Student Views

मेघदूत… एक अभूतपूर्व कलाकृती!! समृद्धी भालवणकर

पुरा कवीनां गणनाप्रसङ्गे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासा।
अद्यापि तत्तुल्यकवेरभावत् अनामिका सार्थवती बभूव।।

कवींची गणना करत असताना करंगळीचे स्थान (प्रथम स्थान) कालिदासाने पटकावले. त्यानंतर आजपर्यंत त्याच्या तुलनेचा कवी न सापडल्याने अनामिकेचे नाव सार्थ झाले. (म्हणजेच दुसरा कोणी तुल्यबळ कवी अस्तित्वात नाही.) सुज्ञ वाचकांपैकी ज्यांनी कालिदास वाचला असेल त्यांना या श्लोकाची यथार्थता वेगळी सांगणे न लगे!
पण मी आज अचानक कालिदासाबद्दल का बोलतेय? अहो! आज तर आषाढाचा पहिला दिवस! म्हणजेच ‘महाकवी कालिदास दिन. तसं तर या महाकवीबद्दल आणि त्याच्या साहित्यकृतींबद्दल लिहिणे तर दूर; त्या समजून घ्यायला देखील उभे आयुष्य अपुरे पडावे! परंतु आज, आषाढातील पहिल्या दिवसाचा उल्लेख ज्या खंडकाव्यात आला त्या ‘मेघदूताला’ केंद्रस्थानी ठेवून माझ्या अल्पबुद्धीनुसार हे छोटेसे शब्दपुष्प त्या महाकवीला समर्पित करण्याचे धाडस करत आहे.

मेघांनीं हें गगन भरतां गाढ आषाढमासीं
होई पर्युत्सुक विकल तो कान्त एकान्तवासी,
तन्निःश्वास श्रवुनि, रिझवी कोण त्याच्या जिवासी?
मन्दाक्रान्ता ललित कविता, कालिदासी विलासी!
– माधव ज्युलियन

खरंच, महाकवी कालिदास रचित मेघदूत या काव्याचे सारच जणू वरील ओळींमधून आपल्याला कळते . पत्नीच्या “अस्ति कश्चिद्वाग्विशेष:?” या प्रश्नाचे उत्तर म्हणून प्रश्नातील एकेक शब्दावरून अनुक्रमे कुमारसंभव, मेघदूत अणि रघुवंशाची रचना करणार्‍या या कविकुलगुरूंची प्रतिभा केवळ अद्भुतच! या प्रतिभेला खऱ्या अर्थाने झळाळी आली ती मेघदूत या अप्रतिम खंडकाव्यामुळेच! हे काव्य ‘ पूर्वमेघ’ व ‘उत्तरमेघ’ दोन भागांत विभागलेले असून पूर्वमेघातील दुसर्‍या श्लोकात येणार्‍या “आषाढस्य प्रथम दिवसे..” या संदर्भावरून आषाढ महिन्याचा पहिला दिवस ‘कालिदास दिन’ म्हणून साजरा केला जातो.
कामात कुचराई झाल्यामुळे कुबेराकडून एक वर्ष पत्नीविरहाचा दुःसह शाप मिळालेला, त्या शापामुळे विशेष शक्तींचा क्षय झालेला कोणी एक विरहव्याकुळ यक्ष आपल्या प्रिय पत्नीला एका मेघाकरवी संदेश पाठवतो, ही कल्पनाच मुळात किती सुंदर! दोन ओळींमध्ये सामावले जाईल अशा या कथानकाला कालिदासाच्या अनन्यसाधारण प्रतिभेने आणि अतिशय उत्तम अशा कथनशैलीने एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. खरंतर मेघदूतात कथानक महत्त्वाचे नसून यक्षाची विरहव्याकुळता आणि मेघाला रामगिरीपासून अलकानगरीपर्यंत कराव्या लागणाऱ्या प्रवासाचे तपशीलवार वर्णन हा या काव्याचा प्रमुख विषय आहे.

या काव्यातून केवळ कालिदासाची प्रतिभा व अचूक शब्दज्ञानच नव्हे तर त्याची विद्वत्ता आणि इतिहास, पुराणे व भारतातील भौगोलिक परिस्थिती यांचे ज्ञानही प्रतीत होते. याचबरोबर त्याची मानावी मानसशास्त्राची जाण सुद्धा वाचकांना थक्क करते. उदाहरणच द्यायचे झाले तर मेघदूतातील पहिल्याच श्लोकात ‘रामगिर्याश्रमेषु’ हे बहुवचनी रूप वापरून यक्षाच्या विमनस्क, अस्थिर व अस्वस्थ मानसिक अवस्थेकडे कालिदास आपले लक्ष वेधून घेतो. तसेच भौगोलिक प्रदेशांचे वर्णन करताना एका श्लोकात यक्ष मेघाला म्हणतो, “तुझ्या आगमनानंतर दशार्ण देशातील वनांमध्ये केवड्याच्या कळ्यांची पांढुरकी छाया दिसेल. गावांमधील झाडे कावळ्यांच्या घरटे बांधण्याच्या उद्योगामुळे गजबजून जातील. पिकलेल्या जांभळांमुळे वनप्रदेश निळे-सावळे दिसतील. हंस अजून थोडेच दिवस वास्तव्य करण्याचा विचार करतील.” याबरोबरच यक्ष मेघाला वाट वाकडी करून उज्जैनला जायला सांगतो व तिथे विश्रांती घेण्याचे सुचवितो. कालिदासाच्या यक्षाने मेघाला वरून दिसणार्‍या प्रदेशांचे, प्राण्यांचे व पक्ष्यांचे जसे वर्णन केलेले आहे, तसेच ते प्रत्यक्षात दिसत असल्याचे संशोधनांती सिद्ध झाले आहे. पक्षी अभ्यासक सतीश पांडे लिखित ‘मेघदूतातील पक्षी’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. याचबरोबर अनेक ठिकाणी पौराणिक कथांचाही उल्लेख फक्त संक्षिप्त स्वरूपात आढळतो. उदा. एका ठिकाणी “अवंती नगरी मध्ये तुला उदयनाची कथा माहीत असलेली वृद्ध मंडळी भेटतील. ” असे तो मेघाला म्हणतो. त्यामुळे मेघदूताच्या वाचकाला इतिहास व पुराण कथांचे ज्ञान असणे अभिप्रेत आहे.
‘मेघदूताचे भाषिक सौंदर्य’ हा देखील स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. या काव्यात कालिदासाने ‘मंदाक्रांता’ हे शब्दसंपत्तीला आह्वान देणारे पण काव्यातील भावाला अनुकूल असणारे वृत्त वापरले आहे
जाते. हे वृत्त केवळ १७ अक्षरांचे असल्याने याच वृत्तात मेघदूताचे भाषांतर करणे खूपच आह्वानात्मक आहे. ‘अर्थांतरन्यास’ अलंकार व प्रदीर्घ समास हीदेखील या काव्याची प्रमुख वैशिष्टय़े आहेत. या काव्यात करूण रसाचा वापर केला असून त्यामुळे शापाची व्याकुळता पदोपदी जाणवते. तरीसुद्धा या करूण रसामुळे मेघदूताची अवीट गोडी यत्किंचितही कमी होत नाही.
शांता शेळके, बा. भ. बोरकर, सी. डी देशमुख या दिग्गजांनी मेघदूताचा मराठीत अनुवाद करण्याचे शिवधनुष्य पेलले आहे. याचबरोबर, इंग्रजी, जर्मन रशियन आदी परदेशी भाषांनाही भुरळ घालण्यात मेघदूत यशस्वी झाले आहे. मेघदूत फक्त भाषाप्रेमी जनांपुरते मर्यादित न राहता शास्त्रज्ञ, छायाचित्रकार इत्यादी विविध क्षेत्रातील जाणकारांचे आकर्षण बनले आहे अणि तरीही त्याच्या विविध पैलूंवर संशोधन करावे तितके थोडेच!
म्हणून वाटते मेघदूत ही वाचनाची नव्हे तर अनुभूती घेण्याची गोष्ट आहे आणि ही सुंदर अनुभूती आयुष्यात एकदा तरी घ्यावीच!!

समृद्धी भालवणकर

 

MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
×
MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
Latest Posts

Comment here