोनांन आमाला दावल पण टाळक्यात येत न्हाय. जंगल बगायला बोंबलत भायर जाण्यापेक्षा या की सावरड्याला. तीत चार झाड लावा ,जगवा. तुमच्या येणाऱ्या लेकरा बाळांसाठी शुद्ध ऑक्सिजन मिळावा म्हणून….
विनायक कदम:९६६५६५६७२३