Student Views

“ईक्याची Antilia “: प्रिया कळमकर

दिवसभर शेतात काम करून थकलेली आक्का पडवी पाशीच बसली होती,पण नेहमीपेक्षा आज जरा जास्तच थकवा तिला जाणवत होता.दावणीला बांधलेल्या जनावरांना चारा टाकायचं सुद्धा तिला अवसान राहिलं नव्हतं. पण करणार काय?घरी ती एकटीच होती . उच्चपदवीधर झालेला पण सध्या घरीच असलेला तिचा मुलगा ‘ईक्या’ (अर्थात खरं नाव ‘विकास’ पण ते फक्त दाखल्यावर उरलं होतं.)आज तो तालुक्याला काहीतरी कामानिमित्त गेला होता, पण दिवस मावळतीला आलेला असूनही त्याचा अजून पत्ता नव्हता.’आप्पा’ (विकासचे वडील) सकाळची न्याहारी झाल्यानंतर खताच्या गोण्या आणायला दुसऱ्या गावी गेले होते तेही अजून घरी परतले नव्हते.किती मोठ्या दिमाखाने त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव विकास ठेवले होते.निदान आपला तर नाहीच झाला, पण आपल्या मुलाचा तरी होईल अशी मोठी धारणा त्यांना होती (असो); त्यांची थोरली मुलगी सुमन तिच्या सासरी नांदत होती;त्यामुळे घरात हे तिघच आणि सोबतीला जनावरे होतीच.

तालुक्याला जाऊन – येवुन ईक्याने शिक्षण पूर्ण केलं होतं कारण सुट्टीच्या दिवशी तेवढाच त्याचा कामाला हातभार लागणार होता. उच्चपदवीधर असूनही तो अजूनपर्यंत कुठच कामाला चिकटला नव्हता.त्यामुळे कित्येक पिढ्या शेतीतच घालवलेल्या आक्काला आपला मुलगा नोकरीला असावा असे मनोमन वाटे.
शेवटी ती उठली आणि समोरच असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ गेली,आधी हातपाय धुवून मग तिने बादली भरायला लावली आणि बादली घेवून ती गोठ्यात गेली. जनावरांना पाणी पाजलं, चाराही टाकला.पत्र्याच्या घरा नजिक तो दावणीवजा गोठा होता.तिच्यासोबत नेलेल्या शेळ्या व त्यांची करडे तिने खुंटीला बांधली.बादली पुन्हा टाकीजवळ ठेवून तिने बाजूलाच रचलेल्या सरपणाच्या ढिगावरून संध्याकाळी व सकाळी पुरेल एवढे सरपण उचलले व चुलीपुढे टाकले. पडवीच्या बाजूलाच पण गोठ्याच्या अलीकडे त्यांची एक स्वयंपाकासाठीची चुलीची खोली होती.जवळच एक रांजण ,पाणी तापवायचा बंब … असं उपयोगी सामान होतं.तेथून आत एक खोली होती जिचा दुसरा दरवाजा आणखी एका खोलीला मिळत असे आणि त्याचं प्रवेशद्वार पडवीत होतं.
आतापर्यंत आप्पा घरी आले होते आणि आज काही काम झालं नाही उद्या सकाळीच पुन्हा जावं लागणार असे ते आक्काला म्हणाले व पडवीत असलेल्या कॉटवर बसले. आक्काने पाण्याचा तांब्या आप्पांपुढे सरकवला आणि चुलीवर चहासाठी पाणी उकळायला ठेवले. चहा झाला, आक्काने लगेच भाकरी थापायला परात घेतली. तोपर्यंत विकासची स्वारी घरी परतली होती.रात्रीचे जेवण उरकून सगळे दमले असल्याने लवकरच झोपी गेले.
दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे अप्पांना आधीच्या कामासाठी जायचे असल्याने लवकर उठले. आक्काने उठून अंघोळीसाठी पाणी तापायला ठेवले . आप्पांनी वळईवरून कडब्याच्या पेंढ्या आणल्या.अक्काने अंगण झाडून घेत ईक्याला उठण्यासाठी आवाज दिला होता. पण साखरझोपेत असलेल्या विकासला तो ऐकू तरी कसा जाणार?
आता सूर्यदेव तसा बराच वर आला होता;एव्हाना आप्पा उरकून चहा घेवून कामासाठी निघाले होते, आक्काचीही आंघोळ होवून ,स्वयंपाक निम्मा आटपत  आला होता,पण तिचा ईक्या मात्र अजून कॉटवरून उठला नव्हता,तो ह्या कुशीवरून त्या कुशीवर पूर्वेकडे वळला होता.स्वप्नांच्या दुनियेत असलेल्या त्याला आता डोळ्यांपुढे पिवळी चमक  दिसत होती कारण ऊन बरेच वर आलं होतं; आक्काने आता भाकरी थापायला घेतल्या होत्या; बंबामध्ये तापलेल्या पाण्याच्या  वाफा बऱ्याच वर जात होत्या पण ईक्या काही उठायचं नाव घेत नव्हता.त्याच्या डोक्याजवळच्या उशीने पायाजवळची जागा घेतली होती तर गोधडी कॉटवरून खाली पडून त्यावर कुत्र स्थानापन्न झालं होतं. त्याचं झालं असं की काल त्याला नुकतीच एक बातमी कळली होती की श्रीमंतांच्या एका निवासस्थानांपैकी ”Antilia “नावाच्या इमारती मध्ये शेकडोने नोकर कामाला असतात,अजूनही बरच काही असतं,की जे त्याने प्रत्यक्षात कधीच पाहिलं नव्हतं.त्यामुळे आज स्वप्नांची सफारी त्याची ”एन्टीलीया”कडे वळली होती व त्याच दिमाखात तो कॉटवर पहुडला होता.
खूप वेळ आवाज देवूनही ईक्या उठला नसल्याने आक्काचा पारा आणखीनच चढला होता.भाजलेली भाकर टोपल्यात टाकत जवळची फुकणी घेवून ती पडवीत कॉटजवळ आली, तशी तिने फुकणी दणकन कॉटच्या एका बाजूस आदळली इतक्यात  ईक्याला हेलिकॉप्टर रवाना झाल्याचा भास झाला,दुसऱ्या क्षणी कॉटच्या दुसऱ्या बाजूस फुकणी आदळली गेली.ईक्याला वाटलं एका बाजूने गेलेलं हेलिकॉप्टर इतक्यात दुसऱ्या बाजूने वळसा घालून कसं काय गेलं?पण मोठ्या दणक्याच्या आवाजाने त्याचे डोळे उघडले तोच समोर आक्का एका हातात फुकणी घेवून उभी राहिलेली दिसली, त्याची दृष्ठी फुकणीवरुन सरून आक्काच्या नजरेकडे वळती तोच तो खडबडून जागा झाला आणि उदगारला,” अगं ,ती Antilia ………” असे त्याने म्हणताच आक्‍काने “आता ही कोण….?? असे म्हणत काय प्रत्युत्तर दिले असेल त्याचा विचारच न केलेला बरा………(क्रमशः )

प्रिया कळमकर, पारनेर, अहमदनगर, (महाराष्ट्र)

 

MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
×
MahaEdu News Administrator
www.mahaedunews.com is a different educational website. It focuses distinctively on emerging as well as leading topics in education. It helps in delivering effective and collaborative solutions to strengthen vast educational system with the help of students, teachers and experts.
Latest Posts

Comment here