मन आणि त्यातून निर्माण होणाऱ्या मुख्य सहा भावना आणि या सहा भावनांच्या संयोजन आणि समायोजन मधून निर्माण होणाऱ्या अनेक उप भावना आपले जीवन अर्थपूर्ण बनवतात. मात्र या भावनांचे योग्य संयोजन आणि समायोजन केले नाही, तर जीवन अर्थहीन बनू शकते. आनंद भावना आपल्या आयुष्यात सुख पेरते, दु:ख भावना आपले आयुष्य धूसर बनवते, तिरस्कार भावना आपले सबंध बिघडवते, आश्चर्य भावना आपल्याला नवीन गोष्टी बाबत अचंबित करते आणि भीती भावना आपल्या विकासात अडथळे निर्माण करते. इतर भावनांप्रमाणे भीतीचा उगम हा आपल्या मेंदू आणि मन याच्या संयोजन आणि समायोजन मधून होतो. भीतीचा उगम हा प्रसंगानुरूप आणि वस्तुस्थितीला धरून असला तरी बऱ्याच अंशी भीती ही अनामिक आणि आभासी सुद्धा असते. त्यामुळे भीती ही कधी कधी आपले आयुष्य व्यापते आणि ते अंधारमय सुद्धा करते. भीती ही वैचारिक आणि तशी ती भावनिक असते. भीती ही जुनाट आणि तीव्र सुद्धा असते. अनेक वेळा ही भीती आपल्या शरीराला आणि स्वैर अशा मनालाही अनियंत्रित करते. भीती आपल्याला काय करावे? आणि काय नाही करावे? याबाबतही दिशा निर्देश देते. भीती आपल्याला मार्ग दाखवते किंवा कधी आपला मार्ग सुद्धा चुकवते. तर चला अशा या अनाकलनीय आणि अचंबित करणाऱ्या भीती या भावनेविषयी समजून घेवूया. तसेच या भीतीची आपल्या आयुष्यातील तिव्रता कशा प्रकारे कमी करता येईल, याबाबतही जाणून घेऊया.
आपला जन्म होतो त्यानंतर मेंदूची आणि एकंदर शरीराची वाढ आणि विकास सुरू होते. ही वाढ आणि विकास सुरू असतांना अनेक मूर्त आणि अमूर्त बाबींचे आकलन आपल्या मेंदूला आणि मनाला होते. तसेच ही वाढ आणि विकास होत असतांना अनेक अनुभव आणि निरीक्षणे आपण आपल्या मेंदूत साठवत असतो. आकलन, निरीक्षणे आणि अनुभव यातून आपले मन विकसित होते. मन म्हणजे काय तर भावनांचा आणि विचारांचा संग्रह होय. आधी भावना मग विचार असा मनाचा प्रवास असतो. भावना निर्मिती मध्ये सर्वात आधी दु:खाची निर्मिती होते. त्यानंतर आनंदाची निर्मिती होते. जसे आकलन आणि निरीक्षण वाढेल तशी भीती या भावनेची निर्मिती होते. त्या नंतर अनुक्रमे आश्चर्य, राग आणि तिरस्कार या भावना निर्माण होतात.
लहान मूल जन्माला आल्यावर सर्वात आधी त्याच्या मनात जी भीती तयार होते, ती एकाकीपणाची असते.त्याच्या बाजूला कोणी नसले की लहान मूल रडायला लागते ते या भीतीमुळेच. त्या नंतर आवाजाची भीती निर्माण होते. कानावर मोठा आवाज पडला तर एकदम मूल घाबरते. आजूबाजूला जे दिसते त्यापेक्षा वेगळी जागा अथवा परिसर समोर आला की मुलाच्या मनात स्थानाची किंवा ठिकाणाची भीती निर्माण होते. त्यानंतर जी भीती असते ती उंचीची भीती त्या त्याच्या मनात तयार होत असते. उंचावरून खाली पडले तर आपल्याला मार लागतो हे सर्वात आधी कळते. हळू हळू मुलाची वाढ होऊ लागते, तशी त्याला अंधार, वेगवेगळे आवाज, नवीन चेहरे याची भीती तयार होते. येत असलेले अनुभव आणि निरीक्षणे या आधारे अनेक गोष्टी, बाबी आणि घटना याचा भेद करणे बाबतची जाणीव प्रबळ झाली की भीती तयार होते. एकंदर भीती ही जन्मतः नसते तर ती काळाच्या ओघात तयार होते.
ऐकीव गोष्टी आणि अर्थहीन चर्चा यात रंगवले जाणारी विविध भीतीदायक पात्र ही भीतीचे सर्वात मोठे आधारस्तंभ असतात. त्यामुळे भीती ही वस्तुस्थिती पेक्षा अनामिक आणि आभासी गोष्टींना आणि पात्रांना जास्त महत्व देत असल्याचे दिसून येते. मानवी मन आणि मेंदू आणि त्यांच्या ठायी असलेली अमर्याद विचार क्षमता हे आभासी आणि अनामिक जगाला अजून व्यापक आणि भीतीदायक बनवते. साहजिकच ही व्यापकता अजून भीतीला मोठे रूप देते. आपले घरी आपले बारा वर्ष वयाचे मूल अंधार्याठ खोलीत जावून एखादी वस्तु आणायला खूप घाबरते मात्र आपलेच दुसरे मूल की जे सहा वर्ष वयाचे आहे ते मात्र अंधार्याा खोलीत सहज प्रवेश करते आणि ती वस्तु घेवून येते. वास्तविक दोन्ही मुलांची जडण घडण ही सारख्याच वातावरणात झालेली असते. असे असले तरी मोठ्या मुलाचे आकलन, निरीक्षण आणि अनुभव विश्व हे लहान मुलाच्या दुप्पट असते. म्हणजेच भीतीची व्यापकता आकलन, अनुभव, निरीक्षण आणि वय या नुसार मोठी होत जाते. भीती ही आधी रोपट्या सारखी असते नंतर तिचा वटवृक्ष होत जातो.
भीती ही व्यक्तिगत असते म्हणजे भीतीची संकल्पना अथवा कल्पना ही व्यक्तिगणिक किंवा व्यक्तिपरत्वे बदलते. रोलर कोस्टर मध्ये जर वर्गातील एका वयाची मुले बसली तर त्या सर्वांना वाटणारी भीती एक समान नसते. त्यापैकी काही मुले मोठयाने ओरडून आनंदी होतील, काही शांत बसून घेतील, काही गर्भगळीत होतील, काही डोळे घट्ट मिटून घेतील, तर काही भीतीने थरथर कापतील. हा भेद किंवा व्यक्तिगतपणा हा प्रत्येकाची जडण घडण होत असतांना मिळालेले विविध संस्कार, आजूबाजूचे वातावरण आणि आलेले अनुभव याचा परिपाक असतो आणि त्यातूनच भीतीची तिव्रता ठरते. एकाला एका गोष्टीची वाटणारी भीती दुसर्याआला वाटेलच असे नाही. भीतीची व्याख्या ही व्यक्तिपरत्वे बदलत राहते. आपल्याला सापाची भीती वाटते परंतु सर्पमित्राला सापाची भीती वाटत नाही. आपल्याला बैलाची भीती वाटते पण गुराख्याला ती वाटत नाही. लहान मुलांना भूतांची खूप भीती वाटते मात्र ती मोठ्यांना वाटतेच असे नाही. भीतीचे प्रकार हे व्यक्तिपरत्वे तर बदलातच पण ते क्षेत्रनिहाय आणि परिस्थितिनिहाय बदलत असतात. एक मुलगी एका ठराविक रस्त्याने जाते त्यावेळी तिला वाटणारी भीती आणि त्याच रस्त्याने जातांना तिचे वडील सोबत असतांनाची भीती यात जमीन आसमानाचा फरक दिसून येतो तो या मुळेच.
साहजिकच भीती ही आपल्या सोबत कायम असते. ती कोणता मार्ग पत्करू? कोणता नाही ? कोणता निर्णय घेवू ? कोणता निर्णय नको घेवू? याचे निर्देशन करते. आपल्या पूर्व जीवनातील म्हणजे भूतकाळातील अनेक घटना कायम भीती म्हणून आपल्या मनात घर करून राहतात. त्या जेंव्हा जेंव्हा आपल्या मनात आणि विचारात येतात त्यावेळेस ती भीती आपल्या मध्ये मानसिक तणाव आणि त्रास निर्माण करते. भीतीचा उगम हा मनाच्या एका कोपर्यायतुन होत असला तरी ही भीती आपल्या संपूर्ण देहावर आणि मानसिक अवस्थेवर अतिक्रमण करते. शहारे आणणे, धस्स होणे, अंगावर काटा येणे, घाम फुटणे आणि अंग थरथरणे ही भीतीची शारीरिक रूपे होत. मनात कुजत राहणे, असंबद्ध बोलणे, विचारमग्न होणे, एकच विचार कायम घोळत राहणे, एकलपणा , नैराश्य आणि औदासिनता येणे ही भीतीची मानसिक रुपे होत. भीतीची तीव्रता जर खूप वाढली तर शारीरिक आणि मानसिक विकास यावर सुद्धा दूरगामी परिणाम संभवतात.
भीतीचा उगम हा आपल्या आकलनातून होतो. आजूबाजूला असलेल्या मूर्त आणि अमूर्त गोष्टी बाबतचे अज्ञान हे भीतीचे प्रमुख कारण असते. वाघ ही मूर्त गोष्ट आहे त्यामुळे वाघ आणि त्याचे वर्तन याबाबत आपल्याला आकलन असल्याने आपण वाघ शब्द उच्चारला तरी आपल्याला भीती वाटते. मात्र अमूर्त गोष्टी की ज्या अस्तित्वात नाहीत त्या गोष्टींची आपल्याला तीव्र भीती वाटते. भूत आणि चेटकीण, पाप आणि पुण्य ,स्वर्ग आणि नरक इत्यादि बाबत जास्त भीती आपल्याला वाटते. कारण ह्या बाबी वाचनीय आणि ऐकीय माहितीवर आधारित आहेत. शिवाय त्यांचे वर्णन इतके भीतीदायक किंवा विशाल रीतीने केलेले आहे. की त्यांचे अस्तित्व हीच भीतीची छाया ठरते. पण प्रत्येक भीती ही अनामिक, आभासी आणि ऐकीव असतेच असे नाही. रहदारीच्या रस्त्यावरची भीती, घनदाट जंगलात चालत असतांना भीती, किर्र अंधारात पायवाटेने चालत असतानाची भीती, समुद्रात बोटीवर असतांनाची भीती, या भीती अनामिक नसतात तर त्या वास्तव असतात. उंचपणा,पाणी,आग,रस्ता ,गर्दी, प्रवास या सारख्या काही गोष्टी ह्या काहींना भीतीदायक वाटतात. त्यांना या गोष्टीचे त्याच्या पूर्व आयुष्यात कसे आकलन झाले आहे. यावर त्या भीतीची तीव्रता ठरते. जर संबधित व्यक्ति हा पोहण्यात तरबेज नसेल किंवा त्याने त्याच्या समोर जर कोणी पाण्यात बुडतानी पहिला असेल तर ती भीती त्याच्या मनात कायम घर करते. रस्त्यावरुन जात असताना समोर जर अपघात झाला आणि त्यात काही लोक मृत्यूमुखी झालेले एखांद्याने पहिले तर ती भीती मनात घर करते. त्या सारखी घटना समोर आली की तिच्याशी आपले मन लगेच संबंध जोडते. हा जोडणारा संबंध भीतीची तीव्रता ठरवत असतो.
आपले संवेदनशील आणि कमजोर मन हे भीतीच्या साम्राज्यात रमणीय होते. काही तरी घडण्याची भीती आणि काही तरी गमवण्याची भीती आपल्याला काही अंशी कमजोर करते. भीती जर कायम आपल्या भोवती फिरत असेल तर आपण भीतीच्या चक्रव्यूह मध्ये फसतो किंवा अडकून बसतो. त्या मुळे आपण अगदी लहान सहान गोष्टी आणि छोटी मोठी कामे करण्यास सुद्धा धजावत नाही. आपण हे केले तर काय होईल?, आपण असे बोललो तर काय होईल? या सारखी भीती आपल्याला वाटत असल्याने आपण कोणतेही निर्णय घेत नाहीत. भीतीमुळे निर्णय क्षमता कमालीची घसरते. कोणताही निर्णय घेण्यास आपण धजत नाहीत. कारण निर्णयातून अपयश आणि अपयशातून भीती येण्याची शक्यता असते. सबब आपण निर्णय घेण्याचे जाणीव पूर्वक टाळतो. भीती तुमच्या उत्साह घालवून तुम्हाला निरुत्साही करते. भीतीमुळे आपण अकार्यक्षम तर होतोच परंतु नव्याने काही करण्याची आपली हिम्मत होत नाही. त्यामुळे आपल्या प्रगतीत विविध बाधा येतात. भीती मनात घर करून बसते. अशी भीती की जी आपल्या मनात आणि विचारात कायम राहते.
भीती ही जरी काही अंशी अपरिहार्य बाब असली तरी भीती पासून सुटका मिळवणे अत्यावश्यक ठरते. भीती पासून दूर पळण्यापेक्षा भीती वर मात करणे अनिवार्य ठरते. भीती पासून पूर्णत: सुटका होत नसली, तरी भीतीची तिव्रता कमी करणे आवश्यक असते. भीतीच्या मुळाशी जावून आणि वस्तुस्थिती काय आहे? हे पडताळणे ही भीतीची तीव्रता कमी करण्याची पहिली पायरी ठरते. मुळाशी जाणे म्हणजे भीतीचा कार्यकारणभाव शोधणे होय. खरे सांगायचे तर आपण अनामिक आणि आभासी अशी भीती आपल्या मनात साठवून ठेवतो. तिच्यापासून अगोदर सुटका मिळवणे आवश्यक ठरते. त्यापैकी एक म्हणजे, ‘आपल्या सुखी आयुष्याला कोणाची नजर लागू नये’! ही वैचारिक भीती आपल्या मनात कायम घर करते. त्यामुळे जेंव्हा काही तरी चांगले आपल्या आयुष्यात घडते त्याचा आनंद आणि त्यातून निर्माण होणारे सुख आपल्याला उपभोगता येत नाही किंवा ते उपभोगण्याचा आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करत नाहीत. उदाहरण दाखल सांगायचे तर, कार विकत घेतली तर इतरांना त्याबाबत मुद्दामहून काही सांगायचे नाही, कारण त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतील आणि त्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतील? अशी भीती अनेकांना वाटते. साहजिकच कार घेतल्याचा आनंद ते साजरा करतीलही पण त्यातून निर्माण होणारे सुख ते गमावून बसतात. त्यामध्ये लोक काय विचार करतील आणि लोकांना काय वाटेल ही भावना प्रबळ असते. कारण सुख आणि ज्ञान ही अशी बाब आहे की ती इतरांना दिल्याने आणि त्यांचे सोबत वाटल्याने ते अजून वाढते ही वस्तुस्थिती आपण विसरून जातो. वास्तविक आजच्या धावपळीच्या जगात काही बोटावर मोजण्याइतपत लोक सोडले की इतर लोक की ज्यांच्या बोलण्याला काडीचीही किंमत नसते. तर कोणालाही कोणाचे काय चालले आहे याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. मोबाइल आणि सोशल मीडियाच्या युगात तर लोक एवढे व्यस्त आहेत. की सोबतचा आणि शेजारचा काय करतोय? याकडे कोणाचेच लक्ष नाही. त्यामुळे दुसरे काय म्हणतील? या विचाराला त्याग करायला हवा.
दुसरे महत्वाचे भीतीचे कारण हे की ‘काही तरी गमविण्याची सारखी भीती वाटणे होय’. आपल्याजवळ जे आहे ते म्हणजे आपल्या जवळची माणसे, आपली संपत्ती, आणि आपले स्थान गमविण्याची भीती अनेकांना कायम सतावते. आपली आई, वडील, बायको, मुले, भाऊ, बहीण किंवा मित्र हे आपल्याला सोडून जातील किंवा काही कटू कारणाने आपण त्यांच्यापासून दूर जावू किंवा त्यांचे काहीतरी बरे वाईट होईल असे सारखे वाटत राहते. आपली जी संपत्ती आहे त्यावर कोणी तरी कब्जा करेल किंवा कोणी तरी मालकी हक्क प्रस्तापित करेल असेही वाटत राहते. तसेच आपले समाजातील, कार्यालयातील किंवा व्यवसायातील स्थान धोक्यात येईल, अशीही भीती सतावत असते. ही भीती मात्र आपल्या आजूबाजूच्या जरा जास्त लोकांमध्ये दिसून येते. व्यवस्थापन शास्रामध्ये मॅन, मनी आणि मटेरियल ही महत्वाची संसाधने समजली जातात. साहजिकच आपल्या आयुष्यातून ही संसाधने हद्दपार होवू नयेत याची भीती लोकांना कायम वाटत राहते. ही बाब मानवी स्वभावाला धरून असली तरी ही भीती जर आपल्या कामकाजावर किंवा कामकाजाच्या गुणवत्तेवर आघात करत असेल तर मात्र यावर आपण चिंतन करणे अनिवार्य आणि आवश्यक ठरते. त्यासाठी ‘आपले आयुष्य हा एक सुंदर प्रवास असून या प्रवासात कायम सोबत कोणीच राहत नाही’ हा विचार मनावर बिंबवणे आवश्यक आहे. कोणतेही व्यक्तीगत अथवा सामाजिक स्थान हे कधीच अंतिम नसते या विचाराचा स्विकार करावा लागतो. तसेच भविष्यकाळ हा आपल्या कब्ज्यात आणि हातात नसल्याने पुढे काय होईल याबाबत सारखे भीतीदायक विचारमग्नतेमध्ये राहणे आपल्या वर्तमानकाळासाठी कदापि चांगले नसते. आपण आपले आयुष्य जगत अनेक अनेक गोष्टी, बाबी आणि घटना यावर प्रभाव पाडू शकत नाही. पुणे मुंबई एक्स्प्रेस हायवेवर महिन्यातून किमान तीन ते चार अपघात होतात यावर आपण प्रभाव पाडू शकणार नाहीत. आयुष्यातही अश्या अनेक गोष्टी आणि बाबी असतात की त्यावर आपण प्रभाव पडू शकत नाहीत. अशा गोष्टीच्या भीतीच्या सावटाखाली राहणे म्हणजे आपली अधोगती करून घेण्यासारखे आहे, हे आपण लवकर लक्षात घ्यावे.
तिसरी आणि तितकीच महत्वाची भीती आहे ती म्हणजे ‘विविध स्पर्धेत मागे पडण्याची भीती होय’.आपण पाहतो की आपल्या आजूबाजूला कायम स्पर्धेचे वातावरण असते. या स्पर्धेत काही पुढे जातात काही मागे राहतात ,काही यशस्वी होतात काही अयशस्वी होतात आणि काही जिंखतात तर काही हरतात. ही भीती शेतकरी ते व्यावसायिक आणि विद्यार्थी ते अधिकारी अशा वेगवेगळ्या सामाजिक घटकांमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. स्पर्धा हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असून जग हे कायम स्पर्धाक्षम असते. सृष्टीमधील अन्नसाखळी ही स्पर्धेवर टिकून आहे. मात्र ही स्पर्धा निकोप आहे का? आणि ही स्पर्धा आवश्यक आहे का? हे पडताळणे आवश्यक ठरते. स्पर्धा परीक्षेत माझा मित्र मला मागे टाकेल, शेजारच्या शेतकर्यााच्या मालाला बाजारपेठ चांगली मिळेल, मी उत्पादित केलेला माल हा इतर व्यवसायिकांच्या स्पर्धेत टिकेल का, ही सर्व उदाहरणे स्पर्धेची असून त्यामुळे एक स्पर्धात्मक भीती आपल्या मनामद्धे निर्माण होत असते. मानवी जीवनाचा स्पर्धा हा अविभाज्य भाग असला तरी त्यातून येणारे यश आणि अपयश हे खिलाडू वृतीने स्विकारावे, हे कायम लक्षात घेणे आवश्यक आहे. आपले यश आणि आपले अपयश यावर अनेक घटक प्रभाव टाकत असतात. त्यामुळे दूसरा का यशस्वी झाला अथवा स्पर्धेत का पुढे गेला याची कारणमीमांसा करणे केंव्हाही आवश्यक ठरते. स्पर्धेत मागे पडण्याची भीती जर आपल्या मनामधून आणि विचारातून काढायची असेल तर आपल्या कामाला आपण शंभर टक्के न्याय दिला पाहिजे. तसेच आपल्या कामावर प्रभाव टाकणारे नकारात्मक घटक यांचा प्रभाव कमी केला पाहिजे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा विद्यार्थी हा योग्य मार्गदर्शन घेवून अत्यंत कष्टपूर्वक दिवसातील किमान दहा तास अभ्यास करतो तेंव्हा तो निश्चितच स्पर्धेत टिकून राहतो. पण अशा वेळी त्याच्यावर अनेक नकारात्मक घटक प्रभाव पाडत असतात. त्या पैकी त्याचे मौजमजा करणारे मित्र, हिणवणारे मित्र आणि नातेवाईक, कौटुंबिक अडचणी, आर्थिक अडचणी, शारीरिक प्रतिकार क्षमता, मानसिक दुबळेपणा इत्यादि घटकांचा प्रभाव सुद्धा त्याला कमी करावा लागतो तेंव्हा कोठे यशाची चव चाखता येते. एकंदर भीती ही जरी वास्तविक, अनामिक आणि आभासी असली तरी ही भीती आपल्याला नेहमी जागरूक आणि दक्ष राहण्यास मदत करते. भीतीमुळे आपण कार्यक्षम, कार्यक्षिल आणि कार्यप्रवण राहतो. भीती असावी मात्र भीतीने आपल्याला घेरलेले नको, भीती असावी मात्र भीतीने आपण निर्णयशून्य होयला नको आणि भीती असावी मात्र भीतीचे भांडवल नको. त्यामुळे भीतीची तिव्रता ही तिची योग्य चिकित्सा, घटनेतील कार्य कारणभाव आणि वस्तुस्थितीचा अंदाज घेवून कमी करता येवू शकते. चला भीतीची तिव्रता आपल्या आयुष्यातून कमी करूया आणि सोपे, सरळ, साधे, सुटसुटीत आणि सुखी आयुष्य जगूया.
जीवन अनमोल आहे ! ते अधिक सुंदर बनवूया
राजीव नंदकर,उपजिल्हाधिकारी मुंबई