Life Explained

ढोंगी, दुट्टपी आणि दुतोंडी यांच्या पासून दूर राहा || राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी

मानव प्राणी हा समजून आणि उमजून घेण्यास अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंत असणारा प्राणी आहे. आज असा वागणारा आणि तसा बोलणारा माणूस उद्या कसा वागेल आणि काय बोलेल याबाबत कोणीही खात्री देवू शकत नाही. साहजिकच मानवी स्वभाव आणि वर्तन संपूर्णत: समजून घेणे, अजूनही कोणत्याही शास्राला शक्य झाले नाही. मानवी जन्म, मानवी मेंदू, मानवी मन, मानवी कुतुहुल, मानवी जिज्ञासा, मानवी आकलन, मानवी बुद्धी, मानवी प्रेरणा, मानवी इश्चा, मानवी महत्वाकांक्षा, मानवी संबंध अशा अनेक गोष्टीचा समन्वय, संयोजन आणि संश्लेषण होवून मानवी स्वभाव आणि मानवी वर्तन तयार होते. मात्र आपल्या दृष्टिक्षेपास येणारा मानवी स्वभाव, मानवी वर्तन आणि मानवी वागणूक आणि खऱ्या अर्थाने असलेला मानवी स्वभाव, मानवी वर्तन आणि मानवी वागणूक यात आपल्याला फरक पाहावयास मिळतो. म्हणजेच बरीच माणसं ही दोन मुखवटे घालणे, दुट्टपी वागणे आणि दुतोंडी बोलणे यात तरबेज झालेली पाहावयास आणि अनुभवयास मिळतात. जेवढे अंतर यातील जास्त तेवढं जास्त तो स्वत:ला आणि दुसऱ्यांना फसवत असतो. साहजिकच असे वागणे आणि बोलणे ठेवल्याने त्यातून अल्प काळाचे फायदे मिळत असतीलही मात्र दीर्घकालीन याचे फायदे मिळण्यास नैसर्गिक मर्यादा येतात. प्रस्तुत लेखात माणसं दोन मुखवटे कसे मिरवतात? दुट्टपी कशी वागतात? दुतोंडी कशी बोलतात? आणि त्यातून त्यांच्या आयुष्यावर कसे परिणाम होतात? आणि या वागणुकीतून बाहेर कसे पडावे?अशा लोकांपासून दूर कसे राहावे? याबाबत आपण विवेचन करणार आहोत.
मनुष्य प्राणी जेंव्हा जन्माला येतो त्यावेळी काही बाबी त्याच्या अंगभूत म्हणजे अंनुवंशिक असतात(Nature), तर काही बाबी ह्या बाहेरील वातावरण आणि त्याला आलेले अनुभव याच्या आधारे निश्चित होतात(Nurture). मानवी स्वभाव, वर्तन आणि दृष्टीकोण हे काळाच्या ओघात तयार होतात आणि ते त्या व्यक्तीच्या ठायी सामावून जातात. साहजिकच त्यामुळे ‘स्वभावाला औषध नाही’, तसेच ‘कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडे’ असे आपण म्हणतो. ‘जशी दृष्टी तशी सृष्टी’ असेही आपण उपहासात्मक स्वरुपात बोलतो. असे असले तरी आपला स्वभाव, वर्तन आणि दृष्टीकोण याबाबत लोक दुहेरी भूमिका घेतलेले किंवा दोन मुखवटे घातलेले दिसून येतात. म्हणजे ते वेळ, ठिकाण, व्यक्ती या प्रमाणे वर्तन, स्वभाव आणि दृष्टीकोण बदलत असतात. असे होणे हे व्यावसायिक पातळीवर काही अंशी योग्य असले, तरी असे नेहमीच घडणे, हे आपले मानवी संबंध दीर्घकाळ टिकविण्यासाठी उपयोगी पडत नाही.
मानवी स्वभाव आणि त्यातील गुंतागुंत हे मानसशास्र आणि तत्वज्ञान यासाठी कायम आव्हानात्मक राहिले आहे. कोणता व्यक्ती कोणत्या ठिकाणी आणि कोणासोबत कसा वागेल आणि कसा बोलेल याचे भाकीत आजवर कोणी करू शकत नाही. त्यामुळे लोक नेहमीच एकमेकाला घाबरून असतात किंवा एकमेकाशी स्पर्धा करत असतात. साहजिकच त्यामुळे माणसा माणसात संशयाचे वातावरण निर्माण होण्यास मोठ्या प्रमाणावर वाव तयार होत असतो. जे संबंध आहेत ते सलोख्याचे न राहता ते दूषित होतात. मानवी समाज किंवा एक जबाबदार माणूस म्हणून असे होणे हे कधीच हितकारक नसते.
एकमेकात स्पर्धा असणे किंवा एकमेकाला घाबरून असणे, या मागे अनेक गोष्टी, बाबी आणि घटना असतात, हे लक्षात घेणे गरजेचे ठरते. त्यामध्ये प्रामुख्याने दोन मुखवटे घेवून वावरणे, दुट्टपी वागणे आणि दुतोंडी बोलणे असणे होय. असे माणूस का वागतो? कारण त्यामुळे त्याला दोन्ही बाजू धरून ठेवता येतात. मी त्यातला नाहीच किंवा मी तसे म्हणू शकत नाही असे सारवासारव करणेही सोपे होते. दोन्ही दगडावर पाय ठेवता येतात. जो दगड सरकणार आहे अथवा अडचणीचा आहे, त्यावरुन ही माणसं हळूच पाय काढून घेण्यात माहिर आणि तरबेज असतात. जय आणि पराजय ह्या दोन्ही बाजूकडे हे लोक कायम आपल्याला दिसतील. म्हणजे हे व्हाईट किंवा ब्लॅक या एरिया मध्ये न राहता ग्रे एरिया मध्ये राहणे पसंत करतात.
मात्र असे बनणे किंवा असे वागणे हे कायम धोकादायक असते. अशा माणसांच्या जवळ राहणे तर कायम धोकादायक ठरते. अशी माणसे विश्वासाला न उतरणारी आणि आत्मघातकी असतात. या माणसासोबत राहणे म्हणजे अडचणीच्या कठड्यावर उभे राहणे सारखे आहे की, जेथून कधीही कडेलोट होवू शकतो. अशी माणसे आपल्याला कधी सोडून देतील, याचा भरवसा नसतो. समोरच्या विरोधकाला कधी जावून मिळतील याचाही नेम नसतो. तुम्ही त्यांच्याजवळ उघड केलेली गुपिते उघड करण्यास ते मागे पुढे पाहत नाहीत. त्यांचे शेपूट कितीही फुकणीत घातले तरी ते वाकडेच राहते. ही माणसे कुंपणावरील रंग बदलणाऱ्या सरड्यासारखी असतात. हे लोक फक्त दुसऱ्याचे ऐकून घेतात, मात्र त्यांच्या मनाला वाटते तेच करतात. त्यामुळे अशा माणसांना कधीही सल्ला आणि मार्गदर्शन करण्याच्या फंदात पडू नये. अशा लोकांची बऱ्याच वेळा प्रगती आणि विकास होत असल्याचे दिसून येते, मात्र तो पाण्याचा बुडबुडा अथवा फुगवटा असतो. तो खूप लवकर फुटतो किंवा ओसरतो. एकंदर ही प्रगती आणि विकास चुकीच्या, पोकळ आणि फसवेगिरीच्या पायावर उभा असतो.
आपणही असे ढोंगी, दुटप्पी आणि दुतोंडी बनलो नाहीत ना? याची खात्री आपण आधी करायला हवी. याचा शिरकाव आपला स्वभाव आणि आपले वागणे यात झाला असेल तर त्यातून लवकर बाहेर पडावे. तसेच आपल्या बाजूला अशी माणसे असंख्य असतात, ती आपण लवकर ओळखायला हवीत. आपल्या आजूबाजूचा माणूस जर असे वागत असेल, कट कारस्थान रचत असेल, त्याची जाणीव आपल्याला लवकर होयला हवी. त्यासाठी खूप डोळस आणि चिकित्सक व्हावे लागते. आपल्या वर्तुळाच्या बाहेर जावून एक दृष्टिक्षेप टाकावा लागतो तेंव्हा खरे चित्र स्पष्ट होते. जर तुम्ही हे लवकर ओळखले नाही, तर तुम्ही खोल अशा चिखलात किंवा अंधाऱ्या खोलीत फसला म्हणून समजा. त्यामुळे एक व्यक्ति जर तुमच्या सोबत आज जरी चांगली वागत असली, तरी पुढील काळात ती तुमच्या सोबत ढोंगी, दुटप्पी आणि दुतोंडी वागू शकते. हे तुम्ही ध्यानात घ्यावे अथवा विचार आणि मन यात पक्के करावे.
अशा आपल्या स्वभावापासून किंवा अशा व्यक्ति पासून जेवढी लवकर सटका करून घेता येईल यावर आधी काम करावे. तसेच या लोकांच्या संगतीत राहून आपणही दुट्टपी झालो आहोत की नाही? याचीही चाचपणी आवश्यक ठरते. त्यासाठी तुम्हाला काळजी पूर्वक तुमच्यावर काम करावे लागते. मी कसा आहे? मी इतरांशी कसा वागतो? माझ्यामुळे रोज कोणी दुखावले जाते का? मी काय बोलतो? आणि काय करतो? हे सदविवेक बुद्धीला अनुसरून असते का? माझ्यात मुत्सेदिगिरी आहे, पण ती कट कारस्थान याच्यात परिवर्तीत झाली नाही ना? हे दक्षतेने समजून घ्यावे लागते. मी आहे तसाच आहे. माझा स्वीकार आहे तसाच व्हावा. यासाठी तुम्ही कायम आग्रही असायला हवे.
सबब, नेहमी आपण मूलतः आहोत तसे राहिलो पाहिजेत. योग्य वेळी, योग्य ठिकाणी आपण मुत्सेदिगिरीचा वापर करायला हवा. मात्र कट आणि कारस्थान आपल्याला जास्त दिवस यश मिळवू देत नाही हे लक्षात घ्यावे. तसेच दोन चेहरे किंवा ढोंगीपणा घेवून समाजात वावरल्याने आपल्या बद्दल गैरसमज तयार होवून लोक आपल्या पासून दूर जातात. दुट्टपी वागणे हे कायम आपल्याला साथ देत नाही, कारण सत्य जास्त दिवस लपवून ठेवता येत नाही. जसे कोंबडे कितीही डालून ठेवले तरी ते आरवते त्याप्रमाणे हे आहे. दुतोंडी बोलणे आपल्या व्यक्तिमत्वाची धार कमी करते आणि आपल्या बद्दल असणारा विश्वास सुद्धा कमी करते. त्यामुळे त्या पासूनही दूर राहिले पाहिजे. तसेच आपल्यामधून हे दुर्गुण व्यर्ज अथवा काढून टाकत असतांना आपल्या आजूबाजूला जे लोक ढोंगी, दुट्टपी आणि दुतोंडी असतात त्यांच्या पासून सुटका करून घेतली पाहिजे आणि त्यांचा पासून दूर गेले पाहिजे. एकंदर आपल्या स्वभाव आणि वागणे यातून ढोंगीपणा, दुट्टपीपणा आणि दुतोंडीपणा बाहेर काढत असतांना आपल्या सभोवताली असणारे असे लोक यांच्या पासूनही सुटका करून घेवून एक साधे, सोपे, सरळ, समाधानी आणि सुखी आयुष्य जगले पाहिजे.
जीवन अनमोल आहे ते अधिक सुंदर बनवूया.
MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
×
MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
Latest Posts

Comment here