अतिशय जिद्दी ,हुशार ,तेवढीच खोडकर आणि चंचल अशी मी. परंतु परिस्थितीपुढे कोणाचे काहीच चालत नाही. मुलाची वाट पहात पहात चार मुली आणि मग खूप खूप नवस करून मुलगा म्हणजे आम्ही पाच भावंडे. चार मुलींचे शिक्षण पूर्ण करणे म्हणजे खूप जड समजले जाते आणि शिक्षणावर खर्च करण्या ऐवजी लग्न करून टाकणे हा पर्याय निवडला जातो. आणि तसेच झाले .”मुलगी हे परक्याचे धन शेवटी’ … हा समज सत्यात उतरताना मी प्रत्यक्षात अनुभवले होते. मुलींच्या इच्छांना बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा पाहिलंच जात नाही. मुली दिसायला सुंदर त्यामुळे एकापाठोपाठ एक स्थळ येत गेली आणि शिक्षण अपूर्ण असतानाच लग्न करून दिली गेली.
लातूर शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या खंडापूर या गावातील एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये माझं लग्न झालं आणि संसाराला सुरुवात झाली. मुळात माझा स्वभाव खूप हट्टी व रागीट. पण माझ्या मनात हे अगदी चांगलं बिंबवलं गेलं होतं की, लग्नानंतर हे असं काही चालत नाही, त्यामुळे माझ्या स्वभावामध्ये खूप आश्चर्यजनक बदल झाले व मी खूप समंजस आणि शांत झाले. माझे मिस्टर तसे खूप समजदार आणि शांत स्वभावाचे आहेत. एका खाजगी कंपनीमध्ये त्यांना नोकरी होती.
त्यांचा विरोध असा कुठल्याच गोष्टींसाठी नव्हता. मुळात एक शेतकरी कुटुंबात मी आले होते. सासू-सासरे सर्व लोक खूप समजदार होते. सर्व काही नवीनच होतं माझ्यासाठी. घर,घरातली माणसं त्यांच्या सवयी त्यांचं बोलणं, त्यांच्या कामांचे नियोजन, हे सर्व ना कधी ऐकलं होतं ना अनुभवलं होतं.
लग्नाच्या पहिल्या वर्षी, सुगी काय असते, पेरण्या काय असतात नांगरणी काय असते, या सगळ्यांचे कुतूहल होतं मला. मी त्या वर्ष वर्षभरात शिक्षणाबरोबरच, सर्वकाही अनुभवलं होतं, आणि जवळपास मला जमेल तशी बरीच कामेही केली होती.परंतु शिक्षणाची इच्छा आणि मुळातच हुशार असल्यामुळे शिक्षणाचे वेड सुटणं काही शक्य नव्हतं. लग्न झालं पण महाविद्यालयीन शिक्षणाची ओढ़ आणि स्वतःला घडवण्याची जिद्द, मला शिक्षणाकडे घेऊन गेली. याची पूर्णपणे जाणीव होती की शिक्षण जर पूर्ण करायचे असेल तर संघर्ष अटळ आहे ,ते सहजासहजी होणार नव्हतं .शिक्षण तर पूर्ण करायचे पण कसे हे काही कळता कळत नव्हते ,कारण सासरी इच्छा व्यक्त करण्याचं धाडस होत नव्हतं. कुठेतरी हिंदी म्हणीप्रमाणे “जहां चाह है वहां राह है” .. याप्रमाणेच घडले माझ्याबाबतीत.
माझा निकाल पाहून माझ्या सास-यांनी विचारलं शिकायचे का? ..घ्यायचं ऍडमिशन.. आणि मग तिथून पुढे माझा शिक्षणाचा आणि संसाराचा गाडा बरोबरीने सुरू झाला.अगदीच सुरुवातीला सासूबाईंना वाटले की काय करायचं आहे शिकून?…..काही वेळासाठी त्यांनी मला शिवण कामाचे क्लासेस ही लावून दिले होते, परंतु माझे मन काही त्यात रमेना. त्यांची ईच्छा म्हणून शिवन कामाची सुरुवात केलीही, आणि जवळपास एक महिन्यातच मी ते बंदही केले. त्यानंतर मी त्यांना खूप समजावून आणि आदराने बोलून माझी इच्छा व्यक्त केली. त्या स्वतः बचत गटाच्या अध्यक्ष होत्या त्यामुळे त्यांनाही शिक्षणाची बाजू थोडी-फार माहिती होती. घरातील सर्व जबाबदाऱ्या आणि काम सांभाळून शिक्षण पूर्ण करणे या अटीवर त्यांनी शेवटी होकार दिला.
माझे सासरे म्हणजे खूप शिकलेले असे काही नाही पण त्यांची त्या काळामध्ये दहावी झालेली होती .मॅट्रिक म्हणजे त्या काळात खूप काही समजलं जायचं. अगदी साधे राहणीमान, धोतर ,सदरा आणि टोपी असा पांढरा शुभ्र पेहराव. माझ्या लग्नाच्या आधीच्या वर्षी ते गावचे उपसरपंच ही राहिलेले त्यामुळे त्यांना गावात खूपच मान आणि प्रतिष्ठा होती.आणि स्वभाव मुळातच खूप कडक असल्यामुळे दरारा ही तसाच होता. स्वभाव कडक जरी असला तरी जे खरे आहे ते खरेच, रोखठोकपणे बोलणारे असल्यामुळेच माझ्या मनात त्यांच्याविषयी खूप आदर निर्माण झाला होता. कारण त्यांच्याकडे माणसाला खरोखर जसा आहे तसा समजण्याची कला होती.
त्यांना कसं समजलं काय माहित की मला शिकण्याची इच्छा आहे . मी मनातून एवढी आनंदी झाली होते की माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. ऍडमिशन घ्यायचं तर करायचं काय हेही कळायचं नाही शिकायचं तर होतच परंतु कुठली ब्रांच आपल्यासाठी चांगली असेल ? आपल्याला आपलं करियर आणि संसार या दोन्ही गोष्टी एकाच वेळी झेपतील का ?पण त्या सगळ्या गोष्टी स्वीकारून मी करायचं ठरवलं आणि सायन्स कॉमर्स करता करता कला शाखेतून शिक्षणास सुरूवात केली.. प्रवेश घेण्याकरता महाविद्यालयात गेलो, सासरे होते सोबत आणि त्यांनी बाहेर मेरीट मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचे फोटो लावलेले पाहिले..आणि मला म्हणाले, “शिकायचं ना तर असं शिकलं पाहिजे की बॉर्डावर फोटोच लागला पाहिजे बघ”.. कारण माझा तर असा अट्टाहास होता होता की शिकायचं तर एखाद्या चांगल्या महाविद्यालयातूनच. त्यांचं असही म्हणणं आलेलं की घर आणि शिक्षण कसं होईल त्यापेक्षा एखाद्या गावातील जवळच्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा जेणेकरून जाण्याची गरज नाही फक्त परीक्षेपुरत जरी गेल तरी पुरेसं.. पण पण मी स्पष्ट सांगितलं मला चांगल्या महाविद्यालयातून माझं शिक्षण करण्याची इच्छा आहे, अन्यथा नको.
शेवटी लातूर मधील दयानंद कला महाविद्यालयात मी माझे शिक्षण सुरू केले कला शाखेतून. आणि परत एकदा माझा शिक्षण प्रवास सुरू झाला .पण हा माझा प्रवास खूप सहज रित्या झाला असे नाही. असंख्य अडथळ्यांना सामोरे जावे लागायचे. गावात राहत असल्यामुळे तेथील संस्कृती, चालीरीती, परंपरा यांना सोबत घेऊन माझा प्रवास सुरु झाला.घरी असताना साडी नेसणे आणि कॉलेजमध्ये जात असताना कॉलेजचा युनिफॉर्म घालून जाणारी गावातील पहिली सून मी होते. घरातील लोकांनी स्वीकारलं पण समाज सहजासहजी स्वीकारेल असे नव्हते. खूप काही नकारात्मक गोष्टी कानावर पडायच्या, तर कोणी प्रत्यक्षात बोलायचे . परंतु माझी जिद्द व मुळातच मी खूप सकारात्मक असल्यामुळे मी त्या गोष्टींकडे खूप कमी लक्ष देऊन वाटचाल सुरू केली.शाळेत असल्यापासूनच सगळ्या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेणे .. वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविणे.. आणि तेच मी पुढेही चालू ठेवण्याच्या प्रयत्नात असायची. परंतु लग्नानंतर थोडीशी भीती होती की ,आपण आताही तसेच बोलू शकू का? इंग्रजी या विषयांमध्ये आवड असल्यामुळे सर्वांवर छाप पडली होती. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक सोनवणे सर, तेच आम्हाला इंग्रजी विषय शिकवायचे, त्यांच्या विश्वास व प्रेरणेमुळेच माझ्या अभ्यासाला गती भेटली होती. इंग्रजी विषयाबरोबरच मी इतर विषयही बरोबर घेऊन चालत होते. आणि खूप छान रीतीने प्रगती करत गेले.
त्यावेळी पंचवीस विद्यार्थ्यांच्या सिलेक्टेड बॅच मध्ये मी होते. आणि सोनवणे सर म्हणाले असेच सातत्य ठेव अभ्यासात, मग नक्कीच मेरिटमध्ये येशील आणि तसेच झाले. सासर्यांनी म्हटल्याप्रमाणे मी मेरीटमध्ये आले पहिल्या पंधरा विद्यार्थ्यांमध्ये माझा नंबर बारावा होता. आणि शेवटी त्या महाविद्यालयाच्या मेरीट ने उत्तीर्ण झालेल्या अभिमानास्पद विद्यार्थ्यां मध्ये मी होते. त्यानंतर आम्ही पाहिलेला तो बोर्ड होता, पण यावेळी त्या विद्यार्थ्यांमध्ये माझाही फोटो होता. आणि त्यावेळी मला जो आनंद झाला होता,ते शब्दात व्यक्त करणे कठीणच.…आणि परत एकदा मी अगदी कुठल्याही अडथळ्यांना, समस्यांना न जुमानता अगदी उत्साहाने आणि जिद्दीने शिक्षणाच्या वाटेवर आले होते…..पुन्हा एकदा ती अतिशय सुंदर अशी सोनेरी पहाट झाली होती. त्यानंतर सर्वांना माझी जिद्द, ध्येयाप्रती असलेली ओढ, शिक्षणाची असलेली आवड हे वेगळे सांगण्याची गरज नव्हती. मी स्वतःला सिद्ध केले होते. इथूनच तर खरी सुरुवात झाली होती माझ्या संघर्षाची. संसार आणि शिक्षण असा संघर्षमय प्रवास मी पावलो पावली करत होते. कारण कारण जे मिळवले होते, त्यात समाधान मानने शक्य नव्हते. माझ्या वाटेत येणारे अडथळे,यांना न जुमानता मी त्यापासूनच प्रेरणा घेऊन न डगमगता ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत गेले.
लेखिका,
सौ. अनुजा हनुमंत कैले(जवंडरे)
एम. ए.(इंग्रजी) बी.एड.
चिंचवड़, पुणे (महाराष्ट्र)
(संपर्क-९९६०५७२१४१)
for more such articles visit www.mahaedunews.com
share your articles to mahaedunews@gmail.com