School

“गुरु तेथे ज्ञान” : सौ. सुनिता वाडकर

आजच्या दिवशी म्हणजे आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. व्यासपौर्णिमेच्या दिवशी ‘ओम नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे’ अशी प्रार्थना करून, त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे, परंपरा आहे. आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. आपण कोणाचे तरी शिष्य आहोत, या भावनेत एक कृतज्ञता वाटते. आज गुरुपौर्णिमा. तसं बघायला गेलं तर हा काही सण नाही पण या दिवसाचं एक वेगळं महत्व आपल्या संस्कृती मध्ये आहे. गुरू ही संकल्पना आपल्या संस्कृतीमध्ये खूपच उच्च दर्जाची आहे. गुरुचं महत्व हे देवापेक्षा यत्किंचितही कमी नाही. वेदांमध्ये गुरूचा उल्लेख हा साक्षात परब्रम्ह म्हणून केला गेला आहे.

गुरुची परंपरा सुरू राहण्यासाठी आवश्यक असतो तो शिष्य. हा शिष्य ही परंपरा फक्त पुढे नेत नाही तर ती अधिकाधिक समृद्ध करत जातो. जसे की  एकलव्याने शिष्याच्या परंपरेत एक अनोखं उदाहरण प्रस्थपित केलं. प्रत्यक्ष द्रोणाचार्यांच्या  हातून दिक्षा त्याला मिळाली नव्हती पण तरीदेखील त्यांनाच गुरू मानून त्याने जे कौशल्य विकसित केलं त्याला बघून द्रोणाचार्य देखील अचंबित झाले होते. इतिहासातील हे एकमेव उदाहरण. भगवान श्रीकृष्णांनी गुरूच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी वडीलबंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले, तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी भाष्य करीत असत. त्या नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर. भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय मानले आहे. आपल्या देशाचे वैशिष्ट्य म्हणजे गुरु-शिष्य परंपरा. गुरुच आपणाला अज्ञानातून बाहेर काढतात. शिक्षक हे आपले गुरुच आहेत. प्रथम आपण ‘गुरु’ या शब्दाचा अर्थसमजून घेऊया. ‘गु’ म्हणजे अंधकार आणि ‘रु’ म्हणजे नाहीसा करणे.’ गुरु आपल्या जीवनातील विकारांचे अज्ञान दूर करून आनंदी जीवन कसे जगावे, ते आपल्याला शिकवतात.अर्थातच या ओळींप्रमाणे

“गुरू तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसे ।।”

मनुष्याच्या जीवनातील गुरु :-

१) आई-वडील:-  आपल्यावर निरनिराळे संस्कार करून आपल्याला समाजाशी एकरूप व्हायला शिकवणारे आई-वडील हे आपले पहिले गुरु !बालपणात आई-वडील आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकवतात. योग्य काय आणि अयोग्य काय, याची जाणीव करून देतात.म्हणजे आपले पहिले गुरु आई-वडील आहेत.

२) शिक्षक:-  आपल्याला अनेक गोष्टी शिकवून सर्वांगाने परिपूर्ण करणारे शिक्षक हेच आपले दुसरे गुरु असतात.

३) आध्यात्मिक गुरु:-  तिसरे गुरु म्हणजे आध्यात्मिक गुरु जे आपल्याला आपली खरी ओळख करून देतात.

४) अनुभव :- आपल्या गत जीवनातील अनुभव देखील आपल्याला खूप काही शिकवत असतात . त्यामुळे तो देखील आपला गुरूच आहे.

पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होय.गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. ‘गुरु बिन ज्ञान कहाँसे लाऊ?’ हेच खरे आहे.गुरूंच्या उपकारांनी आपले मन कृतज्ञतेने भरून येते, तेव्हा आपल्या तोंडून श्लोक बाहेर पडतो –

“ गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः

गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ॥ “

आदरणीय, सन्माननीय, सर्वोत्तम, मूल्यवान, शास्त्राचा प्रणेता, वडीलधारी व्यक्ती, शिक्षक,असे अनेक अर्थ असले तरी  गुरूचा सर्वात चांगला आणि तांत्रिकदृष्टय़ा शुद्ध असा अर्थ म्हणजे जो बालकाचे उपनयन संस्कार करून त्याला वेदाध्यायनाकडे नेतो तो गुरू. वेद म्हणजे ज्ञान. गुरू अज्ञान तिमिरातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेत असतो. तत्त्व म्हणजे सत्य, त्रीकालातीत सत्य, सार. त्या निखळ सत्याची जाणीव करून देणारा तो गुरू. म्हणूनच गुरू हा ज्ञानसूर्य असतो. त्याच्या प्रज्ञेचे, प्रतिभेचे तेजस्वी किरण या अज्ञानरुपी अंध:काराचा नाश करतात.आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देवदेवता ह्यांना जितके महत्त्व आहे, त्यापेक्षा थोडे अधिक महत्व आहे ते गुरूला. मानवी जीवनातल्या जडण घडणी मध्यें गुरूचे स्थान हे अनन्य साधारण आहे. ज्या गुरूंमुळे आपल्या जीवनाला   आकार मिळतो. नवजात  जन्मलेल्या बालकाची प्रथम गुरू असते ती माता.मुल चालायला  बोलायला  लागले की त्या  जीवावर  संस्कार घडवतो तो पिता. शालेय जीवनात ज्ञान, कला, विज्ञान ह्यांचे जे आपल्याला धडे देतात ते शिक्षक अशा अनेक व्यक्तीमत्वांमधून ते गुरूत्त्व आपण अनुभवत असतो.

“श्री गुरू सारीखा असता  पाठीराखा। इतरांचा लेखा  कोण  करी ॥”  आसे खरे नमन करणाऱ्या विद्यार्थी, शिष्य, साधक, उपासक, अभ्यासक ह्यांच्यावर गुरू आशिषामधून गुरूत्वाचा कृपावर्षाव करत  असतो. त्या कृपाबळावरच शिष्य मोठे कार्य करू शकतो.ह्याचेउदा. म्हणजे निवृत्तीनाथ ह्यांच्या गुरूकृपेतूनच ज्ञानदेवांच्या हातून घडलेलं ज्ञानेश्वरी लेखनाच कार्य . अशा प्रकारे गुरूचा महिमा वर्णन केला जातो.   गुरू म्हणजे ज्ञानाचा सागर असतो . गुरू  झाडाच्या सावलीसारखा असतो. छोट्याशा यशात आकाशाएवढ मोठ स्वप्न दाखवणारा असतो. छोट्याशा कामात सुद्धा ध्येय कसे गाठावे आणि त्यासाठी प्रेरणा आणि स्फूर्ती देणारा गुरूच असतो. ‘हरलो तरी तुम्ही जिंकू शकता ‘असा ठाम विश्वास देणारा फक्त आणि फक्त एक गुरूच असतो.  आजच्या या गुरूपौर्णिमेच्यादिवशी माझ्या आदरणीय आणि वंदनीय गुरूजनांना माझे कोटी कोटी प्रणाम!!!!

लेखिका ,

सौ. सुनिता वाडकर ( शिक्षिका)

बी.ए.(राज्यशास्त्र)   एम.ए.(इतिहास)

डॉ. दादा गुजर इंग्रजी माध्यम शाळा, मोहम्मदवाडी, पुणे-६०

(फोन-९९२१७७८२५८)

MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
×
MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
Latest Posts

Comment here