माझं चित्रकलेशी लहानपणापासूनच फारसं पटलं नाही. मला माणूस वगैरे फार चांगला कधी काढता नाही आला. (म्हणजे चित्रकलेतल्या माणसाशी माझं फारसं पटलं नाही असं म्हणा ना!) तरीही रेखाकला एलिमेंटरी आणि इंटरमेडीएट या चित्रकलेच्या परिक्षांमध्ये आमच्या कला शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे चांगल्या ग्रेडने मला उत्तीर्ण होता आलं.
ते काहीही असलं तरी बागेत खेळणारी मुले, बसची वाट पाहणारे कुटुंब हे असे विषय चित्रासाठी समोर आल्यावर माझी चांगलीच भंबेरी उडायची.
खरं तर मला गती होती ती मुक्तहस्तचित्र या प्रकारात. त्यातसुद्धा समअंगी आणि विषमअंगी असे दोन प्रकार. समअंगी चित्र म्हणजे ज्याचे मध्यभागी रेष मारून दोन भाग केले तरी ते आरशातील प्रतिमेसारखे दिसतात असे चित्र. हे रेखाटताना ज्या कागदावर चित्र काढणार त्याचे दोन समान भाग करायचे आणि पहिल्यांदा एकाच भागावर अर्धे चित्र काढायचे. मग दुसऱ्या भागात त्याची उर्वरित आरशातील प्रतिमा रेखाटायची.
माझा समअंगी मुक्तहस्तचित्रात हातखंडा होता. खरं तर हा प्रकार अवघड ; पण कसा कोण जाणे, मला जमायचा.
मला लहानपणीचा एक प्रसंग आठवतो. एकदा चित्रकलेमध्ये (स्मरणचित्र) कमी मार्क्स मिळाल्यामुळे मी नाराज होते,
आणि त्या विषयाबद्दलच मला नाराजी आलेली. तितक्यात कुठूनसे माझे कलाशिक्षक आले आणि मला म्हणाले, “मुक्ता, तुझी रंगसंगती छान असते, मी नेहमी नोंद घेत असतो; पण रेखाटन अजून थोडं सुधारायला हवं ! ” त्या शब्दांनी मला तेव्हा धीर आला होता.
मला स्थिरचित्रे आणि निसर्गचित्रे पण उत्तम जमली पण त्यासाठी मी शब्दशः अहोरात्र मेहनत घेतली होती.
सध्या लॉकडाऊनमध्ये मोकळ्या वेळात पुन्हा एकदा रंग आणि कुंचले काढून एक विषमअंगी मुक्तहस्तचित्र काढलं. आश्चर्यकारकरित्या मस्त जमलं. अगदी काहीच सराव नसताना.
आपल्यात या लहानपणी जोपासलेल्या कला चांगल्याच मुरलेल्या असतात आणि मोठेपणी त्या जेव्हा अशा अचानक आपलं अस्तित्व दाखवतात, तेव्हाचा आनंद अवर्णनीयच असतो !
Mukta Soman is doing MSc Physics from S. P. College, Pune. She is from Khed, dist. Ratnagiri. She had participated in ‘Inspire Award Science Exhibition’ and got selected upto National level. Her hobbies are Photography and Poem-writing. She has recently started blogging ( manmukt.blogspot.com ).
for more such articles visit students view section of www.mahaedunews.com; send your articles to mahaedunews@gmail.com