” गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर:। गुरु: साक्षात् परंब्रह्म तस्मै श्री गुरवे नम:।
ज्यांनी आयुष्यात उभं रहायला शिकवलं….चालायला शिकवलं….नंतर पळायला शिकवलं…. आणि कुठे थांबायचे हे ही शिकवलं…. जगणं शिकवलं…. त्या सर्व वंदनिय गुरूंना सादर प्रणाम….
” हाताची घडी, तोंडावर बोट ”
अध्यक्ष महोदय, पुज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बाल मित्रांनो, आज यांची जयंती, त्या निमित्ताने मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकुन घ्यावे ही तुम्हाला नम्र विनंती……. मित्रांनो आठवतंय का काही ?
ती शाळा आणि मग त्या शाळेच्या रम्य आठवणी. आपला मुलगा खुपच हुशार आणि गुणी बाळ आहे असे वाटणे हा सगळ्याच पालकांचा जन्मसिद्ध अधिकार. त्याच्यासाठी चांगली शाळा शोधली पाहिजे असे सर्वच पालकांना वाटणार.
पहिली ते दहावी पर्यंतच्या प्रवासात बऱ्याच जणांच्या वाट्याला असं सगळ्यांच्या समोर जाऊन उभे राहुन बोलणे येत नाही. काही फार थोडे भाग्यवान असतात की ज्यांना याचा अनुभव मिळतो.
खरं तर आपल्या सगळ्यांचाच शालेय प्रवास हा चाचपडतच झालेला असतो. हे चाचपडणच सर्वात जास्त महत्वाचे असते. शालेय प्रवासातील हे चाचपडणच भावी आयुष्यात स्थिर उभे राहणे शिकवत असते, म्हणुनच ते जास्त महत्वाचे असते. असे खूप सारे चाचपडण्याचे अनुभव आपली शाळा आपल्याला देत असते. मग ती प्राथमिक शाळा असेल किंवा माध्यमिक असेल अथवा महाविद्यालयीन शिक्षण असेल.
त्या काळात या सगळ्या गोष्टींची जाणीव नसते. हे काय चालले आहे असे सगळे वाटत असते. ते सगळे समजाऊन घेण्याचे वय सुद्धा नसते. परंतु भविष्यात उभ्या राहणाऱ्या यशाच्या इमारतीचा तो पाया असतो. म्हणुनच शालेय जीवनातले सगळेच अनुभव समरसून घेण्यातच खरी मजा असते. आणि जे असे सगळे अनुभव समरसून घेतात ते जीवनात यशस्वी होतात हे ही तेव्हढेच सत्य आहे. इथे आनंदाने जीवन जगतात असा यशाचा अर्थ अभिप्रेत आहे. जीवनात आलेल्या प्रत्येक समस्येला धाडसाने सामोरे जाणे म्हणजे सुद्धा यशच आहे. त्यामुळेच शालेय जीवनातील सर्व प्रकारचे अनुभव महत्वाचे असतात.
असाच एक अनुभव असतो सर्वांच्या समोर भाषणासाठी उभे राहण्याचा. कधीतरी वर्गात सूचना येते की ज्यांना अमुक तमुक यांच्या जयंती निमित्ताने किंवा वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचा असेल त्यांनी आपली नावे यांच्या कडे द्यावीत. आणि मग आपले वर्गशिक्षक विचारतात की कोण बोलणार आहे. शिक्षक सगळ्या वर्गावर नजर टाकुन बोलत असतात. अशा वेळेस शिक्षकांची नजर टाळली जाते. त्यांनी आपल्याकडे पाहिले की आपण शिक्षकांची नजर टाळायची. कोण फटफजिती करून घ्यायला तयार होणार. पण काही बहाद्दर तयार होतात.
एकदा विषय समजाऊन घेतला की मग डोक्यात तेच चक्र फिरत राहते. विषयाशी संबंधीत माहिती गोळा करणे सुरू होते. शिक्षकांशी बोलुन मार्गदर्शन घेतले जाते. वर्तमानपत्रातील कात्रणे शोधणे सुरू होते, तसेच ग्रँथालयाच्या फेऱ्या वाढतात. घरात मोठे बहीण भाऊ असतील तर त्यांची मदत घेतली जाते. शिक्षक सुद्धा जीव लाऊन मुद्दे देत असतात. भाषण पाठ करून घरात सराव करणे सुरू होते. येता जाता तेव्हढाच उद्योग.
एकदाचा तो भाषणाचा दिवस उगवतो. ती वेळ येईपर्यंत पोरगं अस्वस्थ असते. भाषण करण्याआधी पोटात गोळा आलेला असतो. व्यासपीठावर बसलेली भली थोरली मंडळी, त्यात अध्यक्ष म्हणुन असलेली भारदस्त व्यक्ती, समोर असलेली विद्यार्थ्यांची गर्दी. इकडे भाषण करणाऱ्याच्या घशाला कोरड पडलेली असते. त्याचा नंबर येई पर्यंत चित्त थाऱ्यावर नसते. अध्यक्ष निवड, अनुमोदन असे सर्व सोपस्कार पार पाडुन एकदाची कार्यक्रमाला सुरुवात होते. एक एक जण येऊन बोलायला सुरुवात होते.
आणि मग याचे नाव पुकारले जाते. लटपटत्या पायांनी पोर समोर जाऊन उभे राहते. समोरची गर्दी बघुनच जीभ टाळ्याला चिकटली जाते. शरीराला आणि आवाजाला कंप सुटलेला असतो. ” अध्यक्ष महोदय, पुज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रांनो, आज मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी तुम्हाला विंनती आहे” , अशी सुरुवात केली जाते. पण समोरची गर्दी शांत चित्ताने ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. सुरुवातीची पाठ असलेली वाक्ये धाडस करून फेकली जातात, पण कुठल्यातरी एका क्षणी स्मृती दगा देते. काहीच आठवत नाही. नुसतंच उभं राहणं होतं. गोंधळाला सुरुवात होते. काही जण आपल्याकडे बघुन हसत आहेत हे ही लक्षात येत असते. मध्येच कोणीतरी शिक्षक माईकचा ताबा घेतात आणी हाताची घडी, तोंडावर बोट अशी सुचना देतात. घाबरू नको, बोल, बोल असे याला सांगितले जाते. तेव्हढ्या दहा वीस सेकंदाच्या काळात याला ब्रम्हांड आठवलेले असते. शिक्षकांच्या पाठिंब्याने मन पुन्हा उभारी घेते. पुन्हा बोलायला सुरुवात होते. थोड्या वेळाने पुन्हा स्मृती दगा देते, आता मात्र इलाज नसतो, शेवटी कागद काढुन भाषण वाचले जाते. भाषण संपलेकी पोर हुश्श करून जागेवर जाऊन बसते, कधी एकदा भाषण संपेल आणि जागेवर जाऊन बसेल असे झालेले असते. जागेवर जाऊन बसे पर्यंत काहीच समजत नाही फक्त टाळ्या वाजल्याचे ऐकायला येते.
यातले काही मुळातच धाडसी असणार, रुबाबदारपणे चालत येणार, आत्मविश्वासाने माईकचा ताबा घेणार, स्पष्ट भाषेत आपले म्हणणे मांडणार आणि श्रोत्यांची मने जिंकुन घेणार.
असे सगळे शालेय जीवनातील अनुभव म्हणजे जगाच्या पाठीवर ठामपणे उभे राहण्याचा आत्मविश्वासच असतो. विद्यार्थ्यांच्या अंगी नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी या सर्व अनुभवांची गरजच असते. रुबाबदारपणे बोलणारा पुढच्या वेळेस आणखी तयारी करतो तर नवशिका ही या अनुभवातून तयार होतो.
एव्हढी एव्हढी ही सगळी पोरं शिक्षक मायेच्या ममतेने सांभाळणार, त्यांचा चिवचिवाट, गोंधळ सहन करणार आणि तोल न सोडता त्यांना शिक्षणाची गोडी लावणार. शिक्षकांचे शिस्त लावण्याचे काम सुरूच असणार. पहिल्यांदाच बोललेल्या पोराला छान बोललास असे सांगणार. पोर खुशीत येणार.
असं सगळं सुरू असणार.पोराला हळुहळु शाळेची गोडी लागणार. शाळा सुटल्यावर खेळून झाले की पोर स्वतःच अभ्यासाला बसणार. सांगितलेला गृहपाठ करणार . असेच दिवस पुढे पुढे जाणार.
मग एके दिवशी निकालाचा दिवस उगवणार. पोरगं मोठया खुशीत निकाल आणायला जाणार. जाताना छटाक पेढ्यांची पुडी बरोबर घेऊन जाणार, शिक्षकांना पेढे देणार, त्यांच्या पायावर डोकं ठेवणार. निकाल पत्र घेऊन घरी येनार, त्याला त्यातले काहीच नाही कळणार. पालक सुद्धा पोरगं पास झालं म्हणुन खुश असणार. किती मार्क मिळाले याची चर्चा नाही होणार आणि कोणीच कोणावर नाही ओरडणार.
कधीतरी आईला रस्त्यात पोराचे शिक्षक भेटणार. पोरगं अभ्यासात बरं आहेका हे त्यांना आई विचारणार. चांगलं आहे, तुम्ही थोडं लक्ष द्या असे तेही सांगणार. बराच वेळ मग इकडच्या तिकडच्या गप्पाच रंगणार.
मग रोज सगळं असंच असणार, असेच दिवस पुढे जाणार. अशातच मग एके दिवशी पोरगं घरी येऊन आई मला भाषण करायचे आहे, लिहुन दे म्हणणार. आई त्याला भाषण लिहुन देणार, आणि शिक्षणाने जगण्याचा आत्मविश्वास मिळवलेलं ते पोरगं शाळेत जाऊन सर्वांच्या समोर धाडसाने उभे राहणार, हातातला घडी केलेला कागद घामेजलेल्या मुठीत धरून, लटपटत्या पायांना काबूत ठेऊन, मोठया आवाजात बोलणार….अध्यक्ष महोदय, पुज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रांनो !!!!!
काळ बदलला, शिक्षण पध्दती बदलली, मार्कांच्या मागे धावण्याची शर्यत सुरू झाली. फक्त बदल झाला नाही तो या मातीच्या गोळ्यांना आकार देणाऱ्या शिक्षक, शिक्षिकांच्या समर्पण भावनेमध्ये.
त्या मुळेच आजच्या पिढीतले पोरं सुद्धा आईला म्हणतात की आई भाषण लिहुन दे आणि आई लिहुन देते, ” अध्यक्ष महोदय, पुज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बाल मित्रांनो….. ” आणि पोरगं जीवनाच्या रंगमंचावर धाडसाने उभं राहतं.
या मातीच्या गोळ्यांना आकार देणाऱ्या त्या सर्व सर्जनशील शिक्षकांना त्रिवार वंदन….!!!!!
” गुरुपौर्णिमच्या हार्दिक शुभेच्छा ”
रमेश मोरगावकर
9423462877